"काही वर्षांपूर्वी सारं काही वेगळं होतं," नियाझ अहमद म्हणतात. ते श्रीनगर मधील लाल चौकात त्यांच्या दुकानात बसले आहेत. पश्मिना शालीला प्रचंड मागणी होती, आणि नियाझ व इतर दुकानदार भारतभर आणि विदेशातही शाली विकून नफा कमावत होते.
ही फेब्रुवारी २०१६ मधील गोष्ट आहे, जेंव्हा मी चांगथांगी शेळ्यांपासून येथील विक्रेत्यांपर्यंतचा पश्मिना शालीचा प्रवास पाहायला सुरुवात केली होती; मला भारत आणि मध्य आशियाला जोडणाऱ्या प्राचीन भारतीय व्यापारी मार्गांच्या इतिहासात रस आहे. या मार्गे पश्मिना आणि रेशीम या मौल्यवान मालाची वाहतूक होत असे.
पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेलगत तिबेटी पठाराच्या पश्चिम विस्तारावर चांगथांग भागात राहणारे चांगपा गुराखी चांगथांगी शेळ्या पाळतात. ४,००० ते ५,००० मीटर उंचीवर वसलेल्या या भागात राहणं कठीण आहे. आपल्या जितराबासाठी - मेंढ्या, पश्मिना शेळ्या आणि काही याक - कुरण शोधणं आणि सप्टेंबर ते मे दरम्यान पडणारी कडाक्याची थंडी यांमुळे इथे राहणं अवघड होऊन बसतं. दिवसभरात इंधन गोळा करणं, मुलांचं संगोपन, स्वयंपाक, पश्मिना धागा कातणं, अशी कामं करावी लागतात.
प्रत्येक चांगपा कुटुंबाकडे किमान ८०-१०० जितराब असतं. बहुतांश लोकांकडे १००-१५० असतात, काहींकडे तर ३०० च्याही वर असतात; सहसा शेळ्या आणि मेंढ्या सम प्रमाणात. दरवर्षी एका चांगथांगी शेळीपासून त्यांना २००-३०० ग्राम पश्मिना लोकर मिळू शकते.
मार्च २०१६ मध्ये एका थंडगार सकाळी मला बेन्सन त्सेरिंग भेटले. ते आपला कळप चांगथांगच्या आग्नेय भागात - हानले आणि चुमूर या नगरांच्या मध्ये - घेऊन चालले होते. त्यांनी मला सांगितलं की लेहमधील एक सहकारी पतसंस्था - अखिल चांगथांग पश्मिना उत्पादक सहकारी व्यापार पतसंस्था, जी शासकीय लडाख पर्वतीय विकास परिषदेला संलग्न आहे, थेट गुराख्यांकडून कच्ची पश्मिना विकत घेते, याने मध्यस्थ लोकांचा - जे योग्य भाव लावत नसत - पूर्वीचा कारभार संपुष्टात आला. पतसंस्था आता किलोभर कच्च्या पश्मिनाकरिता रु. २,५०० ते रू. २,७०० देते. मागणी रोडावल्यामुळे गेल्या ४-५ वर्षांत या दरात वाढ झाली नाहीये. पंजाब आणि आसपासच्या राज्यांतील बाजारात बिगर-पश्मिना शाली आणि लोकरी कपड्यांना उधाण आल्याने या व्यापाराला फटका बसला आहे.
हानले पासून सुमारे ४० किमी दूर मी पेमा चोकेत यांना देखील भेटलो. पेमा यांच्या ६ मुलांपैकी फक्त त्यांची थोरली मुलगी, २३ वर्षीय देचेन हिलाच याप्रकारचं आयुष्य जगायचं आहे. "तीच आमची वसा पुढे नेईल," पेमा म्हणाल्या, पुढे त्या असंही म्हणाल्या की तिचं जनावरांवर आणि पशुपालकाच्या आयुष्यावरच फार प्रेम आहे.

पण बरेच चांगपा आपले तंबू सोडून, जितराब विकून दुसरी कामं शोधत आहेत किंवा लेहमध्ये स्थायिक होत आहेत. पेमा यांचा थोरला मुलगा ट्रक चालक आहे, तर दुसरा रस्ते बांधकामाच्या ठिकाणी मालवाहक आहे, एक मुलगी लेहमध्ये ऑफिसात काम करते. त्या म्हणतात, "शहरात राहणाऱ्या आमच्या नातेवाईकांचं जीवन सुखाचं आहे."
लेहमध्ये मला कश्मिरी व्यापारी भेटले. ते सहकारी पतसंस्थेकडून रु. ८,०००-९,००० ला कच्ची पश्मिना विकत घेत होते. कधीकधी लोकरीची प्रत आणि मागणी पाहता रु.२०,००० पर्यंत भाव गेला होता. सलग लांबी जितकी जास्त आणि जाडी जितकी कमी, तितकी चांगली प्रत. मला कोणीतरी म्हणालं की पूर्व लडाखहून येणारी पश्मिना उत्कृष्ट मानली जाते.
मी लेहमध्ये स्टॅनझिन डोलमा यांना देखील भेटलो. त्यांनी हाताने सूत कातणं बंद केलं होतं. "आमचं काम यंत्रमागापुढे [अर्थात सूत कातायचं यंत्र] फिकं पडत चाललंय," त्यांनी सुस्कारा सोडला. त्यांना वाटतं की यंत्राला टक्कर द्यावी इतक्या वेगाने त्या आपला हात चालवू शकत नाहीत. लोकरीचं सूत कातायाला वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक चरख्यांना (ज्यांना स्थानिक बोलीत येंदेर म्हणतात) आता किफायती यंत्रं टक्कर देताहेत. ज्यांना परवडतं त्या कुटुंबांनी ही यंत्रं विकत घेतलीयेत. जुन्या श्रीनगरच्या गल्ल्यांमध्ये (खासकरून नवहट्टा आणि रैनावरी या वस्त्यांमध्ये) मला सतत या यंत्रांचे आवाज ऐकू येत होते.
विणून झाल्यावर पश्मिना शालीला श्रीनगरमधील कारखान्यांत हाताने रंग देतात. रंगोटी करणाऱ्यांना एका शालीमागे रु. १५०-२०० मिळतात (इतर लोकरी कापडावर काम करून त्यांना महिन्याचे रु. १५,०००-२०,००० मिळू शकतात. कारखान्यात रंगवलेल्या शाली धुण्याकरिता झेलमच्या किनारी पाठवल्या जातात. पुढील टप्पा म्हणजे शालीवर हाताने नक्षी करणे, जी एक पिढीजात कला आहे. नावंच द्यायची झालीत तर श्रीनगर जिल्ह्यातील गंदरबल आणि बारामुल्ला जिल्ह्यातील बांदीपोर आणि सोपोर तालुक्यांत अजूनही पश्मिना शालीवरचं भरतकाम हे आजही कित्येक कारागिरांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. बारीक नक्षीकाम करण्यासाठी ते लोकरीच्या धाग्यांचा वापर करतात. क्वचित रेशमाचा वापरही करतात. अशा शालीची किंमत जास्त असते.
"आम्ही दिवसाला ४-५ तासांहून जास्त काम करू शकत नाही, आमच्या डोळ्यांवर ताण येतो," पन्नाशी गाठलेले कारागीर नाझीर अहमद यांनी मला गंदरबलमध्ये सांगितलं. दिवसभर शिवणकाम करता येत नाही म्हणून बरेच कारागीर शेतमजुरीदेखील करतात. अहमद म्हणले की त्यांना नक्षीनुसार पश्मिनाच्या ठोक विक्रेत्यांकडून दिवसाला रु. २००-३०० रुपये मिळतात. "आम्हाला हे सहजगत्या जमतं. आम्ही कम्प्युटरला पण हरवू शकतो..." ते म्हणाले.
मग, भरतकाम केलेल्या किंवा हाताने ठसेकाम केलेल्या शाली श्रीनगरमध्ये ठोक विक्रेत्यांकडे पोचत्या होतात. ते किरकोळ विक्रेत्यांकरवी या शाली भारतभर आणि विदेशात विकतात.
नोव्हेंबर २०१८ मध्ये मी नियाझ अहमद यांना परत एकदा त्यांच्या लाल चौकातील दुकानात भेटलो. त्यांनी मला सांगितलं, "जेवढ्या दूर शाल विकाल, तेवढी किंमत मिळेल. [शालीवर] जितकी जास्त नक्षी, तितका जास्त वेळ लागणार आणि तितकीच जास्त तिची किंमत. पूर्ण नक्षी केलेली शाल रु. १ ते ५६ लाखांपर्यंत विकली जाते, तर साध्या शाली रु. १०,००० ला. तिलाच काठ असतील, तर तिची किंमत रु. ३०,००० - ४०,००० पर्यंत जाईल."

हानलेच्या आग्नेय दिशेत सुमारे ८० किमी दूर चांगथांग येथे राहणारं चांगपा गुराख्यांचं एक कुटुंब - जंपा चोकी , त्सेरिंग डोलमा आणि त्यांची मुलगी सोनम न्यिडोन.

बेनसेन त्सेरिंग चांगथांगच्या आग्नेय भागात माळरान , खडकं आणि तीव्र उतारांच्या खडतर प्रदेशात आपल्या शेळ्या चारणीला नेतात . दिवसाला ६ - ८ तास चारायचं , गवत मिळेल तेवढं . बहुतांश पशुपालक कुटुंबांकडे १०० - १५० जनावरं आहेत आणि लोक एका वेळी सगळा कळप चारणीला नेतात .


पेमा चोकेत यांची मुलगी देचेन दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका पिलाकडे पाहतेय . नुकताच वसंत सुरु झालाय ( मार्च २०१६ ). ते कोकरू आपल्या आईच्या कुशीत जाऊन लपतंय . ती या पिलांसाठी एक उबदार निवारा बनवतेय - जमिनीत खोल खड्डे खणून त्यांवर लोकर आणि लाकडाच्या फळ्या घालून . नवजात कोकरू अशा कडाक्याच्या वातावरणात जगू शकेल आणि त्याला तापमानातील तीव्र घट , हिमवायू आणि हिमवृष्टी यांनी इजा होणार नाही , याची सर्व पशुपालक कुटुंबं फार काळजी घेतात .

इथे महिला सर्व हंगामात आणि जवळपास रोज कच्ची पश्मिना हाताने कातत असतात .


डावीकडे : कोरझोक गावात त्सेरिंग नोर्झोम आणि सानोह डोलकार यांना गोठून गेलेल्या त्सो मोरिरी तलावावरून वाहणाऱ्या गारठ्याने फरक पडत नाही . त्या स्वतःच्या शेळ्यामेंढ्याच्या लोकरीपासून स्वेटर आणि गालिचा बनवण्यात गुंग आहेत . उजवीकडे : त्सेरिंग डोंडाप आणि यामा गप्पा मारताना . ती तागस्ते नगराहून ६० किमी दूर असलेल्या स्पांगमिक गावात पांगॉंग तलावाच्या काठी बसून गालिचा विणत आहे .

स्टॅनझिन डोलमा आणि त्यांची मुलगी मागील अंगणात येंदेर आणि उधारीवर घेतलेल्या यंत्रावर बसून सूत कातत आहेत . अनेक कुटुंब आजही हा पारंपरिक चरखा वापरूनच कच्च्या पश्मिनाचं सूत काततात . त्यावर काम करायची त्यांना सवय झालीये , शिवाय त्याची दुरुस्ती करणंही सोपं आहे .

लेहमधील काही वस्त्यांमध्ये , लडाखी महिलांनी ( चांगपा महिलां व्यतिरिक्त ) एकत्र येऊन सूत कातायच्या यंत्राचे छोटे कारखाने उघडले आहेत किंवा तिथे त्या कामाला जातात . यामुळे , त्या म्हणतात , कामाचा वेग आणि नफा वाढलाय .

लेह मध्ये साईमा दार म्हणतात की त्यांना यंत्रावर सूत कातणं पसंत आहे कारण ते चटकन होतं आणि त्यांना आपल्या मुलांना वेळ देता येतो . त्यांचे पती श्रीनगर मध्ये एका हॉटेलात वेटर आहेत .


मोहम्मद सिद्दीक कोठा आणि त्यांचा मुलगा इर्शाद अहमद कोठा गेली कित्येक दशके हातमागावर पश्मिना शाली विणत आहेत . ते म्हणतात की शाली विणण्यात यंत्राच्या वेगाला तोड नाही .

सबझार अहमद आणि झुबेर वानी हे दोघे श्रीनगर मधील नवहट्टा भागातील एका कारखान्यात पारंपरिक रंगारी आहेत . त्यांच्या कामात त्यांना बरेचदा हानिकारक रसायनांच्या वाफेची बाधा होते , पण त्यांना त्यांचे मालक कुठलीही संरक्षक उपकरणं देत नाहीत .


तयार झाल्या की पश्मिना शाली जुन्या श्रीनगरच्या काही भागात झेलम नदीच्या किनारी धुतल्या जातात .


डावीकडे : तिशीत असलेल्या शबीर बट यांनी आपल्या वडलांकडून पश्मिना शालीवर नक्षी करणं शिकून घेतलं आणि १५ वर्षांचे असल्यापासून ते या व्यवसायात आहेत . बऱ्याच ठिकाणी कम्प्युटरच्या मदतीने नक्षी काढली जात असूनसुद्धा त्यांना हातानेच भरतकाम करणं पसंत आहे . उजवीकडे : हाताने कोरलेल्या लाकडी ठोकळ्यांचे ठसे पाडून पश्मिना शालीचे काठ सजवले जातात . जुन्या श्रीनगरमध्ये राहणाऱ्या बिलाल मकसूद यांना आपण एका कोऱ्या कापडाचं एका आकर्षक शालीत रूपांतर करतो , याचा अभिमान वाटतो .


डावीकडे : गंदरबलमध्ये नाझीर अहमद , एक कुशल कारागीर , सुई - धागा वापरून भरतकाम करताना . पूर्ण नक्षी असलेली शाल तयार व्हायला ६ - ८ महिने लागतात . तेच , एका सुशोभित काठ असलेल्या कोऱ्या शालीला तयार व्हायला जास्तीत जास्त महिनाभर वेळ लागतो . उजवीकडे : नियाझ अहमद , श्रीनगर मधील लाल चौकात एका पश्मिना शालीच्या दुकानाचे मालक , कित्येक दशके या व्यापारात आहेत . त्यांनी या व्यापारात चांगले दिवस पाहिलेत जेंव्हा शालीची मागणी , आणि पर्यायाने त्यांचा नफा तेजीत होता . मशकूर शेख , आता ४४ , तरुण वयापासून कुटुंबाच्या पश्मिना व्यवसायात आहेत , आणि चांगलं उत्पन्न मिळावं म्हणून विणकामाऐवजी ठोक विक्री करत आहेत .
अनुवादः कौशल काळू