के. एन. महेशा प्रशिक्षित निसर्ग वैज्ञानिक आहे, त्याने पूर्वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेतलं आहे. तो आणि त्याचे वडील कुणगाहळ्ळी गावात शेती करतात. या निबंधासाठी जेव्हा छायाचित्रं घेतली तेव्हा तो एका स्थानिक सामाजिक संस्थेसोबत बंडीपूर राष्ट्रीय उद्यानातील काही माजोरी तण काढण्याचं काम करत होता.
वन्य प्राण्यांबरोबरचं जीवन या विषयावरच्या एका मोठा छायाचित्र प्रकल्प एकत्र सुरू आहे, त्यातल्या पारीवरच्या सहा निबंधांच्या मालिकेतलं हे चौथं पुष्प. “पहिल्यांदा माझ्या हातात कॅमेरा आला तेव्हा मला फोटो कसा काढायचा हेही माहित नव्हतं आणि मी फोटो काढायला फार लाजायचो,” २७ वर्षीय महेशा सांगतो. “त्यानंतर मात्र मला जे जे नवीन आणि रंजक वाटेल अशा सगळ्याचे मी फोटो काढायला लागलो. मला हा प्रकल्प फार आवडलाय, कारण त्यातूनच आपण गावाकडे काय चाललंय ते पाहू शकतो.”

महेशाला आशा आहे की या प्रकल्पामुळे कर्नाटकाच्या चामराजनगरमधल्या बंडीपूर जवळच्या गावांमध्ये लोकांना काय समस्यांना सामोरं जावं लागतंय ते समजून घेता येईल

कलिंगडाचं शेतः “हे माझ्या शेजाऱ्याचं रान आहे, बाया कलिंगडाच्या पिकातलं तण काढतायत. कधी कधी इथे डुकरं आणि हत्ती येतात. अलिकडे, डुकरांनी फार उच्छाद मांडलाय. हत्तींना थोपवायला खंदक आणि कुंपणं घालता येतात, पण डुकरं कुंपणांच्या खाली खड्डा करून आत शिरतात आणि कलिंगडं फस्त करतात कारण ती फारच चविष्ट आहेत. लोक रात्रीदेखील पिकांची राखण करतात आणि डुकरांना हाकलायला दिव्याचा वापर करतात. पण वीज गेली की डुकरं येतात. गेल्या वर्षी त्यांनी अर्ध्या एकरातली कलिंगडं फस्त केली”

टोमॅटोचं शेतः “डुकरं बऱ्याचदा टोमॅटोच्या रानातही धुडगूस घालतात. आम्ही सौरवीजेचा वापर करून कुंपण घातलंय. त्यांना जमिनीतले कंद हवे असतात आणि म्हणून ते रोपं उपटतात – ते टोमॅटो काही खात नाहीत नाही तर या रानाचीही त्यांनी मेजवानी केली असती. आमच्या टोमॅटोला आम्हाला चांगला भाव मिळत नाहीये. गेल्या साली, किमती खूपच कमी होत्या, किलोला एक रुपया. त्यामुळे आम्हाला चक्क माल फेकून द्यावा लागला. पण आता भाव ४० रुपयांच्या वर गेला आहे”

बैलांची टक्करः “ही खोंडं आहेत. पूर्वी लोकांकडे आतापेक्षा यांची संख्या जास्त होती. त्यांना चरायला जंगलात सोडता यायचं, पण आता त्याची परवानगी नाही. आता लोकांकडे थोड्या फार संकरित गायी आहेत, त्या महागही असतात आणि नाजूक पण. पण देशी गायींपेक्षा दूध जास्त देतात. देशी गायी आता फक्त शेणासाठी ठेवल्या जातात. केरळमधून लोक येऊन कायम शेण विकत घेऊन जायचे पण आता गायीच कमी झाल्यात.”

गायींचा कळपः “हे हादिनकनिवे [गाण्यांचं खोरं] आहे. फोटोत जेनु कुरुबा आदिवासी समाजाची स्त्री जंगलात गाई चारताना दिसतीये. मला त्या रोज दिसतात. तिच्यासोबत १००-१५० गायी असतात. इतक्यात दोन गायी आणि एका वासराला वन्यप्राण्यांनी मारल्याची त्यांनी माझ्याकडे तक्रार केलीये. त्यामुळे आता ते मिळून चारणीला जातात. ते जंगलाला लागून राहतात – जंगलात चराई करणं बेकायदेशीर आहे, पण ते सांगतात की त्यांच्याकडे आता कुरणं, गायरानंच राहिलेली नाहीत त्यामुळे त्यांना जनावरं घेऊन जंगलात येण्यावाचून पर्याय नसतो”

गोठ्यात गायी चरतायतः “हे माझे शेजारी, त्यांच्याकडे तीन संकरित गायी आहेत. ते त्यांच्या गायींना वर्षभर पुरेल एवढा चारा कडबा-चारा साठवून ठेवतात. ते हुलग्याच्या, शेंगांच्या आणि मक्याच्या सालीही साठवून ठेवतात. उन्हाळ्यात जेव्हा गवत मिळत नाही, तेव्हा जनावरांना ही हुळी खायला घालता येते. संकरित गायींना उष्णता सहन होत नाही, त्यामुळे त्यांनी खास गोठा बांधून घेतलाय, त्या फार नाजूक असतात. गोठ्यातच त्यांना पाणी, पेंड सगळं ठेवलं जातं.”

बैलाची नाळः “बैलांसाठी ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपण जसे जोडे वापरतो तसं बैलांनाही नाल वापरावी लागते. ते दगड गोट्यांच्या रस्त्यांनी चालत असतात. दर महिन्यात, गुंडुलपेट [२२ किलोमीटरवरील एक गाव] वरून एक जण येतो आणि नाल ठोकून जातो. आम्ही बैलं घेऊन जातो आणि तो नाला आणतो. काही जण तर गायींना पण नाला ठोकतात, पण बैलाला दर दीड महिन्यांनी हे करून घ्यावंच लागतं”

तणणीः “जंगलात वेगवेगळ्या प्रकारचं तण माजलंय ज्यामुळे गवताची वाढ कमी झालीये. टणटणी आणि युपेटोरियमच जास्त बघायला मिळतंय. आणि त्यामुळे वाघांचं जे भक्ष्य आहे ते कमी व्हायला लागलंय. त्यामुळे ते जंगलाच्या बाहेर पडून शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करायला लागलेत. आम्ही [जंगलस्केप्स ही सामाजिक संस्था, जिथे महेशा काम करतो] वनविभागासाठी हे तण काढून टाकण्याचं काम करतोय. गवत उगवेल आणि हरणं, सांबर आणि इतर प्राण्यांसाठी चारा उपलब्ध होईल अशी आशा आहे. तसं झालं तर मग वाघ, शिकारी कुत्री णि बिबटे त्यांची शिकार करू शकतील आणि जंगल सोडून बाहेर येणार नाहीत. या छायाचित्रात दिसणारी ही मंडळी जेनु कुरुबा आदिवासी आहेत ज्यांना अशा कामातून रोजगार मिळतो. हे काम जंगलासाठी आणि माणसांसाठी, दोघांसाठी चांगलं आहे.”

वणवाः “सकाळी सकाळी, मी येलचट्टीपाशी दोणकीबेट्टा नावाच्या ठिकाणी चाललो होतो तेव्हाचं हे दृश्य आहे. वन विभाग आग विझवण्याचा प्रयत्न करतोय. काही गावकऱ्यांनीच आग लावली असणार. उन्हाळ्यात त्यांच्या गुरांना चरता यावं यासाठी गवत उगवायला पाहिजे आणि त्यासाठी दाट झाडोरा जाळून टाकण्यासाठी ते असले प्रकार करतात. त्यांच्या हे ध्यानात येत नाही की या आगीमुळे छोटे प्राणी आणि पक्षीदेखील जळून मरतात. वणवा हा इथला संघर्षाचा मुख्य मुद्दा आहे.”

माहूतः “हा कृष्णा. तो माहूत आहे. मी रोज सकाळी त्याला पाहतो. तो हत्तीला जंगलात घेऊन चाललाय. ते रोज सकाळी ९.३० पर्यंत हत्तीला नाचणी खायला घालतात आणि संध्याकाळी परतल्यावर त्याला परत खायला घालतात. हा वनविभागाच्या ताफ्यातला कुमकी [पाळीव, प्रशिक्षित हत्ती] आहे. बाकी काही हत्तींच्या तुलनेत हा गुणी आहे.”

प्रिन्सः “हा माझा सगळ्यात लाडका वाघ आहे, प्रिन्स. तो ११-१२ वर्षांचा आहे. बंडीपूरमधल्या सगळ्यांचा तो आवडता वाघ आहे. मी त्याला खूप वेळा पाहिलंय. एकदा तो नजरेस पडला की पुढचे १-२ तास तरी तो हलत नाही. तो येतो आणि तुमच्या अगदी जवळ येऊन बसतो. नुकतंच मी त्याला अगदी जवळून पाहिलं. मी सफारीवर गेलो होतो आणि मला तो दिसला. तो मी ज्या जीपमध्ये होतो तिथे अगदी जवळ येऊन थांबला. त्या दिवशी माझा एवढा थरकाप उडाला होता!”

सर्पगरुडः “हा गरूड आहे. तो मुख्यतः साप खातो. या भागात तो बऱ्याचदा दिसतो.”
कर्नाटकाच्या मंगला गावातील मरिअम्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या समन्वयातून जॅरेड मार्ग्युलिस यांनी हा उपक्रम घडवून आणला आहे. फुलब्राइट नेहरू स्टूडंट रिसर्च ग्रांट (२०१५-१६), बाल्टिमोर काउंटी येथील मेरीलँड विद्यापीठाची ग्रॅज्युएट असोसिएशन रिसर्च ग्रांट आणि मरिअम्मा चॅरिटेंबल ट्रस्टने केलेल्या सहकार्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या छायाचित्रकारांचा सहभाग, उत्साह आणि कष्टांमुळे हे शक्य झालं. बी. आर. राजीव यांनी मजकुराचा अनुवाद करून केलेली मदत अनमोल आहे. सर्व फोटोंचे स्वामित्व हक्क पारीच्या क्रिएटिव्ह कॉमन्स धोरणानुसार केवळ छायाचित्रकारांकडेच आहेत. त्यांचा वापर किंवा पुनःप्रकाशन यासाठी पारीशी संपर्क साधावा.
संबंधित कहाण्याः
When Jayamma spotted the leopard
‘We have hills and forests and we live here’
Home with the harvest in Bandipur
'That is where the leopard and tiger attack'
'This calf went missing after I took this photo'
अनुवादः मेधा काळे