तसं पाहिलं तर ते फक्त तिथून पुढे चालले होते – हजारांच्या संख्येत. रोज ते येत होते, पायी, सायकलींवर, ट्रकवरून, बसमधून, खरं तर त्यांना मिळेल त्या वाहनातून. थकलेले, भागलेले, घरी पोचण्यासाठी उतावीळ झालेले. सगळ्या वयाचे पुरुष आणि बाया आणि अनेक लहानगी देखील.
हैद्राबाद आणि त्या पल्याडहून येणारे लोक होते, मुंबई आणि गुजरातेतून, किंवा विदर्भाच्या पलिकडे पश्चिम महाराष्ट्रातून निघाले होते बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालला.
टाळेबंदी जाहीर झाल्यावर देशभरातल्या लाखो करोडोंची आयुष्यं अस्तव्यस्त झाली, उपजीविका ठप्प झाल्या आणि मग त्यांनी एक निर्णय घेतलाः गावाकडे, आपल्या कुटुंबांकडे, जिवलगांकडे परत जायचं. मग प्रवास कितीही खडतर असला तरी तेच बरंय.
आणि यातले अनेक जण नागपूर पार करून जातायत. नागपूर हे देशाच्या बरोबर केंद्रस्थानी असलेलं महत्त्वाचं शहर आणि एरवी सगळं सुरळीत सुरू असतं तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथलं रेल्वे स्थानक. आठवड्यामागून आठवडे जात राहिले आणि लोंढे येतच राहिले. मे महिना उलटत चालला तेव्हा कुठे राज्य आणि केंद्र शासनाने स्थलांतरित कामगारांना बस आणि रेल्वेने पोचवायची व्यवस्था केली. पण ज्यांना या वाहनांमध्ये जागा मिळाली नाही ते मात्र दूरवरच्या आपापल्या गावी कसेही करून जातच राहिले.

बापाच्या खांद्यावर बोजा आणि निजलेलं मूल खांद्यावर घेऊन ही आई झपाझप चाललीये, हैद्राबादहून नागपूरच्या दिशेने.
त्यात होतं एक तरुण जोडपं आणि त्यांची ४४ दिवसांची तान्ही मुलगी, हैद्राबादहून गोरखपूरला भाड्याच्या मोटरसायकलवरून निघालेले, उन्हाचा पारा चाळिशी पार करून गेला होता.
छत्तीसगडच्या धमतरीतल्या ३४ बाया अहमदाबादला एका कौशल्य विकास कार्यक्रमासाठी गेल्या होत्या, त्या परत घरी पोचण्याची धडपड करतायत.
पाच तरुण, नुकत्याच विकत घेतलेल्या सायकलींवर ओडिशाच्या रायगडा जिल्ह्याच्या दिशेने निघालेत.
नागपूरच्या बाह्य रिंग रोडवर अजूनही राष्ट्रीय महामार्ग ६ आणि ७ वरून रोज शेकडोच्या संख्येने स्थलांतरित येतायतच. मध्ये अनेक ठिकाणी त्यांची खाण्याची सोय केली गेलीये आणि टोल प्लाझाच्या आसपास निवारा शोधलाय. जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या गटांनी ही सोय केलीये. दिवसा उन्हाच्या कारात हे कामगार जरा विसावा घेतात आणि संध्याकाळी परत आपली पदयात्रा सुरू करतात. महाराष्ट्र शासनाने आता त्यांना त्यांच्या राज्याच्या सीमांपर्यंत सोडण्यासाठी दररोज बसगाड्यांची सोय केलीये. त्यामुळे आता हे लोंढे जरा रोडावले आहेत – आणि लोकही आता आपल्या घरी सुखरुप पोचतील – आणि त्यांची तितकीच अपेक्षा आहे.

हैद्राबादहून आलेल्या एका ट्रकमधून उतरलेला स्थलांतरितांचा हा गट नागपूरच्या सीमेवरच्या एका अन्नछत्राच्या दिशेने निघालाय.

आपला सगळा पसारा आवरून गावाकडे माघारी निघालेला हा स्थलांतरितांचा गट – मे महिन्याच्या उन्हाच्या काहिलीत. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर दररोज नागपूरमध्ये असे गटागटाने चालत जाणारे लोक येतच राहिले – घरी चाललेले, दाहीदिशा.

नागपूरच्या सीमेवर असलेल्या पांजरी गावापाशी असलेल्या अन्नछत्राच्या दिशेने तरुणांचा हा ताफा निघालाय, ते कामासाठी हैद्राबादला गेले होते, तिथून परतलेत.

नागपूरच्या सीमेवर असलेल्या पांजरी गावामध्ये असंख्य स्थलांतरित रोज येतायत आणि इथून पुढे देशभरातल्या विविध भागात दूरवर असलेल्या आपल्या गावाच्या दिशेने मार्गस्थ होतायत.

नागपूर शहराजवळच्या एका उड्डाणपुलाखाली तहान आणि भूक भागवण्यासाठीचा गरजेचा विसावा.

थकल्याभागल्या, घरी, आपल्या लोकांत पोचण्यासाठी आतुर झालेल्या स्थलांतरितांना घेऊन निघण्याच्या बेतात असलेला एक ट्रक.

ज्यांना या ट्रकमध्ये पाय ठेवण्याइतकी जागा मिळालीये, त्यांचा प्रवास सुरू.

पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या ट्रकमध्ये जागा मिळवण्यासाठी अनेकांची खटपट सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ आणि ७ ला जोडणाऱ्या नागपूरच्या बाह्य रिंग रोडवरच्या टोल प्लाझाजवळचं हे दृश्य.

४० अंश सेल्सियच्या पुढे पारा गेला असताना हा असा प्रवास.

आपली लोकं भेटणार ही आशाच कदाचित ही उन्हाची तलखी, भूक, गर्दी, थकवा सगळं काही थोडं सुसह्य करत असावी.

आपल्या नव्या कोऱ्या सायकलींवरून मुंबईहून ओडिशाकडे निघालेले हे तीन तरुण. दुसरा पर्यायच नसल्याने हा प्रवास करण्यावाचून गत्यंतर नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

कित्येकदा हे कामगार महामार्गांवरून नाही तर राना-वनातून पाऊलवाटांनी मार्गक्रमण करतात.

आपल्याच हाताने उभी केलेली ही शहरं सोडून गडी निघाले, संकट आलं तेव्हा याच शहरांनी त्यांची फारसी वास्तपुस्त ठेवली नाही
अनुवादः मेधा काळे