पुराचं पाणी वाढायला लागलं तेव्हा पार्वती वासुदेव यांनी घर सोडताना त्यांच्या पतीची टोपी तेवढी घेतली. “आम्ही फक्त टोपी आणि चिपळी आणलीया. काही होऊ द्या, टोपी सोडून जाणंच शक्य नाही,” त्या म्हणतात. टोपीवर मोरपिसं लावलीयेत. पहाटे गाणी गाताना गोपाळ वासुदेवांच्या डोक्यावर ही टोपी असतेच.

९ ऑगस्ट रोजी, सत्तरी पार केलेले गोपाळ वासुदेव शाळेच्या एका वर्गाच्या कोपऱ्यात बसले होते, चेहऱ्यावरचं दुःख लपत नव्हतं. “माझी तीन शेरडं गेली आणि एकाला कसं तरी सोबत आणलं, तेही जगेल असं वाटत नाही,” ते म्हणतात. गोपाळ वासुदेव समाजाचे आहेत, पहाटे दारोदारी जाऊन कृष्णाची भजनं गाऊन भिक्षा मागायची हे त्यांचं काम. पावसाळ्यात कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या आपल्या भेंडवडे या गावी ते शेतमजुरी करतात. “महिना झाला, जोरदार पावसामुळे रानानी कामं नव्हती आणि आता परत पुराचं पाणी शिरलंया,” पाणावलेल्या डोळ्यांनी ते सांगतात.

भेंडवड्याच्या शेतकऱ्यांनी पाऊस लांबल्यामुळे खरिपाच्या पेरण्या जुलैपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. एरवी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. पण पाऊस आला तो असा काही की एका महिन्यातच सोयाबीन, भुईमूग आणि ऊस पाण्याखाली गेला.

आसिफला कधी वाटलंही नसेल की एरवी लग्नाचे फोटो काढण्यासाठी वापरलेल्या त्याच्या ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग लोकांची सुटका करण्यासाठी होईलः ‘आम्ही एकही जीव जाऊ देणार नाही. जनावरं देखील आम्ही वाचवू’

व्हिडिओ पहाः पुराने घरं, शेतं आणि आयुष्यं उद्ध्वस्त झाली आहेत

२ ऑगस्ट रोजी पुराचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्राच्या एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या २०० ते २५० गावांपैकी एक म्हणजे भेंडवडे. पुराचं पाणी ११ ऑगस्टपर्यंत ओसरलं नव्हतं.

भेंडवड्याचे सरपंच, काकासाहेब चव्हाण सांगतात की ४,६८६ लोकसंख्या असणाऱ्या या गावातली ४५० कुटुंबं आणि २५०० लोकांना गावातल्या आणि आसपासच्या शाळांमध्ये आणि गावाच्या वेशीपाशी असणाऱ्या सरपंचांच्या घरात हलवण्यात आलं आहे जिथे पाणी पोचलं नव्हतं.

वासुदेव त्यांची पत्नी पार्वती आणि कुटुंबासोबत ३ ऑगस्ट रोजी गावातल्या सरकारी माध्यमिक शाळेत आले. चार दिवसांनी जेव्हा शाळेतही पाणी यायला लागलं तेव्हा त्यांना गावाबाहेरच्या प्राथमिक शाळेत जावं लागलं. सत्तरीच्या असणाऱ्या पार्वतींनी ९ ऑगस्ट रोजी मला सांगितलं, “आठवडा झाला, आम्ही हे असं घर सोडून राहतोय. आम्हाला महिनाभर तरी इथेच रहावं लागणार आहे. आज एक पोरगा पोहत आला आणि म्हणाला की आमचं घर पडलं म्हणून.”

व्हिडिओ पहाः खोची, कोल्हापूरः ९ ऑगस्ट २०१९

आणखी एक जण पोहत बाहेर पडला, तो होता १९ वर्षांचा सोमनाथ पाचंगे. आपल्या घरी मांजराला सोडवून आणण्यासाठी तो निघाला होता. “रस्त्यावर आठ फुटाच्या वर पाणी वाहतंय. माझ्या घरी साडेतीन फूट पाणी चढलंय. आमचं मांजर पाण्याला घाबरून घरातून येईना गेलंय,” तो सांगतो.

“आम्ही एकही जीव जाऊ देणार नाही. आम्ही जनावरंदेखील वाचवू,” ३४ वर्षीय आसिफ पकाळे आणि त्याचे मित्र सांगतात. असिफला कधी वाटलंही नसेल की त्याच्या ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग – जो एरवी लग्नाच्या फोटोसाठी वापरला जातो – लोकांची सुटका करण्यासाठी होईल. “आम्ही ड्रोनचा वापर करून गावात पार आत एक शेतकरी अडकून बसला होता त्याला हुडकून काढला,” तो सांगतो. ६ ऑगस्ट २०१९ रोजी भेंडवड्याच्या लोकांनी सुमारे ३० किलोमीटरवरच्या निळेवाडी गावातून एक नाव पैदा केली आणि त्या शेतकऱ्याची कशीबशी सुटका केली.

भेंडवड्यातली त्याची टीम किंवा राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करूनही गावातली किती तरी जनावरं मरण पावली. भेंडवड्यात कुणाचाही जीव गेला नसला तरी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले असं पुणे विभागीय आयुक्तांनी सांगितल्याचं वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून समजतं. चार लाखांहून अधिक जणांना तात्पुरत्या शिबिरांमध्ये हलवण्यात आलं. किती एकरावरचं पीक उद्ध्वस्त झालंय याचा खात्रीशीर अंदाज अजून काढण्यात आलेला नाही.

Parvati Vasudeo holding a cap
PHOTO • Sanket Jain
Gopal Vasudeo wears ceremonial headgear
PHOTO • Sanket Jain

पार्वती वासुदेव (डावीकडे) यांनी पुराचं पाणी शिरल्यावर ३ ऑगस्ट रोजी घर सोडलं तेव्हा त्यांचे पती गोपाळ वासुदेव यांची टोपी तेवढी सोबत घेतली

Relief camp in the local school where farmers kept their belongings
PHOTO • Sanket Jain

गावातल्या या शेतकरी कुटुंबांनी आपली जी थोडी फार पुंजी होती त्यातलं जमेल तितकं वाचवायचा प्रयत्न केला आणि गावातल्या शाळेत आसरा घेतला. कृष्णेची उपनदी असणाऱ्या वारणेच्या पाण्याने भेंडवड्यात कहर माजवला. गावातली तीन खोल्यांची शाळाच २० कुटुंबांसाठी तात्पुरता निवारा बनली. काही शेतकरी गाई-गुरांचं बघत होते, काही जण जेवणाची वाट पाहत होते आणि काही नुसतेच तंद्री लावून बसले होते, कदाचित २००५ च्या पुराच्या आठवणीत मग्न. त्या वर्षी तेव्हाच्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांनुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एका महिन्यात १५९ टक्के पाऊस झाल्याचं वक्तव्य केलं होतं – यंदा नऊ दिवसात ४८० टक्के पाऊस झाला आहे. फक्त ५ ऑगस्ट ते १० ऑगस्ट, भारतीय हवमान वेधशाळेच्या आकडेवारीनुसार हातकणंगले तालुक्यात ४५० मिमी पाऊस झाला आहे.

Woman shivers inside a blanket in transit camp as floods ravage Kolhapur.
PHOTO • Sanket Jain

२ ऑगस्ट रोजी अनुबाई भोसले ज्या स्वतःचं वय ९५ असल्याचं सांगतात, एका टेम्पोतून गावातल्या प्राथमिक शाळेत दाखल झाल्या. कुडकुडणाऱ्या अनुबाईंनी एक ब्लँकेट लपेटून घेतलं होतं. १९५३ साली आलेल्या पुरात (सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या) धोंडेवाडी गावातलं त्यांचं घर पडलं होतं त्याची त्यांना याद येते. ‘आधीच्या पुरांपरीस [२००५ आणि १९५३] हा पूर लईच बेकार आहे,’ त्या कातर आवाजात सांगतात. शाळेच्या खोलीतले सगळे जण जेवण आलंय का पहायला बाहेर पडताच त्या एकदम गप्प होतात. आज ९ ऑगस्ट, दुपारचे ९ वाजलेत. गावातल्या सामाजिक संस्था आणि व्यक्ती खाणं घेऊन येतायत, पण नेहमीच अन्नाचा पुरवठा होतोच असं नाही.

The villagers try saving their animals and livestock.
PHOTO • Sanket Jain

वर डावीकडेः उषा पाटील, भेंडवड्यातल्या एक गृहिणी. गाव सोडण्याआधी त्यांनी त्यांची दोन मांजरं आणि बकरी सोबत आणली. गावकऱ्यांनी जमेल ती सगळी जनावरं वाचवायचा प्रयत्न केला पण वाढत्या पाण्यामुळे किती तरी हललीच नाहीत. वर उजवीकडेः सोमनाथ पाचंगे, वय १९ घर सोडण्यापूर्वी आपले पाळीव पक्षी घेऊन बाहेर पडला. खाली डावीकडेः ‘कोणत्याही गायी [ज्यांना शाळेत आणलंय] दूध देईना झाल्यात,’ गोपाळ आणि पार्वतींचा मुलगा, ४७ वर्षीय अजित सांगतात. ‘गुरांसाठी चाराच राहिलेला नाही. सगळी आजारी झाल्यात त्यात डॉक्टर पण नाहीये.’ त्यांची गाय लवकरच जाईल की काय अशी त्यांना भीती आहे. अनेक म्हातारी मंडळी देखील आजारी आहेत, सर्दी पडसं, तापानी. किती तरी गुरं अजूनही अडकलेली आहेत. शेतकरी आता स्वतःची जीव धोक्यात घालून चार फूट पाण्यातून वाट काढत चारा घेऊन येतायत. स्थानिक सामाजिक संस्था निवाऱ्यांच्या ठिकाणी चारा दान करतायत. खाली उजवीकडेः पुराचं पाणी गोठ्यात शिरल्यानंतर मात्र (भेंडवड्यापासून २.५ किमीवरच्या) खोची गावच्या शेतकऱ्यांनी जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवली

Water from the Warna river sweeps through Archana Ingale’s 2.5 acre field.
PHOTO • Sanket Jain

वारणेचं पाणी अर्चना इंगळेंच्या अडीच एकर रानात शिरलं. किमान सहा क्विंटल सोयाबीन आणि एक क्विंटल भुईमुगाचं नुकसान झाल्याचा त्यांचा अंदाज आहे. घर सोडून त्या गावातल्याच आपल्या नातेवाइकांच्या घरी गेल्या. चार दिवसांनी, ९ ऑगस्ट रोजी त्या पाणी कुठवर आलंय ते पहायला परत आल्या आणि पडझड झालेल्या विटांचे तुकडे मांडून त्यांनी घरात जायला वाट केली

Man stands next to the debris of his flood-ravaged house.
PHOTO • Sanket Jain

नागेश बांदवडे, वय ३४ सांगतात, ‘दोनच दिवसांपूर्वी आमच्या घराची भिंत सकाळी १० च्या सुमारास कोसळली’

Young men playing a game on their smartphones in the primary school in Bhendavade.
PHOTO • Sanket Jain
Flooded school premises
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः भेंडवड्याच्या प्राथमिक शाळेत काही तरूण मंडळी त्यांच्या स्मार्टफोनवर गेम खेळण्यात मग्न होती. उजवीकडेः भेंडवड्याच्या काही कुटुंबांना माध्यमिक शाळेत हलवलं होतं पण चार दिवसांनी ६ ऑगस्ट रोजी तिथेही पाणी शिरल्यामुळे त्यांनी तिथून बाहेर पडावं लागलं

Water accumulated in lane
PHOTO • Sanket Jain
Farmer wades through flooded lane
PHOTO • Sanket Jain

खोची गावातल्या एका गल्लीत भरलेलं पाणी आणि एक शेतकरी त्याच्या घरच्या वाटेवर

Flooded tomato fields
PHOTO • Sanket Jain
Tomatoes from submerged fields overflow into village
PHOTO • Sanket Jain

आसपासच्या पाण्यात गेलेल्या शेतांमधले टोमॅटो गावात वाहून आलेत, चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असल्यामुळे वारणा नदी ओसंडून वाहतीये

A school turned transit camp for floods
PHOTO • Sanket Jain
Vessels to store rainwater
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः अनेक कुटुंबांना खोचीच्या मराठी शाळेत हलवण्यात आलं. उजवीकडेः पुरामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि खोचीतल्या लोकांनी बाहेर भांडी ठेऊन पावसाचं स्वच्छ पाणी साठवायला सुरुवात केली आहे. ‘सगळीकडे पाणीच पाणी झालंय, पण पिता येतंय का,’ हातकणंगले पंचायत समितीचे सदस्य आणि खोचीचे रहिवासी वसंत गुरव म्हणतात. ‘२००५ सालच्या पुरात, २०० कुटुंबं बाधित झाली होती [खोचीची लोकसंख्या ५,८३२ आहे]. पण यंदा हा आकडा ४५० इतका आहे. आम्ही २००५ साली ९०० जणांची सुटका केली होती आणि दोन आठवडे आम्ही घरी परतलो नव्हतो’

Submerged sugarcane fields.
PHOTO • Sanket Jain

२७ जून रोजी, खोचीतल्या आपल्या २७ गुंठे रानात ४१ वर्षीय धनाजी वगारेंनी ऊस लावला होता. ‘एकूण १४,००० रुपये खर्च आला,’ ते सांगतात. धनाजींचा ऊस आता दिसतही नाही – सगळा पाण्याखाली गेलाय – किमान ५४ टनांचं नुकसान झाल्याचा त्यांचा अंदाज आहे. ‘पाणी ओसरल्यावर आधी रानात माती शिल्लक राहिलीये का ते पहावं लागेल. मग ती सारखी करून घ्यायची.’ रान परत वाहितीत करण्यासाठी १०,००० तरी खर्च करावा लागणार याचा त्यांना घोर लागला आहे. ऊस लावणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जं घेतली होती. आता सगळी रानंच पाण्यात गेल्यामुळे पिकं वाया गेली आहेत त्यामुळे ही कर्जं कशी फेडायची याची त्यांनी काळजी लागून राहिली आहे

अनुवादः मेधा काळे

Sanket Jain

Sanket Jain is a journalist based in Kolhapur, Maharashtra. He is a 2022 PARI Senior Fellow and a 2019 PARI Fellow.

Other stories by Sanket Jain
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale