गेली काही वर्षं दिलीप कोळी यांच्यासाठी तशी वादळीच म्हणावी लागतील - वादळं, घटती मासळी आणि मंदावलेला बाजार. तरीही २०२० च्या मार्चमध्ये सुरु झालेला लॉकडाऊन हा त्यांच्यासाठी सर्वात अवघड काळ होता.
“आम्ही आतापर्यंत एवढ्या वर्षांत भोगलेला त्रास हा या गेल्या वर्षीच्या त्रासाच्या निम्माही नव्हता”, ५० वर्षीय दिलीप सांगतात. ते मच्छीमार आहेत आणि दक्षिण मुंबईच्या कुलाब्यात कोळीवाड्यात राहतात. मासेमारी करायला लोक तयार होते, मासे खायलाही लोक तयार होते, पण (सप्टेंबर २०२० पर्यंत, टाळेबंदीमुळे) माशांची विक्री होऊ शकत नव्हती. सर्व बाजार बंद होते आणि आम्ही आणलेली मासळी आम्हाला परत समुद्रात टाकावी लागत होती.”
दिलीप गेल्या ३५ वर्षांपासून दक्षिण मुंबईच्या ससून डॉक इथे काम करत आहेत. त्यांच्या तीन बोटी आहेत आणि आठ-दहा मच्छीमार त्यांच्याकडे काम करतात. “लॉकडाऊनमध्ये निदान आम्हाला रेशन तरी मिळू शकत होतं, पण इतर गरीब मच्छीमारांकडे तर अन्नधान्य किंवा पैसा काहीच नव्हतं,” ते म्हणतात.
मच्छीमारांचा दिवस पहाटे ४ वाजता सुरु होतो. समुद्रात येऊन-जाऊन ४० मिनिटांच्या अनेक खेपा ते करतात. मान्सूनच्या महिन्यांमध्ये ते किनाऱ्यापासून फार आत जात नाहीत. भरती-ओहोटीच्या बदलाच्या वेळी ते किनाऱ्यावर तासाभराची विश्रांती घेतात आणि पुन्हा समुद्रात जातात. “आम्ही सकाळी लवकर काम सुरु करतो आणि दुपारी २ किंवा ३ वाजेपर्यंत काम संपवतो. आम्ही चंद्राच्या कलांवरून भरतीचा अंदाज बांधतो. फक्त ऐन भरती आणि ओहोटीच्या वेळी आम्ही मासेमारीसाठी जात नाही,” दिलीप सांगतात.
त्यांच्या बोटीवर काम करणारे सर्व मच्छीमार हे कोळी समुदायातील आहेत, त्यांच्यापैकी काही जण रेल्वेने किंवा भाड्याच्या वाहनाने, वाशी हवेली या गावातून जवळपास दीडशे किलोमीटर प्रवास करत दक्षिण मुंबईतील ससून डॉकपर्यंत येतात. १०४० लोकसंख्या असलेलं (जनगणना, २०११) हे गाव रायगड जिल्ह्यातील तळा या तालुक्यात आहे. तिथे ते साधारणपणे जूनपासून ऑगस्टपर्यंत म्हणजे गणपती उत्सवापर्यंत काम करतात. बाकी वर्षभर ते महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील भागांमध्ये- मुख्यतः रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जातात आणि इतर लोकांच्या बोटींवर काम करून दर महिन्याला १०,००० – १२,००० रु. मिळवतात.

रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांचं गाव असलेल्या वाशी हवेली येथील मच्छीमार मान्सूनच्या महिन्यांमध्ये ससून डॉक येथे काम करतात. अनेक जण तिथे हंगामी बोंबील माशांसाठी येतात. त्यांचं काम पहाटे ४ वाजता सुरु होतं आणि दुपारी २-३ वाजेपर्यंत आटोपतं
मे महिन्याच्या उत्तरार्धापासून ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी असते, तरीही दिलीप म्हणतात, “खाडीतील मासेमारीला [डोल जाळ्याने (मासेमारीसाठी वापरली जाणारी एक प्रकारची पारंपरिक जाळी)] परवानगी असते. आम्ही वर्षानुवर्षे हे करत आलो आहोत. आमची कुलाब्याची खाडी बोंबीलसाठी प्रसिद्ध आहे आणि हा मासा इथे फक्त जून आणि जुलैमध्येच येतो. महाराष्ट्रातील छोट्या खेड्यांमधले मच्छीमार बोंबीलसाठी इथे येतात. दोन-तीन महिन्यांसाठी कुलाबा हेच त्यांचं घर बनतं. हा चांगला उद्योग आहे.”
ससून डॉक मधल्या आपल्या मुक्कामात तो आणि इतर मच्छीमार काम करतात. “एका दिवसात मासळीतून जो काही नफा होईल, त्याचा अर्धा भाग बोटीच्या मालकाकडे जातो, तर उरलेला आमच्यामध्ये वाटून घेतला जातो”, तो सांगतो. गेल्या वर्षी तीन महिन्यांच्या काळात प्रियालचे आई-वडील दोघंही वारले. वडील कोव्हिडमुळे तर आई रक्ताच्या कर्करोगामुळे (ल्युकीमिया) मरण पावली. आईच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याने १२ वी पूर्ण न करू शकलेला हा २७ वर्षीय मुलगा जवळपास दहा वर्षांपासून मासेमारी करतोय.
“पावसाळ्यात आम्ही रोज जवळपास ७०० रुपये कमावतो, पण मागच्या वर्षी आम्हाला ५० रुपयेदेखील मिळणं मुश्कील झालं होतं. कोव्हिडमुळे आम्ही एक पूर्ण वर्षभर घरी बसून होतो”, तो पुढे सांगतो. कामाअभावी मे २०२०पर्यंत वाशी हवेलीतील मच्छीमार आणि त्यांच्या कुटुंबांकडील रेशन संपू लागलं. “जवळच्या खाडीवर जे काही मासे घावले त्यानी आम्ही पोट भरलं. पण निसर्ग वादळानंतर आम्हाला अन्न-पाणी मिळणंदेखील मुश्कील झालं होतं. आजवर इतकं वाईट वर्ष [२०२०] काही पाहिलं नव्हतं”, प्रियाल म्हणतो.
निसर्ग वादळ ३ जून, २०२० रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये येऊन धडकलं. “आमच्याकडे एक महिना वीज नव्हती. फोन चालू नव्हता. आमची घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती आणि आम्हाला सरकारकडून काहीही भरपाई मिळाली नाही,” प्रियाल सांगतो. तो आणि त्याचा मोठा भाऊ चंद्रकांत (तोही मच्छीमार आहे) राहत असलेल्या घराच्या पुनर्बांधणीसाठी त्यांना मित्रांकडून ४०,००० रुपये उधार घ्यावे लागले.


हातात खेकडा घेतलेले दिलीप कोळी: “संकटकाळी शेतकऱ्यांना शासनाकडून निदान काहीतरी भरपाई मिळते. पण शेतकरी आणि मच्छीमार हे दोघेही भावांसमान असले तरीही मच्छीमारांना मात्र काहीच मिळत नाही.”
त्यानंतर १४ मे २०२१ मध्ये आलेलं तौक्ते वादळ. “आमच्या होड्या भरतीमध्ये उद्ध्वस्त झाल्या. आमचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. सरकार आम्हाला केवळ काही हजार रुपये देऊन लोकांच्या नजरेत चांगलं ठरायला बघतंय का? मच्छीमार [याबद्दल] अजूनही संतापलेले आहेत,” दिलीप संगतात. त्यांची तीनही मुलं मच्छीमार आहेत आणि पत्नी भारती, वय ४९, ससून डॉकमध्ये किरकोळ मासेविक्री करतात. (पहा: Koli women: fish, friendship and fighting spirit ) “एरव्हीसुद्धा ते आम्हा कोळी बांधवांसाठी काहीच करत नाहीत”, ते म्हणतात, “पण अशा वादळांच्या काळात तरी आम्हाला संपूर्ण भरपाई मिळाली पाहिजे”.
या संकटांमध्ये भर म्हणून मासळी घटत चालली आहे. “मी तरुण असताना मासळीला भाव कमी होता, पण [बोटीसाठी] डीझेलची किंमतही लिटरमागे २० रुपये होती. आता डिझेलची किंमत १०० रुपयांवर पोचली आहे आणि मासळी घटत चालली आहे”, दिलीप म्हणतात.
मच्छीमारांच्या जाळ्यांत आता सुरमई, पापलेट आणि तारली (पेडवे) असे लोकप्रिय मासे घावतच नाहीत. २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरच्या बंदरात येणाऱ्या एकूण मासळीत मागच्या वर्षीपेक्षा ३२% घट झाली आहे, अशी नोंद केंद्रीय सागरी मासेमारी संशोधन संस्थेने केली आहे. या अहवालात ही घट होण्यामागचं कारण त्या वर्षी भारताच्या सभोवताली आलेली चक्रीवादळं असल्याचं म्हटलं आहे. यांपैकी सहा वादळं अतिशय तीव्र होती.
“आमची उपजीविका पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे”, दिलीप म्हणतात. “जर निसर्गाने आम्हाला साथ दिली नाही तर आम्ही आमचं काम आणि जीव दोन्ही गमावून बसू.”
भरीस भर, कोव्हिड-१९ च्या महामारीत, ससून डॉकमधील मच्छीमार त्या वादळाशीही झुंज देत आहेत.

मान्सूनच्या महिन्यांमध्ये दिवसभरात जाऊन-येऊन ४० मिनिटांच्या खेपा करत, मच्छीमार अंदाजे ४००-५०० किलो मासळी आणतात. १०-१२ तासांमध्ये अशा अनेक फेऱ्या करतात

मच्छीमार सांगतात की जेलीफिश पुन्हा समुद्रात फेकून दिले जातात कारण त्यांचा दुर्गंध येतो आणि भारतात बहुदा कोणीच हा मासा खात नाही.

रामनाथ कोळी, वय ३४ वर्षं, १० वर्षांपासून मासेमारी करतायत, जाळ्यामध्ये आलेला समुद्री साप दिसतोय. “आम्हाला दिवस-रात्र काम करावं लागतं. कामाचे काही निश्चित तास नाहीत आणि उत्पन्नदेखील अस्थिर आहे,” ते सांगतात.

नारायण पाटील, वय ४९ वर्षं, यांच्या तिघी मुली आणि एक मुलगा वाशी हवेली गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत. ते जवळजवळ २० वर्षांपासून मासेमारी करतायत. ते म्हणतात, “माझ्या मुलांनी या धंद्यात यावं असं मला अजिबात वाटत नाही.”

जास्त मासळी घावेल या शोधात समुद्रातील पुढच्या थांब्याकडे निघालेले मच्छीमार.

रामनाथ कोळी पाण्याखाली सूर मारतात आणि जाळं अर्ध्यातून विभागतात, ज्यामुळे माशांचं वजन दोन्ही बाजूंना समान रीतीने पसरतं आणि जाळं बोटीत पुन्हा ओढणं सोपं जातं

माशांची जाळी पाण्यातून पुन्हा बोटीत ओढण्यासाठी त्यांना सर्व शक्ती पणाला लावावी लागते

जाळ्यातील मासे बोटीत एका कोपऱ्यात ओतले जातात

दुसऱ्या एका बोटीतून तरुण मुलं मच्छीमारांकडे पाहतायत

किनाऱ्यापासून समुद्रात फार लांब न जाता पुन्हा परतीची फेरी पूर्ण करायला अंदाजे ४० मिनिटं लागतात

गौरव कोळी, वय २६, सांगतो की त्याला कायमच मच्छीमार बनण्याची इच्छा होती. त्याने १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि तेव्हापासून वडील, दिलीप कोळी यांच्याबरोबर तो काम करतोय

हर्षद कोळी (सर्वात पुढे, पिवळ्या टी-शर्टमध्ये), वय १९, याने तीन वर्षांपूर्वी दहावी पूर्ण केली आणि तेव्हापासून मासेमारी करतोय. त्याच्या कुटुंबाची वाशी हवेली गावात एक बोट आहे पण, तो म्हणतो, “तिथे गिऱ्हाईक नाहीत, म्हणून मी इथं [मुंबईत] काम करायला आलो

खरेदीदार आणि लिलाव करणारे धक्क्यावरती माशांच्या नावांची आतुरतेने वाट पाहताना

मासे विक्रेत्यांनी बर्फात साठवलेली वेरली

मासे विक्रेत्यांपैकी काहीजण पालघर जिल्ह्यातून घाऊक विक्रेत्यांच्या शोधात आले आहेत

ससून डॉकमधील एका रिकाम्या जागेत कोळणी ताजी कोलीम सुकवण्यासाठी उन्हात पसरवतायत

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील कुशल कामगार जून ते ऑगस्ट दरम्यान माशांची जाळी दुरुस्त करून देण्यासाठी मुंबईतील ससून डॉक येथे येतात आणि रोज ५००-६०० रुपये कमाई करतात

कोव्हिड-१९ महामारीच्या आधी ससून डॉक सकाळी ४ वाजल्यापासून मच्छीमार, मासे विक्रेते, नावाडी आणि इतर कामगार अशा गर्दीने गच्च भरलेले असे. मार्च २०२० मध्ये सुरु झालेल्या लॉकडाऊनपासून या जागेत क्वचितच गर्दी दिसली असेल