हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.
वाळवंटातल्या नेहमीचा मारामारीचा सुप्रसिद्ध प्रसंग. वाळूच्या टेकड्या आणि मधल्या दऱ्या, अधून मधून थोडी फार झुडपं, या पडक जमिनीवर तापत्या रेतीतून एकदम हिरो उगवतो आणि दुष्टांचा मारून खात्मा करतो. निसर्गाच्या कृपेने आधीच हवा तापलीये, त्यात आणखी भर घालत तो सिनेमाचा अखेर सुखान्त करतो (अर्थात खलनायकांची गोष्ट वेगळी आहे.) असंख्य भारतीय सिनेमांमध्ये हे असे प्रसंग चित्रित झाले आहेत, राजस्थानच्या कुठल्या तरी काना कोपऱ्यात किंवा अगदी मध्य प्रदेशातल्या चंबळच्या खोऱ्यात.
फरक इतकाच, की रेताड प्रदेशातला हा प्रसंग (चित्रफीत पहा) राजस्थान किंवा चंबळमधल्या कुठल्याही स्थळांवर चित्रित झालेला नाही. त्याचं चित्रीकरण झालंय दक्षिणेकडे दूरवर, आंध्र प्रदेशातल्या रायलसीमामध्ये. आणि हे विशिष्ट ठिकाण म्हणजे अनंतपूर जिल्ह्यातला – कधी काळी जिथे वेगवेगळी तृणधान्यं पिकवली जायची तो – १००० एकरचा प्रदेश. गेल्या अनेक दशकांत दिवसेंदिवस या भागाचं जास्तीत जास्त वाळवंट होत चाललं आहे. आणि याला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये अनेकदा विरोधाभास दिसून येतो – पण त्यातून असा प्रदेश निर्माण झालाय की चित्रपट निर्माते इथे चित्रीकरणासाठी स्थळं शोधणाऱ्या आपल्या एजंट्सना पाठवू लागलेत.
दर्गा होन्नूर गावात, जिथे या प्रदेशातले सर्वात जास्त जमीनमालक राहतात, तिथे आम्ही कोणत्याही सिनेमासाठी जागा शोधायला आलो नाही यावर कुणाचा विश्वास बसेना. “कोणत्या पिक्चरसाठी? कधी येणार हा सिनेमा?” कधी उघडपणे विचारलेला नाही तर लोकांच्या मनात असलेला हा प्रश्न होता. आम्ही पत्रकार आहोत हे समजल्यावर काही जणांचा उत्साह लागलीच मावळलेला कळत होता.
ही जागा एकदम प्रसिद्धीच्या झोतात येण्याचं कारण ठरलेल्या – जयम मनदे रा (विजय आपलाच आहे) – या सिनेमातले मारामारीचे प्रसंग १९९८-२००० च्या काळात इथेच चित्रित झाले होते. आणि व्यावसायिक सिनेमातल्या कोणत्याही चोखंदळ चित्रपट निर्मात्याप्रमाणे त्यांनी वाळवंटाचा प्रभाव वाढावा यासाठी आपल्या या ‘सेट’मध्ये थोडे फेरफार केले. “आम्हाला आमची पिकं उपटून टाकावी लागली (ज्यासाठी त्यांनी आम्हाला भरपाई दिली),” ४५ वर्षीय पुजारी लिंगण्णा सांगतात. जिथे मारामारीचा हा प्रसंग चित्रित झाला तिथली ३४ एकर जमीन त्यांच्या मालकीची आहे. “आम्ही बाकी थोडा झाडोरा आणि छोटी झाडंही काढून टाकली, ज्याने ते अजूनच खरं वाटावं.” कॅमेऱ्याची चलाखी आणि काही फिल्टरचा खुबीने केलेला वापर यामुळे बाकी सगळं काम झालं.
जयम मनदे राच्या निर्मात्यांना जर बीस साल बाद भाग २ तयार करायचा असेल तर एवढेही कष्ट घ्यावे लागणार नाहीत. काळ आणि निसर्गाची हानी आणि सातत्याने होत असेला मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांना हवं असलेलं खरंखुरं वाळवंट आज इथे तयार झालंय.
शुष्क वाळवंटी प्रदेशातला हा प्रसंग (चित्रफीत पहा) राजस्थान किंवा चंबळमधला नाही. त्याचं चित्रीकरण झालंय दक्षिणेकडे दूरवर, आंध्र प्रदेशातल्या रायलसीमामध्ये
हा एक आगळाच वाळवंटी प्रदेश आहे. तिथे अजूनही शेती होते – कारण अजूनही जमिनीत लगेच पाणी लागतं. “इथे अगदी १५ फुटांवर पाणी लागतं,” लिंगण्णांचा मुलगा पी. होन्नूरेड्डी सांगतो. अनंतपूरच्या बहुतेक भागांमध्ये ५००-६०० फुटांवरही पाणी लागत नाही. जिल्ह्याच्या काही भागात तर लोक अगदी १००० फुटांहून खोल पोचलेत. इथे मात्र चार इंची बोअरवेलमधून पाणी उसळून बाहेर येत होतं. हे एवढं पाणी, जमिनीच्या इतकं लगत, तेही या तप्त वालुकामय भागात?
“हा सगळा भाग विस्तृत नदी किनाऱ्याचा पट्टा आहे,” जवळच्याच गावातले शेतकरी असणारे पालथुरू मुकण्णा सांगतात. नदी? आम्हाला तर काहीच खूण पटेना. “त्यांनी [अंदाजे पाच] दशकांपूर्वी, होन्नूरहून अंदाजे २५-३० किलोमीटरवर, इथून वाहणाऱ्या वेदवती नदीवर एक धरण बांधलं. आणि आमच्या पट्ट्यातली वेदवती तुंगभद्रेची उपनदी – हिला अघरी असंही नाव आहे) चक्क सुकली.”
“खरंच हे असंच घडलंय,” (अनंतपूरच्या रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या) परिस्थितिकी केंद्राचे मल्ला रेड्डी म्हणतात – दुसरं कुणालाच त्यांच्याइतकी या प्रदेशाची जाण नाही. “आणि नदी जरी मृत झाली असली तरी शतकानुशतकं या नदीमुळे जमिनीच्या पोटात पाण्याचा साठा तयार झाला आहे जो आता सतत उपसला जात आहे. आणि अशा वेगाने की आगामी काळातल्या संकटाची घंटा वाजू लागली आहे.”
आणि हे संकट फार दूर नाही. “वीस वर्षांपूर्वी इथे एखादीही बोअरवेल नव्हती,” वाळंवटीकरण झालेल्या प्रदेशात १२.५ एकर शेतजमीन असणारे ४६ वर्षांचे व्ही. एल. हिमाचल सांगतात. “सगळी शेती पावसाच्या पाण्यावर होती. आता या १००० एकरामध्ये ३०० ते ४०० बोअर असतील. आणि आम्हाला ३०-३५ फुटांवर कधी थोडं जास्त खोल गेलं की पाणी लागतंय.” म्हणजे तर तीन एकर किंवा जरा कमी भागात एक बोअर.
हे प्रमाण खूप जास्त आहे, अगदी अनंतपूरसाठीही. मल्ला रेड्डी सांगतात त्याप्रमाणे, अनंतपूरमध्ये “२,७०,००० बोअरवेल आहेत आणि जिल्ह्याची क्षमता खरं तर ७०,००० इतकीच आहे. आणि या प्रचंड संख्येने असणाऱ्या बोअरवेलपैकी निम्म्या या वर्षी कोरड्या पडल्या आहेत.”
तर मग या शापित भूमीत बोअरवेल्सचं काम काय? आणि शेती तरी कशाची चालू आहे? आम्ही ज्या प्रदेशाचा धांडोळा घेत होतो तिथे जमिनीतून बाजरीची पाती उगवली होती, या जिल्ह्यात सर्वत्र आढळणारा भुईमूग नव्हता. बीजवर्धनासाठी इथे बाजरी पिकवली जाते. तीही खाण्यासाठी किंवा बाजारात विकण्यासाठी नाही तर तर बियाणे कंपन्यांसाठी, ज्यांनी या कामासाठी शेतकऱ्यांना कंत्राटं दिली आहेत. इथे नीटस सरींमध्ये नर आणि मादी रोपं लावलेली दिसतील. बियाणे कंपन्या बाजरीच्या दोन भिन्न वाणांपासून संकरित वाण तयार करत आहेत. या सगळ्यासाठी प्रचंड पाणी लागणार. आणि बीज काढून घेतल्यानंतर जी काही धाटं उरतील त्याचा जास्तीत जास्त चारा म्हणून उपयोग होऊ शकतो.
“आम्हाला बियाण्याची नकल तयार करण्यासाठी क्विंटलमागे ३,८०० रुपये मिळतात,” पुजारी लिंगण्णा सांगतात. यातले श्रम आणि निगा पाहता ते कमीच आहेत असं म्हणावं लागेल – आणि परत याच शेतकऱ्यांना याच कंपन्या हेच बियाणं भरमसाठ किंमतीला विकणार. याच भागातल्या अन्य एक शेतकरी वाय. एस. शांतम्मा सांगतात की त्यांच्या कुटुंबाला क्विंटलमागे ३,७०० रुपये मिळतात.
शांतम्मा आणि त्यांची मुलगी वंदाक्षी
सांगतात की इथे शेतीसाठी पाण्याची अडचण नाही. “आम्हाला तर घरी नळ नसला तरी गावात
पाणी मिळतं.” त्यांची डोकेदुखी म्हणजे ही रेती- मुळातच प्रचंड प्रमाणात रेती आहेच –
जी झपाट्याने जमा होऊ शकते. आणि मग फारसं अंतर नसलं तरी अनेक फूट रेती पार करत
जाणं फार दमवणारं होऊन बसतं.
“तुमची सगळी मेहनत पाण्यात जाते,” मायलेकी सांगतात. पी. होन्नूरेड्डी दुजोरा देतात. एका रेतीच्या टेकाडाखाली त्यांनी रोपांसाठी मेहनतीने सरी पाडलेल्या ते आम्हाला दाखवतात – तेही अगदी चारच दिवसामागे. आता हे दृश्य म्हणजे रेतीत ओढलेल्या रेघोट्यांसारखं झालंय. अधिकाधिक शुष्क होत चाललेल्या या प्रदेशात वोगवान वारे वाहतात आणि धुळीची वादळं येतात.
“वर्षातले तीन महिने – या गावात रेतीचा पाऊस पडतो,” वाळवंटी प्रदेशातील आणखी एक शेतकरी एम. बाशा सांगतात. “रेती आमच्या घरात येते, आमच्या अन्नात मिसळते.” वाळूच्या टेकड्यांजवळ नसणाऱ्या घरांमध्येही रेती येते. जाळ्या किंवा जास्तीच्या दरवाजांचाही उपयोग होत नाही. “ इसाका वर्षम (रेतीचा पाऊस) आता आमच्या जगण्याचा भाग झालाय, आम्ही तसंच जगतोय.”
रेती काही द. होन्नूर गावाला नवीन नाही. “हां, पण रेतीचा जोर मात्र वाढलाय,” हिमाचल म्हणतात. वाऱ्यांना अडथळा ठरणारा झाडझाडोरा आणि छोटी झाडं आता दिसेनाशी झाली आहेत. जागतिकीकरण आणि बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेचा परिणाम काय आणि कसा याचं ज्ञान हिमाचल यांच्या बोलण्यातून समोर येतं. “आता आपण सगळ्या गोष्टी पैशात मोजतो. झुडपं, झाडोरा आणि झाडं नष्ट झाली कारण लोकांना व्यापारी शेतीसाठी जमिनीचा इंच न् इंच वापरायचाय.” आणि “जर का बी उगवणीच्या किंवा फुलोऱ्यात असताना रेती भरली तर,” ५५ वर्षीय शेतकरी एम. तिप्पय्या सांगतात, “सगळंच बरबाद.” पाणी असलं तरी उतारा कमी पडतो. “आम्हाला एकरी तीन क्विंटल, जास्तीत जास्त चार क्विंटल भुईमूग होतो,” ३२ वर्षांचा तरूण शेतकरी के. सी. होन्नूर सांगतो. भुईमुगाचं जिल्ह्याचा सरासरी उतारा पाच क्विंटलपर्यंत आहे.
मग या नैसर्गिक वारा थोपवणाऱ्या
अडथळ्यांचं त्यांना महत्त्व नाही का? “ज्यात पैसा आहे अशीच झाडं ते आता लावणार,”
हिमाचल म्हणतात. इथल्या वातावरणाशी मिळतीजुळती नसल्याने ती इथे वाढणारच नाहीत.
“आणि तसंही, अधिकारी लोक आम्हाला सांगत राहतात की ते आम्हाला झाडांच्या बाबतीत मदत
करतील म्हणून, पण ते काही झालेलं नाही.”
“काही दिवसांपूर्वी,” पालथुरू मुकण्णा सांगतात, “पाहणीसाठी अनेक सरकारी अधिकाऱ्यांचा ताफा इथे आला.” पण वाळवंटाची ही सफर त्यांच्या गळ्याशी आली. त्यांची एसयूव्ही गाडी रेतीत रुतली आणि शेवटी गावकऱ्यांना ट्रॅक्टरला जुंपून ती बाहेर काढावी लागली. “तेव्हापासून आम्हाला त्यांच्यातले अजून कुणी इथे दिसलेले नाहीत,” मुकण्णा पुढे सांगतात. कधी कधी तर अशी गत असते, शेतकरी असणारे मोखा रमेश म्हणतात, “बस इथून पलिकडे गावात जाऊ शकत नाही.”
झुडपं आणि जंगलं नष्ट होणं हा अख्ख्या रायलसीमा प्रदेशाचा प्रश्न आहे. एकट्या अनंतपूर जिल्ह्यात ११ टक्के भूभाग ‘वन’ म्हणून वर्गीकृत आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ २ टक्के क्षेत्रावर वन आहे. त्याचा माती, हवा, पाणी आणि तापमानावर अटळ परिणाम झाला आहे. अनंतपूरमध्ये मोठालं जंगल दिसतं ते फक्त पवनचक्क्यांचं – ज्या इथे हजारोंच्या संख्येत आहेत – नजर जाईल तिथे त्या दिसतात, या छोटेखानी वाळवंटाच्या सीमेवरही. पवनचक्की कंपन्यांनी विकत किंवा दीर्घ मुदतीच्या भाडेकराराने घेतलेल्या जमिनींवर या उभारल्या आहेत.
द. होनूरमध्ये या वाळवंटी भागात शेती करणारे मात्र आम्हाला पटवण्याचा प्रयत्न करतात की पूर्वीपासून हे असंच आहे. पुरावे म्हणून ते जे सांगतात ते मात्र याच्या अगदी विरुद्ध आहेत. रेती इथे कायमच होती, हो. मात्र तिचा वाहण्याचा वेग, ज्यामुळे वादळं निर्माण होतायत तो वाढलाय. आधी झुडपं आणि झाडोरा जास्त होता. आता अगदी थोडा आहे. त्यांच्याकडे कायम पाणी होतंच, हो, पण एक नदी सुकली हे आम्हाला नंतर समजतं. किंवा वीस वर्षांपूर्वी इथे मोजक्याच बोअरवेल होत्या आणि आता शेकडो आहेत हेही. गेल्या वीस वर्षांत हवामान लहरी होत चालल्याच्या घटना वाढत चालल्याचं मात्र प्रत्येकाच्याच आठवणीत आहे.
पाऊसमान बदललंय. “ज्या वेळी आम्हाला पाऊस हवा असतो त्याचा विचार केला तर मी म्हणेन ६०% कमी झालाय पाऊस,” हिमाचल म्हणतात. “गेली काही वर्षं उगाडीच्या [तेलुगु नव वर्ष दिन, शक्यतो एप्रिल महिन्यात] आसपास पाऊस कमी झालाय.” अनंतपूरला नैऋत्य आणि ईशान्य मोसमी वारे हलकेच स्पर्शून जातात मात्र दोन्हीपैकी कुणाचाच पूर्ण लाभ या क्षेत्राला मिळत नाही.
अगदी ज्या वर्षी जिल्ह्यात वर्षाच्या सरासरीइतका ५३५ मिमी पाऊस पडला – तरी त्याची वेळ, व्याप आणि प्रकार प्रचंड लहरी बनत चाललंय. गेल्या काही वर्षात पाऊस पिकांच्या हंगामात न पडता पिकं नसताना पडतोय. कधी कधी पहिल्या २४-४८ तासात प्रचंड पाऊस कोसळतो आणि त्यानंतर मोठी ओढ देतो. गेल्या साली काही मंडलांमध्ये हंगामातले (जून ते ऑक्टोबर) तब्बल ७५ दिवस कोरडे गेले. अनंतपूरची ७५ % लोकसंख्या ग्रामीण भागात वसते आणि एकूण कामकऱ्यांपैकी ८० टक्के कामगार शेतीत (शेतकरी किंवा शेतमजूर म्हणून) गुंतलेले असताना याचे परिणाम घातक ठरतात.
“गेल्या दोन्ही दशकांमध्ये अनंतपूरमध्ये खरोखर ‘नॉर्मल’ पावसाची अशी दोनच वर्षं म्हणता येतील,” परिस्थितिकी केंद्राचे मल्ला रेड्डी सांगतात. “बाकीच्या १६ वर्षांपैकी प्रत्येक वर्षी जिल्ह्याचा दोन तृतीयांश किंवा तीन चतुर्थांश भाग दुष्काळग्रस्त जाहीर केला गेला आहे. याआधीच्या २० वर्षांचा काळ पाहिला तर दोन्ही दशकात तीन वर्षं दुष्काळी होती. १९८० च्या सुमारास सुरू झालेले बदल दर वर्षी वेग पकडत आहेत.”
जो जिल्हा पूर्वी विविध तऱ्हेच्या तृणधान्यासाठी ओळखला जात होता आता जास्तीत जास्त भुईमुगाकडे वळलाय. आणि त्यामुळेच बोअरवेल खोदण्याचं प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढलंय. (राष्ट्रीय कोरडवाहू प्रदेश प्राधिकरणाच्या अहवालानुसार “काही प्रभाग असे आहेत जिथे भूजलाचा वापर १०० टक्क्यांच्या वर गेला आहे.”)
“चाळीस वर्षांपूर्वी आमची नीट घडी बसली होती – १० वर्षांत तीन दुष्काळ – त्यामुळे शेतकऱ्यांना काय पीक घ्यायचं हे माहित होतं. नऊ ते बारा विविध प्रकारची पीकं होती आणि निश्चित अशी पीकपद्धत होती,” सी. के. ‘बबलू’ गांगुली सांगतात. या भागातल्या ग्रामीण गरिबांच्या आर्थिक विकासासाठी गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या टिंबक्टू कलेक्टिव्हचे ते प्रमुख आहेत. गेली चाळीस वर्षं इथे कार्यरत असल्यामुळे त्यांना इथल्या शेतीविषयी मोलाचं ज्ञान प्राप्त झालं आहे.
“भुईमुगाने [अनंतपूरच्या लागवडीखालील क्षेत्राच्या ६९%] आफ्रिकेत साहेलमध्ये जे केलं, तेच आता आपल्यासोबत घडतंय. एकच पीक घेण्याच्या पद्धतीमुळे आपण फक्त पाण्याशी खेळ केला नाही. भुईमुगाला सावली चालत नाही, त्यामुळे लोकांनी झाडं काढून टाकली. अनंतपूरच्या मातीची वाट लागली. तृणधान्यांचा नाश झाला. ओलच हरपलीये, त्यामुळे आता परत कोरडवाहू शेतीकडे वळणं अवघड झालं आहे.” पीकपद्धतीत झालेल्या बदलांमुळे स्त्रियांचं शेतीतलं महत्त्व कमी झालं. पूर्वापार रचनेत त्या इथल्या कोरडवाहू शेतीतल्या अनेक बी-बियाण्याच्या संरक्षक-वाहक होत्या. मात्र अनंतपूरमध्ये शेतकऱ्यांनी बाजारात जाऊन नगदी पिकांचं संकरित बियाणं विकत घ्यायला सुरुवात केली (उदा. भुईमूग), आणि स्त्रियांचं स्थान शेतमजुरांपुरतं मर्यादित झालं. आणि त्यासोबतच गेल्या दोन पिढ्यांमध्ये इथल्या शेतकऱ्यांचं एकाच रानात विविध प्रकारची दुबार तिबार पिकं घेण्याची अत्यंत गुंतागुंतीची कला आणि कौशल्यंही लोप पावली.
पिकाखालच्या क्षेत्राच्या केवळ ३ टक्के भागात आता चाऱ्याची पिकं घेतली जात आहेत. “अनंतपूरमध्ये एके काळी देशातली सर्वात जास्त बारीक जितराब होतं,” गांगुली सांगतात. “हे लहान जितराब म्हणजे पारंपरिक पशुपालक असणाऱ्या कुरुबांसारख्या प्राचीन समुदायांसाठी सर्वोत्तम संपत्ती – खेळतं भांडवल – होती. पारंपिरक चक्र कसं होतं की पशुपालक त्यांचे कळप शेतकऱ्याच्या रानात बसवायचे आणि त्यातून लेंडी आणि मूत्राचं खत मातीला मिळत असे – पण बदलत्या पीक पद्धतीमुळे आणि रासायनिक शेतीमुळे हे चक्र पार मोडून गेलं आहे. या भागासाठी करण्यात आलेलं नियोजन इथल्या वंचितांच्या जिवावर उठलं आहे.”
होन्नूरच्या हिमाचल यांना त्यांच्या आसपासचं जैववैविध्य कमी होत असल्याचं जाणवतंय आणि त्याचे परिणामही. “कधी काळी, अगदी या गावात आम्ही काय काय घेत होतो, बाजरी, चवळी, तूर, नाचणी, वरी, हिरवा मूग, रानातल्या शेंगा...” ते भली मोठी यादी सांगतात. “अशी शेती सोपी असली तरी कोरडवाहू शेतीत हातात पैसा येत नाही.” भुईमुगात तो आहे, किमान काही काळासाठी.
भुईमुगाचं पीक ११० दिवसांचं आहे. त्यातही जमिनीची धूप होऊ नये म्हणून मातीवरचं पानांचं आच्छादन फक्त ६०-७० दिवसांसाठीच असतं. जेव्हा नऊ वेगवेगळी तृणधान्यं घेतली जात होती तेव्हा दर वर्षी जून ते फेब्रुवारी या काळात मातीचा वरचा सुपीक थर आच्छादित राहत असे, कारण रानात कोणतं ना कोणतं पीक असेच.
तिथे होन्नूरमध्ये, हिमाचल विचारात गढून गेलेत. त्यांना माहित आहे की बोअरवेल आणि नगदी पिकांमुळे शेतकऱ्यांचा खरंच मोठा फायदा झालाय ते. मात्र त्याला उतरती कळा लागलेली त्यांनी पाहिलीये आणि पोटासाठी गाव सोडून बाहेर जाणाऱ्यांची वाढती संख्यादेखील. “वर्षाच्या कोणत्याही वेळी बाहेर काम शोधणारी किमान २०० कुटुंबं तरी तुम्हाला भेटतील,” हिमाचल म्हणतात. २०११ च्या जनगणनेनुसार अनंतपूरच्या बोम्मनहाळ मंडलातल्या या गावात १२२७ कुटुंबांची नोंद झालीये. म्हणजे दर सहातलं एक कुटुंब. “इथली जवळ जवळ ६०-७० टक्के कुटुंब कर्जात आहेत,” ते पुढे सांगतात. गेल्या दोन दशकांमध्ये अनंतपूरमध्ये शेतीवरचं संकट गहिरं होत चाललं आहे – आणि आंध्र प्रदेशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या याच जिल्ह्यात झाल्या आहेत.
“बोअरवेलची चलती होती तो काळ आता गेला,” मल्ला रेड्डी म्हणतात. “तसंच नगदी पिकांची आणि एक पिकाच्या शेतीचीही सद्दी संपली.” अर्थात तिन्ही गोष्टी अजूनही फोफावतायत कारण उत्पादनापासून उपभोगाकडे झालेल्या स्थित्यंतरामुळे “अपरिचित बाजारांसाठी वस्तूंचं उत्पादन सुरू आहे.”
वातावरणातले बदल म्हणजे निसर्गाने सगळं नव्याने सुरू करण्याचा खटका ओढला असं जर मानलं तर मग होन्नूर आणि अनंतपूरमध्ये आमच्या नजरेस पडलं ते काय होतं? शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की वातावरणातले बदल फार मोठ्या नेसर्गिक प्रदेशांमध्ये आणि भूभागांमध्ये होतात – होन्नूर आणि अनंतपूर ही तर केवळ प्रशासकीय एककं आहेत, म्हणजे खरं तर छोट्या ठिपक्यांहून छोटी, त्यामुळे या व्याख्येत खरं तर न बसणारी. पण जेव्हा मोठ्या, विस्तृत भूभागामध्ये काही बदल होतात तेव्हा त्या बदलांमुळे तिथल्या छोट्या क्षेत्रांमध्ये विचित्र काही तरी घडू लागतं असं काही होऊ शकतं का?
इथे जे काही बदल घडून आलेत त्या सगळ्याला मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. ‘बोअरवेलची साथ’, व्यापारी आणि एक पिकाच्या शेतीचा अवलंब, वातावरणातील बदलांविरोधात अनंतरपूरसाठी संरक्षक ठरू शकणाऱ्या जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचा सततचा उपसा, या निमशुष्क प्रदेशातलं जे काही थोडं वनाच्छादन होतं त्याचा ऱ्हास, गायरानावर आधारित परिस्थितिकी धोक्यात येणं आणि मातीचा स्तर प्रचंड खालावणं, उद्योगांमुळे फोफावलेली रासायनिक शेती, रान आणि शिवाराचं, मेंढपाळ आणि शेतकऱ्याचं परस्परावर अवलंबून असलेलं नातं आणि उपजीविकांचा लोप, नद्यांचं मृत होणं. या सर्वांचा तापमानावर, हवामानावर आणि वातावरणावर थेट परिणाम झालाय – आणि ज्यामुळ उलट याच सगळ्या प्रक्रिया वेगाने घडत आहेत.
जर अर्थशास्त्राच्या आणि विकासाच्या चुकलेल्या प्रारुपावर आधारित मानवी कुत्यामुळे जर हे सगळे बदल आपल्याला भोगावे लागत असतील तर मात्र देशाच्या या आणि अशाच इतर प्रदेशांकडून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे.
“कदाचित आपल्याला या बोअरवेल बंद कराव्या लागतील आणि कोरडवाहू शेतीकडे परत वळावं लागेल,” हिमाचल म्हणतात. “अर्थात, हे फार अवघड आहे.”
पी. साईनाथ पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाचे संस्थापक संपादक आहेत.
साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा पारीचा देशपातळीवरचा हा प्रकल्प संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया zahra@ruralindiaonline.org शी संपर्क साधा आणि namita@ruralindiaonline.org ला सीसी करा.
शीर्षक छायाचित्रः राहुल एम./पारी
अनुवादः मेधा काळे