कलावती बंदुरकर यांनी त्यांच्या पाचही नातवंडांच्या वेळी लेकींची घरीच बाळंतपणं केलीयेत. त्यांच्या लग्न झालेल्या लेकींची आर्थिक स्थिती त्यांच्याइतकीच बिकट आहे आणि दवाखान्याचा खर्च त्यांना परवडणारा नाही. त्यामुळे मग ते काम त्यांनी स्वतःच केलंय. आम्ही त्यांना भेटायला गेलो तर त्यांच्या घरी १० माणसं रहायला होती. त्या सगळ्यांचं पहायचं वर पिकेनाशी होत असलेली नऊ एकर शेती कसायची आणि दुसऱ्यांच्या रानात ३० रुपये रोजाने कामाला जायचं. काहीच काम नसतं, जसं की आता आहे, तेव्हा जळण गोळा करून आणि विकून त्या दिवसाला फक्त २० रुपये कमावतायत. त्यांच्या म्हशीचं दूध हा त्यांच्याकडचा काही तरी कमाई करण्याचा शेवटचा मार्ग.

त्या सांगतात की त्यांनी त्यांच्या चौथ्या लेकीचं लग्न कसलाही खर्च न करता केलं. आणि आता पाचव्या लेकीचं लग्नही “जास्त काही खर्च न करता जमतंय का” त्याचा प्रयत्नात त्या आहेत. कलावती विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावच्या रहिवासी आहेत. त्यांना सात लेकी आणि दोन लेक आहेत. गेल्या १४ वर्षांत देशभरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि लाखभराहून जास्त स्त्रियांना वैधव्य आलं, त्यातल्याच त्या एक.

नुकसान भरपाई नाही

“मला एका पैशाची भरपाई मिळाली नाही जी,” चेहऱ्यावर कायमचं हसू आणि रोखठोक स्वभावाची ही आजी सांगते. आणि याचं कारण कायः त्या जी जमीन कसतात ती त्यांची स्वतःच्या मालकीची नसून, दुसऱ्यांकडून खंडाने कसायला घेतली आहे. त्यामुळे जेव्हा त्यांचे पती परशुराम यांनी कर्जाचा विळखा आणि नापिकीमुळे स्वतःचं जीवन संपवलं तेव्हा त्यांचा मृत्यू आत्महत्या म्हणून नोंदवला गेला, मात्र “शेतकरी आत्महत्या” म्हणून नाही. यामागचा सरकारी तर्कः जर त्यांच्या नावावर जमीन नाहीये, तो शेतकरी नाही. मात्र या कुटुंबाला विदर्भ जन आंदोलन समितीकडून थोडीफार मदत मिळाली आहे.

PHOTO • P. Sainath

परशुराम यांच्यावर ५०,००० रुपयांचं कर्ज होतं, ज्यापायी त्यांनी अगदी “माझं मंगळसूत्रही गहाण ठेवलं. दुसरा काय पर्याय होता? शेती संकटात आली आणि आमचे सगळे खर्च वाढले.” मात्र त्यानेही भागलं नाही. त्यांच्या नऊ एकरातून केवळ चार क्विंटल माल झाला ज्याचे ७००० रुपये आले. ज्या दिवशी त्यांनी कपास विकली, आधी जाऊन बायकोचं मंगळसूत्र सोडवून आणलं, शेतात गेले आणि स्वतःचं जीवन संपवलं. कलावतींनी कायमच घरच्या कमवत्या होत्या, मागे हटल्या नाहीत. “शेती करणंच आमचं काम आहे,” कोणत्याही अजीजीशिवाय त्या सांगतात. “आम्ही ती करत राहणार.” त्यांनी काम करून बहुतेक कर्जं फेडली आहेत. स्थानिक दुकानदाराकडचं कर्ज त्यांनी कोणतंही व्याज न देता फेडलं. “आता नातेवाइकांचे १५ हजार बाकी आहेत, त्याच्यावर व्याज तर नाही ना.”

“नाही जी, मी कोणच्या बचत गटात नाही. महिन्याला २० रुपये भरणं मला परवडत नाही ना.” त्यांच्या लेकींपैकी चौघींची लग्नं झालीयेत. तिघींची परशुराम हयात असताना. मात्र त्यातली एक माघारी आलीये. आणि बाकी तिघी बाळंतपणासाठी माहेरी आल्या आहेत.

“माझी लेक मालता आणि मी,” त्या सांगतात, “कमावणाऱ्या आम्ही दोघीच.” दोघीत मिळून त्या सध्या जळण गोळा करून विकण्याचं किचकट काम करतायत आणि दिवसाकाठी रु. ४० कमवतायत.

बाकीचा पैसा म्हशीच्या दुधातून येतो. “दिवसाला साठ, कधी ऐंशी. कधी थोडे जास्त.” या कमाईवर दहा माणसं जगतायत. मालता सगळ्यात मोठी, वय २५ आणि चैतन्य शेंडेफळ, वय ८. इतके कष्ट असूनही हे जरा जास्तच गर्दा असणारं हसरं घर आहे, आणि घरावर बहुतेक सगळा ताबा या खेळकर बच्चे कंपनीचा आहे. त्यांच्या स्वतःच्या मुलांना मात्र अर्थातच फार फूर्वी शाळा सोडावी लागलीये.

कलावती स्वतः म्हशीचं काही पाहत नाहीत. “मग तर जो काही पैसा येतो त्याहून जास्त खर्चच होईल.” त्यापेक्षा त्या महिन्याला ४० रुपये – किंवा दिवसाला २ रुपयांहून कमी – एका गुराख्याला देतात ज्याच्यासाठी “त्याच्यासाठी रोज १०-१२ जनावरं राखायची, त्यातली ही एक. आणि राखुळ्याला शेणात हिस्सा द्यायचा.”

बिकट व्यवस्था

ही म्हैस या कुटुंबाने स्वतः खरेदी केली आहे. अनेक छोट्या शेतकऱ्यांना त्यांना नको असणाऱ्या आणि पाळणं शक्य नसणाऱ्या गायी गळ्यात बांधून देशोधडीला लावणाऱ्या अजब सरकारी योजनेतली ही म्हैस नाही. सध्या तरी सगळं नीट चालू असलं तरी परिस्थिती फार नाजूक आहे. या म्हशीला जरा जरी काही झालं तर या घराचं सगळं अर्थकारण कोलमडणार. सध्या तरीः “आम्ही सगळं दूध विकून टाकतो.” घरच्या लेकरांच्या मुखी दुधाचा एक थेंबही पडत नाही. इतर दोघी मुली ज्या काम करू शकतात, सध्या कामाला जाऊ शकत नाहीत कारण दोघी नुकत्याच बाळंत झाल्या आहेत.

PHOTO • P. Sainath

“आमच्या पाचव्या लेकीसाठी, ललितासाठी चांगलं स्थळ आलंय,” त्या सांगतात. “मुलाकडचे भले लोक आहेत, आमच्याकडे पैशाची मागणी केली नाही. मात्र लग्नातलं जेवण आमच्याकडे लागलंय. नाही तर मग त्यांच्या गावी जायचं – ते तर जास्तच महाग पडणार. आता, काही तरी मार्ग काढावा लागणार.” आणि त्या मार्ग काढणारच. परशुराम हयात होते तेव्हाही त्यांच्या दोघी लेकी, सविता आणि सुनीता “ दोघींची एकाच मांडवात लग्नं झाली. मालताच्या लग्नात लाखभर खर्च झाल्यावर काही तरी करून पैसा वाचवावाच लागला ना.”

आपल्याला शेतकरी समजलं जात नाही आणि त्यामुळे नुकसान भरपाई मिळू शकत नाही याचा त्यांना त्रास होतोय. “चंद्रपूर जिल्ह्यात आमची साडे तीन एकर जमीन आहे ना,” त्या म्हणतात. “पण ती आहे वाडवडलांच्या नावावर, अजून फोड नाही ना केली.” त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते ‘कास्तकार’ नाहीत. आता “आम्ही ही नऊ एकर खंडाने करायला फक्त १०,००० रुपये देतो. आता तुम्हीच पहा किती हलकी जमीन असेल ही,” त्या हसतात. खडतर काम आहे पण कलावतींकडे खंत करायला वेळ नाही. त्यांना काळजी कशाची “पोळ्यापासनं कामंच कुठेत?” आणखी एकः “बी-खात सगळ्याच्या किमती वाढत चालल्या. आम्हाला काही आता कपास करणं होत नाही. काही तरी वेगळंच करावं लागणार.”

आघात सोसूनही त्यातून उभ्या राहिलेल्या कलावती ठामपणे सांगतात की त्यांच्या मुलांनी देखील शेतीत यावं. गावाकडे, जिथे लोक आपल्या मुलांनी शेती सोडून वेगळं काही तरी काम धरावं म्हणून धडपड करतायत तिथे हे फार अवचित आहे. पण त्यांची तर पुढच्या हंगामाची बेगमी आताच सुरू झालीये. “आम्ही शेतीच करणार,” त्या म्हणतात. “तेच तर आमचं काम आहे.”

या लेखाची मूळ आवृत्ती द हिंदू वृत्तपत्रात २४/०५/२००७ रोजी प्रसिद्ध झाली आहे
( http://www.hindu.com/2007/05/24/stories/2007052402321100.htm )

अनुवादः मेधा काळे

P. Sainath
psainath@gmail.com

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale