नऊ वर्षांची शीलाबती मुर्मू चाचनपूर गावात रोज दोन शाळांमध्ये शिकायला जाते - एक सरकारी प्राथमिक शाळा आणि, सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेली, रेबा मुर्मू चालवत असलेली 'पर्यायी' शाळा.
वय वर्ष ३ ते १२ दरम्यान असलेल्या इतर जवळपास ४० मुलांसोबत, जी सगळी संताली कुटुंबांतली आहेत, शीलाबती रेबा यांच्या शाळेत उन्हाळ्यात सकाळी ६:०० वाजता येते, हिवाळ्यात अर्धा तास उशिरा. मोठे विद्यार्थी जमीन झाडून घेतात, टागोरांचं गाणं प्रार्थना म्हणून म्हणतात - ज्याचा ढोबळ आशय 'अग्नि म्हणजे परीसाचा दगड. मला अग्नि स्पर्श करो अन् पवित्र करो' असा आहे - आणि शाळेचे तास सुरू होतात. शाळेच्या एका भागात पाळणाघर देखील आहे जिथे लहान मुलं खेळायला येतात अन् झोपीही जातात.
रेबा दी - सर्वजण त्यांना याच नावाने हाक मारतात - यांनी त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या एका मातीच्या झोपडीत २०१० साली ही शाळा सुरू केली होती. राज्य शासनाच्या जमीन वाटप योजने अंतर्गत त्यांना १९७० च्या दशकात वारसा म्हणून तीन एकर जमीन मिळाली होती. पण येथील जमीन तितकीशी सुपीक नाही. म्हणून रेबा यांनी आपल्या जमिनीचा एक भाग कोलकाता-स्थित शेती समूहाला भाड्याने दिला, आणि त्या पैशात शाळा सुरू केली. त्या एका छोट्या तुकड्यात भाज्या व फळं पिकवतात - कोबी, बटाटे, पपई - आणि स्थानिक बाजारात विकतात.
त्यांच्या कुटुंबाची मिळकत साधारणच असली तरी स्वतः देखील एक संताली असणाऱ्या ५३ वर्षीय रेबा यांनी छाटना नगरातील एका महाविद्यालयातून बी. ए. ची पदवी मिळवली. ते येथून १५ किमी दूर असून रेबा तिथे रोज सायकलने जात असत. त्यांचे दोन भाऊ आणि एक बहीण आपापल्या कुटुंबासोबत पश्चिम बंगाल मधील बान्कुडा जिल्ह्यातील या गावात राहतात, आणि त्यांची शाळा चालवण्यात मदत करतात. शाळेला त्यांच्या आईचं नाव दिलं आहे - लक्ष्मी मुर्मू प्राथमिक विद्यालय.
सुमारे चार वर्षांपूर्वी कोलकात्यातील दोन संस्थांनी थोडे पैसे दिले आणि रेबादींना तीन खुले वर्ग - ६ काँक्रिटचे खांब आणि वर अॅसबेसटॉसचं छप्पर - बांधायला मदत केली. चाचनपूरहून कोलकाता १८५ किमीवर आहे. या संस्थांपैकी एकीच्या मदतीने त्यांनी दोन शिक्षक नेमले जे मुलांची देखभाल करतात आणि त्यांना गणित, बंगाली, इतिहास, भूगोल आणि इतर विषय शिकवतात. दरम्यान, रेबादी मुलांसाठी नाश्ता आणि संध्याकाळचा खाऊ तयार करतात - गूळ मुरमुरे किंवा पोळी आणि पांढऱ्या वाटाण्याची उसळ - पदार्थ बदलत जातात.
९:३० वाजले की मुलं घरी पळतात आणि सरकारी शाळेत जाण्याची तयारी करतात. ती देखील एका जीर्ण झोपडीत भरायची पण हल्ली चार खोल्यांच्या पक्क्या इमारतीत भरू लागली आहे. इथे, केवळ एक वयस्क शिक्षक, अनंतो बाबू, कसेबसे सगळ्या मुलांना त्यांचे सर्व विषय शिकवतात. सरकारी शाळेत मिळणारा पोषण आहार मुलांना जास्त पसंत आहे, तसंच मोफत मिळणारी पुस्तकंसुद्धा.
दुपारी ४:०० वाजता मुलं मुर्मू यांच्या शाळेत परततात. अंधार पडेस्तोवर खेळतात. मग त्यांना संध्याकाळचा खाऊ मिळतो आणि ते अभ्यास करायला बसतात. रात्री ९:०० पर्यंत सगळी घरी परततात.
शाळेव्यतिरिक्त रेबा मुर्मू यांनी २००८ मध्ये चाचनपूर आदिवासी महिला विकास संस्था देखील सुरू केली. इतर उपक्रमांसोबत ही संस्था कोलकात्यातील आणखी एका संस्थेसोबत मिळून महिलांना त्यांच्या जमिनीच्या छोट्या तुकड्यातून चांगल्यात चांगलं उत्पादन कसं घ्यायचं ते शिकवते.
रेबा यांना तो काळ आठवतो जेंव्हा त्यांच्या भाजी विक्रेत्या काकूंना ५० पैसे अन् एक रुपयाच्या नाण्यातला फरक कळत नसे. यातूनच त्यांच्या घरी लिहिण्या वाचण्याला महत्त्व आलं. "आम्हाला माहित्येय की सरकारने आमच्याकरिता [अनुसूचित जमाती] नोकरीची तरतूद करून ठेवलीय. पण, [जर शिक्षण नसेल तर] कोणाला नोकऱ्या देणार?" त्या विचारतात. एका पिढीला जरी योग्य मार्गदर्शन मिळालं, तरी आपोआप चांगले दिवस येऊ लागतील.

शिलाबती मुर्मू, ९, आपल्या मित्रांसोबत तिच्या वर्गात. सगळे जण जवळच्या सरकारी प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वी तसेच नंतर या दुसऱ्या शाळेत येऊन बसतात

शिलाबती तिच्या खुल्या झोपडीवर उभारलेला राष्ट्रीय झेंडा काढते

रेबा मुर्मू (उभ्या) आपल्या विद्यार्थ्यांची चित्र काढण्याची क्षमता कशी तपासायची, याचा विचार करताना. (पार्श्वभूमीत) त्यांचे विद्यार्थी सकाळचा नाश्ता मिळण्याची वाट पाहत आहेत.

मुलं त्यांचे स्वतःचे खेळ शोधून काढतात - असाच एक आवडता खेळ म्हणजे वाळलेल्या पेंढ्यात उंचावरून उडी मारायची - एका अशा शाळेत जिथे त्यांना मोठं होण्याचं स्वातंत्र्य आहे.

अंजली मंडी, वय १३, शाळेत इयत्ता सातवीत शिकते, तसेच आपल्या लहान भावंडांचा सांभाळ देखील करते.

बाबू हेंबराम, ४, आपली नातलग बहीण मनिका मुर्मू, ११, सोबत रोज शाळेत जातो आणि पाळणाघरात खेळत असतो. कदाचित, आपण कधी शाळेत जायच्या वयाचं होतोय यासाठी तो बेचैन असेल.

मुलं आपला गृहपाठ शिक्षिका माला हंसदा यांच्याकडून तपासून घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. माला छाटना येथील असून त्यांनी बान्कुडा विश्वविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. ची पदवी घेतली आहे. त्या शासकीय भरती परीक्षेची तयारी करत आहेत. रेबादींच्या शाळेत काम करून मिळणाऱ्या रु. २००० त्यांना उपयोगी ठरतात.

एक छोटीशी मुलगी जिचं अजून नावही ठेवण्यात आलं नाहीये - तिला फक्त एक टोपण नाव आहे, कौतिया - तिला एका बिगर सरकारी संस्थेकडून पहिले-वहिले जोडे मिळालेत.

रेबा मुर्मू विद्यार्थ्यांना सराव पुस्तिका वाटताना. पालकांचा या शाळेला पाठिंबा असण्याचं एक कारण हेही आहे की इथे सारं काही मोफत मिळतं.

बिनता हेंबराम, ८, च्या चेहऱ्यावर कायम हसू वाहत असतं, ती आपल्या सराव पुस्तकं अन् शाळेच्या अभ्यासात खुश असते.

पियाली किस्कू, ११, हिला बीजगणित शिकायचंय अन् डॉक्टर व्हायचंय. तिच्या पालकांकडे अल्पशी जमीन आहे, पण या शाळेत राहून पियालीला मोठी स्वप्न बघायची संधी मिळालीये

एका मुलीने स्वतःसोबत भोवतालचं काढलेलं चित्र

मुलं गावातील द्वारकेश्वर नदीच्या वाळूभरल्या काठावर जाणाऱ्या सहलींची वाट पाहत असतात
मार्च २०१७ पासून या कथेचे लेखक रेबा मुर्मू यांच्या शाळेला पेन, पेन्सिल, वह्या, चित्र काढायचे कागद, उबदार कपडे, जोडे आणि पुस्तकं पुरवणाऱ्या एका समूहाचा भाग आहेत; शिवाय ते महिन्याला मुलांच्या डब्याचा खर्च भागेल एवढी रक्कम देखील देतात. मुर्मू यांनी आपल्या घरातील दोन खोल्या वेगळ्या काढून तिथे पाहुण्यांची राहायची सोय केली आहे. लेखकाचा समूह लहान मुलं असलेल्या मित्र आणि नातलगांना विनंती करतो की त्यांनी चाचनपुरला भेट द्यावी आणि तिथे राहावं. जेणेकरून, त्यांची मुलं रेबादींच्या विद्यार्थ्यांशी मैत्री करतील आणि "आपल्या शहराबाहेर जगताना येणाऱ्या सुखदुःखाचा अनुभव घेतील".
अनुवाद: कौशल काळू