सावित्राबाई उभे या पाच ओव्यांमधून रोजच्या दळणाविषयी आणि त्यातून आपल्या संसाराला चांगले दिवस कसे आणायचे याबद्दल गातायत
सावित्राबाई उभे पुणे जिल्ह्यातल्या.
जात्यावरच्या ओव्या प्रकल्पामध्ये त्यांच्या २३ ओव्या आहेत. जात्यावरच्या ओव्या
प्रकल्पाच्या मूळ चमूने या ओव्या १९९६ साली ध्वनुमुद्रित केल्या आहेत. आपल्या
आईकडून या ओव्या शिकल्या असल्याचं तेव्हा सावित्राबाई म्हणाल्या होत्या. त्या एक छोट्या
शेतकरी होत्या आणि दगडमातीच्या घरात रहायच्या. २०१७ साली पारी-जीएसपीचा गट त्यांची
भेट घ्यायला मुळशी तालुक्यातल्या कोळावडे गावच्या त्यांच्या वाडीवर गेला होता. पण
त्यांची भेट व्हायची नव्हती. २००३ साली त्या वारल्या. जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत सावित्राबाईंच्या
पाच ओव्या सादर करत आहोत. त्यात बाया जात्यावरच्या रोज दळणं करतात. त्या कष्टांविषयी
त्या गातात.
आपल्या जोरकस आवाजात सावित्राबाई आपल्याला बरंच काही सांगतायत.
रोजच्या दळण-कांडण करण्यासाठी मला किती कष्ट पडतात. तितक्या शक्तीवर निवत्या दुधाला कढ येईल. हे काम कष्टाचं आहे का? अर्थात आहे. इतका दम निघतो की घामाने पदर ओला झालाय. चोळी देखील भिजलीये. इतक्या कष्टामुळे आईचं तारुण्य जणू थेंब थेंब करत गळू लागलंय.


डावीकडेः मुलीच्या, सुलोचनाच्या लग्नात हळदी-कुंकवाच्या आणि ओटी भरणाच्या कार्यक्रमात सावित्राबाई आणि इतर बाया(संग्रहित छायाचित्र). उजवीकडेः सावित्राबाईंची ओटी भरतायत
“बारीक दळ नारी,” जात्यावर माझ्यासमोर बसलेल्या तरण्या बाईला मी सांगते. कारण “आज शिधा चावडीला जाणार आहे. माझा लेक आता लवकरच वकील होणार आहे.”
माझ्या आईने मला संसाराची मोड नीट शिकवलीये. मी इतकं बारीक दळते की एकीची दीड भाकरी व्हावी. घराला चांगले दिवस आले ते यातूनच. जात्याच्या मालकिणीनं मला जातं का बरं दिलं? कारण मी असंच रोज दळावं, दीड पोतं मागे उरतंच, कमी पडत नाही.
या शेवटच्या ओवीत बाईचे कष्ट, संसार करण्याची तिची हुशारी आणि घरादाराचं सुख यातलं नातं आपल्याला समजून येतं. जात्याची धनीण म्हणजे कधी आई असू शकते, कधी सासू किंवा जिने दळणाचं काम दिलं ती. हे काम देऊन जणू तिने तिला सुखासमृद्धीचा आशीर्वाद दिला आहे, लक्ष्मीसारखा. आणि ज्यामुळे कितीही दळलं तरी धान्य मागे उरतंच.
दळता कांडता, चोळी भिजूनी पदर वला
चोळी भिजूनी पदर वला, निवत्या दुधाला कढ आला
दळता कांडताना, चोळी झालिया पिळाईला
अशी बयाची सयासची गं, नवती लागली गळाईला
अशी बारीक दळ नारे, शिधा चावडी जायायाचा
आता माझा बाळ गं, नवा वकील व्हायायाचा
अशी बारीक दळ नारे, कशी एकीची व्हती दीड
अशी बयानी शिकवली गं, मला संसाराची मोड
सरलं दळण, माझं उरीलं दीड पोतं

कलावंत – सावित्राबाई उभे
वाडी – खडकवाडी
गाव - कोळावडे
तालुका – मुळशी
जिल्हा – पुणे
जात – मराठा
दिनांक – या ओव्या १ जून १९९६ रोजी रेकॉर्ड केल्या आहेत
पोस्टर – ऊर्जा
हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.