“आम्हाला काही कर्फ्यू वगैरे काही नाही. आम्हाला एक दिवसदेखील सुटी घेता येत नाही. लोक सुरक्षित रहायला पाहिजेत ना – आणि त्यासाठी आम्ही शहर साफ ठेवतोय,” दीपिका सांगते. थाउजंड लाइट्स परिसरात ती सफाई कर्मचारी म्हणून काम करते.
२२ मार्च रोजी अख्खा देश ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान घरी राहिला – अर्थात ५ वाजता ‘कृतज्ञता’ व्यक्त करण्यासाठी लोक जमा झाले ते सोडून. आणि ज्यांच्याप्रती ही तथाकथित कृतज्ञता व्यक्त करायची होती ते सफाई कर्मचारी मात्र पूर्ण दिवस काम करत होते. हे महानगर झाडून चकाचक करण्यात मग्न होते. “सध्या एरवीपेक्षा आमच्या कामाची गरज जास्त आहे,” दीपिका सांगते. “या रस्त्यातून तो विषाणू झाडून लावायचाय.”
रोजच्याच प्रमाणे दीपिका आणि इतरही कर्मचारी कुठलंही संरक्षक साहित्य नसताना रस्ते झाडत होते. मात्र रोजच्या पेक्षा सध्या परिस्थिती आणखीच बिकट झालेली आहे. देशभरात संचारबंदी लागू केल्यामुळे अनेकांना कचऱ्याच्या गाड्यांमधून कामाच्या ठिकाणी पोचायला लागलंय. काही जण तर मोठं अंतर पायी गेले. “२२ मार्च रोजी मला जास्त रस्ते झाडायला लागले कारण लांब राहणाऱ्या माझ्या सहकारी कामावरच पोचू शकल्या नाहीत,” दीपिका सांगते.
या छायाचित्रांमधल्या बहुतेक स्त्रिया मध्य आणि दक्षिण चेन्नईच्या थाउजंड लाइट्स आणि अल्वरपेटमध्ये तसंच अन्ना सलईच्या एका रस्त्यावर काम करतायत. यातल्या बहुतेक जणी चेन्नईच्या उत्तरेला राहतात आणि तिथून इथे कामावर येतात.
त्यांच्याप्रती व्यक्त होतीये ती कृतज्ञताही जरा विचित्रच म्हणायला पाहिजे. २४ मार्च रोजी संचारबंदीची घोषणा झाली आणि तेव्हापासून या कर्मचाऱ्यांचा असा आरोप आहे की त्यांना सुटी घेणं दुरापास्त झालंय. “जर ते कामावर हजर राहिले नाहीत तर त्यांना कामावरून कमी करण्यात येईल असं त्यांना सांगण्या आलंय,” सीटूशी संलग्न चेन्नई मनपा लाल बावटा युनियनचे सचिव बी. श्रीनिवासुलु सांगतात. ते असंही सांगतात की प्रवास करण्यासाठी बसची सोय करण्यात आली असली तरी त्या पुरेशा नाहीत आणि अनेकदा त्या उशीरा धावतात. त्यामुळे मग या कामगारांना कचऱ्याच्या घंटागाड्यांमधून प्रवास करण्यावाचून पर्याय नाही. सफाई कर्मचाऱ्यांना महिन्याला साधारणपणे ९,००० रुपये पगार मिळतो. आणि एरवीसुद्धा त्यांना दररोज ६० रुपये प्रवासावर खर्च करावे लागतात. कर्फ्यू आणि संचारबंदीच्या काळात ज्यांना सार्वजनिक बस किंवा मनपाने पाठवलेली वाहनं मिळाली नाहीत त्यांना चालत कामावर यावं लागलं आहे.

‘लोक सुरक्षित रहायला पाहिजेत ना – आणि त्यासाठी आम्ही शहर साफ ठेवतोय,” थाउजंड लाइट्स परिसरात सफाई कर्मचारी म्हणून काम करणारी दीपिका सांगते
“अगदी नुकतंच चेन्नई मनपाने त्यांना संरक्षक साहित्य द्यायला सुरुवात केलीये पण ते काही फार चांगल्या दर्जाचं नाहीये. त्यांना एकदा वापरून टाकून देण्याचे मास्क दिलेत पण तेच परत वापरायला सांगण्यात आलंय. काही मलेरिया कर्मचाऱ्यांना [जे डासाच्या उच्चाटनासाठी धूर फवारणी करतात] – त्यातही काही मोजक्याच लोकांना – थोडं काही संरक्षक साहित्य मिळालंय, पण त्यांच्याकडे चांगले बूट किंवा हातमोजेही नाहीत,” श्रीनिवासुलु सांगतात. मनपाने झोनप्रमाणे करोना विषाणूविरोधातील अभियानासाठी जादा निधी दिला आहे. पण तो प्रत्यक्षात वापरात यायला काळ जावा लागेल, ते सांगतात.
सध्या रिकामे, सुनसान रस्ते, आणि निवासी भागात बंद खिडक्या-दरवाजे असंच चित्र सफाई कर्मचाऱ्यांना पहायला मिळतंय. “त्यांच्या पोराबाळांपर्यंत विषाणू पोचू नये म्हणून आम्ही इथे उन्हाच्या कारात काम करतोय. आमची पोरं आणि आमच्या सुरक्षेचं कुणाला काय पडलंय?” त्यांच्यातल्या एक विचारतात. कर्फ्यू लागल्यानंतर रस्त्यातला कचरा कमी झाला असला तरी घरांमधला कचरा मात्र वाढला आहे. “अशा स्थितीत आमच्या कामगारांना ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करणं खरंच शक्य नाहीये. त्यामुळे आम्ही मनपाला सध्या तात्पुरत्या काळासाठी हे थांबवायला सांगितलंय,” श्रीनिवासुलु सांगतात. सध्याच्या संचारबंदीच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांना साधं प्यायला पाणी मिळणं देखील मुश्किल झाल्याचं ते सांगतात. “एरवी ते ज्या भागात काम करत असतात तिथले रहिवासी त्यांना राणी देतात. पण आता अनेक जण सांगतायत की त्यांना कुणी साधं पाणी पण देत नाहीये.”
श्रीनिवासुलु यांच्या सांगण्यानुसार तमिळ नाडूत सुमारे २ लाख सफाई कर्मचारी आहेत. एकट्या चेन्नईमध्ये अंदाजे ७,००० पूर्ण वेळ कर्मचारी आहेत आणि हा आकडाही बराच कमी आहे. “२०१५ चा पूर आठवतोय किंवा त्याच्या लगेच नंतरच्याच वर्षी आलेलं वरदा चक्रीवादळ? १३ जिल्ह्यांमधून कामगार इथे चेन्नईत आले होते आणि त्यांनी सगळं शहर पूर्वपदावर आणलं होतं. आता राज्याच्या राजधानीची ही कथा असेल तर मग जिल्ह्यांमधे तर कर्मचारी वर्ग अपुराच असणार.”
बरेचसे सफाई कर्मचारी निवृत्त होण्याआधीच मरण पावतात. “आम्हाला कसलंही संरक्षक साहित्य दिलं जात नाही आणि एखाद्या आजाराची आम्हाला अगदी सहज लागण होऊ शकते,” त्यांच्यापैकी एक जण सांगतात. जे आत उतरून गटारं साफ करतात ते अनेका श्वास गुदमरून मरण पावतात. एकट्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तमिळ नाडूमध्ये पाच सफाई कामगार गटारांमध्ये मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत.
“लोक काय आता म्हणणारच की त्यांना आमच्याप्रती कृतज्ञता वाटतीये म्हणून. आम्ही त्यांचे रस्ते झाडतोय, त्यांचं आजारांपासून रक्षण करतोय. टीव्ही वाहिन्यांचे लोक आमच्या मुलाखती घ्यायला येतायत. पण आम्ही तर हे काम नेहमीच करत आलोय,” त्या सांगतात.
“आम्ही हे शहर साफ ठेवण्यासाठी कायम झटत आलोय. आणि ते करत असताना आम्ही आमचा जीव धोक्यात घातलाय. आमचे आभार ते फक्त आता मानतायत. पण त्यांच्या स्वास्थ्याची काळजी आम्ही कायमच घेतलीये.”
या संचारबंदीच्या काळात केलेल्या अतिरिक्त कामासाठी सफाई कर्मचाऱ्यांना जादा भत्ता देण्यात आलेला नाही.
याला म्हणतात कृतज्ञता.

अन्ना सलाईतल्या माउंट रोडवरच्या सफाई कर्मचारी, एरवी हा चेन्नईतला सगळ्यात गर्दीचा रस्ता असतो. महिन्याला त्यांची कमाई ९००० रुपये असली तरी त्यांना दर दिवशी जवळ जवळ ६० रुपये येण्याजाण्यावर खर्चावे लागतात. आणि संचारबंदीच्या काळात ज्यांना सार्वजनिक बस किंवा मनपाच्या वाहनांमधून येणं शक्य झालं नाही त्यांना मोठं अंतर पायी जावं लागलं.

अनेक सफाई कर्मचारी घरून निघून अन्ना सलईतला माउंट रोड किंवा चेन्नईत इतरत्र कामाच्या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्यांमधून पोचतायत

२२ मार्च, ‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी एक सफाई कर्मचारी हातमोजे किंवा इतर कुठल्याही संरक्षक साहित्याशिवाय एरवी गर्दीचा असणारा एलिस रोड साफ करतीये

एलिस रोडवर, ‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी, कामगार ‘वापरून फेकण्याजोगे’ आणि ‘संरक्षक’ असणारं साहित्य वापरून इतरांचा कचरा साफ करतायत

एलिस रोडची एक गल्ली साफ करणारे एक सफाई कामगारः ‘आमच्याकडे कसलंही संरक्षक साहित्य नसतं आणि आम्हाला कसला ना कसला आजार होण्याची नेहमीच शक्यता असते,’ त्यांच्यापैकी एक जण म्हणतात

‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी सुनसान माउंट रोड, त्या दिवशीही कचरा उचलला गेला आणि रस्ते झाडले गेले.

चेपॉक परिसरात एक सफाई कर्मचारीः संचारबंदीच्या काळात अतिरिक्त काम केल्याबद्दल त्यांना जादा भत्ता देण्यात आलेला नाही

एम. ए. चिदंबरम आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमजवळ चेपॉक परिसर साफ करताना

अनेक सरकारी कार्यालयं असणारी चेपॉकमधली एक इमारत पूर्णपणे रिकामी झालीये

अगदी फालतू मास्क आणि हातमोजे असं संरक्षक साहित्य घालून सफाई कर्मचारी अल्वरपेटमधल्या रस्ते निर्जंतुक करतायत

अल्वरपेटचे रिकामे चकाचक रस्ते

एरवी गर्दीने फुललेले टी. नगर व्यावसायिक परिसरातले रस्ते झाडून आणि धुऊन काढले जातायत, मास्क वगळता इतर कसलंही संरक्षक साहित्य नाही

टी. नगरमधल्या इतर रस्त्यांची सफाई सुरू आहे

चूलाइमेडू भागातली एक सरकारी शाळा निर्जंतुक करण्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी सुरू आहे

कोयामबेडूचा बाजार झाडून चकाचक केला जातोय

कोयामबेडूमध्ये सफाई कर्मचारीः ‘आम्ही हे शहर साफ करण्यासाठी कायमच काम करत आलोय, आणि त्यासाठी आम्ही आमचा जीवही धोक्यात घातलाय. ते फक्त आता आमचे आभार मानतील, पण आम्ही त्यांच्या स्वास्थ्याची कायमच काळजी घेतलीये’
अनुवादः मेधा काळे