जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत सविंदणे गावच्या धोंडाबाई आणि अंजनाबाई गाढवे दळण सरल्याच्या काही ओव्या गात आहेत. त्यांचे कष्ट वाटून घ्यायला त्यांचे देव-देवता येतात असं त्या गातात.
१२ व्या शतकातल्या भक्ती संप्रदायाच्या संत जनाबाईंचा पुतळा गाढवे कुटुंबियांच्या घराबाहेरच्या देवळीत उभा आहे. फकिरा गाढवेंनी त्यांच्या हयातीत हा पुतळा घडवलाय. ते जातीने आणि व्यवसायाने कुंभार. ते भांडी घडवायचे आणि त्यांच्या पत्नी धोंडाबाई गारा करायच्या, भांडी भाजायला राब करायच्या आणि भांडी तयार झाल्यावर ती नीट सांभाळून ठेवण्याचं कामही त्यांचंच. भांड्यांचं काम नसेल तेव्हा दोघंही शेतात मजुरी करत.
त्यांच्या पिढीच्या इतर स्त्रियांप्रमाणे धोंडाबाईदेखील घरीच दळणं करीत, कधी कधी सोबतीला त्यांची सून अंजनाबाई असायची. दोघी मिळून ओव्या गात असत, तेवढाच कष्टाचा भार हलका होई.

गाढवे कुटुंबियांच्या घराबाहेरचं संत जनाबाईंचं देऊळ
शिरूर तालुक्यातल्या सविंदणे गावच्या १५ जणींनी मिळून ओव्यांच्या संग्रहात ३४४ ओव्यांची भर घातली आहे. धोंडाबाई आणि अंजनाबाई त्यातल्याच दोघी. जात्यावरच्या ओव्या गोळा करणाऱ्या मूळ गटाने या ओव्या लिहून घेतल्या आणि डिसेंबर १९९५ मध्ये त्यातल्या २५० ओव्या कॅसेट्सवर ध्वनीमुद्रित केल्या.
या मूळ गटाचा भाग असणारे जितेंद्र मैड पारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीमचेही महत्त्वाचे सदस्य आहेत. आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांना जातोय आणि या ओव्या रचणाऱ्यांना भेटतोय, त्यांचे फोटो गोळा करतोय. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी आम्ही सविंदण्याला गेलो आणि आम्हाला समजलं की धोंडाबाई २००८ सालीच हे जग सोडून गेल्या. आम्ही फक्त धोंडाबाईंची सून अंजनाबाई यांनाच भेटू शकलो आणि त्यांचे आणि त्यांच्या घराचे काही फोटो घेऊ शकलो.
धोंडाबाई आणि अंजनाबाईंच्या ओव्या
ओवी संग्रहामध्ये आम्हाला धोंडाबाई आणि अंजनाबाईंनी गायलेल्या ५ ओव्या सापडल्या. धोंडाबाई सुरुवात करतात आणि त्यांची सून त्यांना साथ देते. जात्यावर दळतानाचे कष्ट आणि दळण सरल्यावर वाटणारा आराम याबद्दल त्या गातात.
प्रत्येक ओवीची सुरुवात सरलं दळण अशी होते आणि दुसऱ्या ओळीमध्ये गणगोताच्या, देव-देवतांच्या प्रतिमा येतात. पहिल्या ओळीत असं म्हटलंय की दळण सरलंय आणि सुपात चाराचुरा राहिलाय. यालाच जोडून पुढच्या ओळीत विठ्ठलाच्या तुऱ्याची आणि विठ्ठलाची म्हणजे रखुमाईच्या बिजवराची प्रतिमा येते.


स्व. धोंडाबाई गाढवे (डावीकडे) आणि त्यांची सून अंजनाबाई (उजवीकडे, मध्यभागी)
पुढच्या दोन ओव्यांमध्ये धोंडाबाई सीतेचा उल्लेख करतात. दुसऱ्या ओवीत रामाच्या बागेत न्हाती धुती सीता उभी आहे आणि तिसऱ्या ओवीत ती येऊन दळू लागतीये. चौथ्या ओवीत धोंडाबाई म्हणतात, देवानं भाचरं दिली आहेत पण ते म्हणजे केवळ ‘डोरल्याचे ठसे’ आहेत, ते मदत करतात मात्र केवळ पतीच्या कामात असंच त्यांना यातनं सुचवायचं असावं. शेवटच्या ओवीत धोंडाबाई विचारतात, ‘तिथं कोण उभं आहे?’ आणि दुसऱ्या ओळीत त्याचं उत्तर स्वतःच देतात, त्यांना दळू लागायला पार्वती आली आहे.
ओवी गाताना देवी-देवतांच्या प्रतिमा उभ्या करून रोजच्या या कष्टांचा भार हलका करण्याचा या बाया प्रयत्न करत असाव्यात. ओव्या गाऊन त्या इतकं जड कामही आनंदाचं करत असाव्यात. त्यांच्या काकणाची किणकिण आणि जात्याची धान्य दळतानाची घरघर आपल्या कानालाही गोड वाटतेच.
सरील दळयाण या सुपात चाराचुरा
विठ्ठलाचा तुरा ग रुखमीणबाईचा बीजवरा
सरील दळण माझ्या सुपात मातीपोती
रामाच्या बागात सीता होती न्हाती धुती
सरील दळण सरती आरती कोणी केली
रामयाची सीता दळू लागून मला गेली
सरील दळण माझं उरीलं पाच पस
देवानी दिली भाच माझ्या डोरल्याच ठस
सरील दळण इथ कोण उभी होती
दळू लागून मला गेली शंकराची पारवती

कलावंतः धोंडाबाई गाढवे
गावः सविंदणे
तालुकाः शिरूर
जिल्हाः पुणे
जातः कुंभार
वयः ७५ (धोंडाबाई २९ एप्रिल २००८ रोजी निवर्तल्या)
मुलं: तीन मुलगे, तीन मुली
व्यवसायः कुंभारकाम आणि शेतमजुरी

कलावंतः अंजनाबाई गाढवे
गावः सविंदणे
तालुकाः शिरूर
जिल्हाः पुणे
जातः कुंभार
वयः ५६
मुलं: दोन मुलगे, तीन मुली
व्यवसायः कुंभारकाम आणि शेतमजुरी
या ओव्या १३ डिसेंबर १९९५ रोजी ध्वनीमुद्रित केल्या आहेत. फोटो ८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेण्यात आले.
फोटोः संयुक्ता शास्त्री
पोस्टरः
सिंचिता माजी