"मी… मी…" अमान मोहम्मद माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला उतावीळ झाला होता. मी तिथे जमलेल्या १०-१२ मुलांना विचारलं होतं की या वर्षीच्या विनायक चविथीच्या देखाव्याचा मुख्य आयोजक कोण आहे. "याने २,००० रुपये वर्गणी एकट्याने गोळा केली," टी. रागिणी म्हणाली. ती या बच्चेकंपनीत सर्वात मोठी म्हटल्यावर अमानच्या दाव्यावर शंका घेण्याचा सवालच नव्हता.
यंदाच्या वर्षी मंडळाच्या आयोजकांना एकूण ३,००० रुपये वर्गणी मिळाली: पैकी दोन तृतीयांश रक्कम एकट्या अमानने गोळा केली होती. या मुलांनी आंध्र प्रदेशच्या अनंतपूर येथील साईनगर वस्तीतून जाणाऱ्या गाड्यांजवळून वर्गणी गोळा केली होती.
अमान म्हणाला की हा त्याचा आवडता सण आहे. ते साहजिक होतं.
२०१८ साली विनायक चविथी होऊन काही आठवडे झाले होते, तेंव्हा एका रविवारी साईनगरमध्ये मी चार मुलांना एक लुटूपुटूचा खेळ खेळताना पाहिलं. म्हणून मी त्यांचे फोटो काढले. हा खेळ मुलांच्या आवडत्या 'अव्वा अप्पाची' या खेळासारखाच होता. त्यात एक मुलगा गणपती झाला होता. त्याची जयंती विनायक चविथी म्हणून साजरी करतात. मग वयाने मोठ्या असलेल्या मुली त्याला उचलून जमिनीवर आदळत होत्या – ही गणेश निमार्जनम् अर्थात विसर्जनाची नक्कल होती.
तो तान्हा गणपती म्हणजे अमान मोहम्मद. आता तो ११ वर्षांचा आहे वरच्या कव्हर फोटोमध्ये पहिल्या रांगेत सर्वांत डावीकडे उभा आहे.
यंदाच्या वर्षी विनायक चविथी साजरी करण्यासाठी अमान आणि त्याच्या मित्रांनी एका २×२ आकाराच्या ‘मंडपा’त एक गणपतीची मूर्ती स्थापन केली – हा कदाचित अनंतपूर मधील सर्वात लहान देखावा असेल. त्यांच्या देखाव्याचा फोटो काढायचा राहून गेला. त्यांनी मला सांगितलं की रू. १,००० ची मूर्ती आणून उरलेल्या वर्गणीत त्यांनी देखाव्याची सजावट केली होती. त्यांनी हा देखावा साईनगर तिसरा क्रॉसजवळ असलेल्या दर्ग्याशेजारी बांधला होता.


डावीकडे: अमान मोहम्मदला गणपती बनवून गणेश निमार्जनम् करण्यात येतंय. उजवीकडे: २०१८ मध्ये विनायक चविथीनंतर एका रविवारी मुलं विसर्जनाची नक्कल करत होते
इथल्या कामगार वर्गाच्या वस्तीतील मुलं कायमच हा सण साजरा करता आले आहेत. त्यांचे आईवडील बहुतांशी रोजंदारी आणि घरगुती कामं करतात किंवा शहरात मजुरी करतात. ते सुद्धा मुलांच्या विनायक चविथी उत्सवात सहभागी होतात. मंडळाच्या आयोजकांमध्ये ५ ते १४ वर्षांच्या वयोगटातील मुलांचा समावेश आहे.
"आम्ही विनायक चविथी आणि पीरला पंडगा [रायलसीमा भागातील मोहर्रम] दोन्ही सण साजरे करतो," १४ वर्षीय रागिणी म्हणते. मुलांच्या दृष्टीने मोहर्रम आणि विनायक चविथी दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही सणांमध्ये देखावा महत्त्वाचा असून त्यासाठी मुलांना वर्गणी गोळा करण्याची मुभा आहे. वर्गणी गोळा करून मुलं तो देखावा तयार करतात. "आम्ही यूट्यूबवर पाहून पाहून घर बनवायला शिकलो," एस. साना, ११, म्हणते. "मी माती आणण्यात मदत केली. आम्ही काड्या आणि सुतळी घेऊन देखावा रचला. त्यावर एक चादर झाकली आणि आमचा विनायकुडू [गणपती] आत ठेवला."
रागिणी आणि इम्रान (दोघेही १४ वर्षांचे) वयाने मोठे असून ते देखाव्याकडे आळीपाळीने लक्ष देत होते. "मी पण लक्ष देत होतो," सात वर्षांचा एस. चांद बाशा म्हणाला. "मी रोज शाळेत जात नसतो. काही दिवस जातो, काही दिवस नाही. मग मी इथे लक्ष द्यायचो." मुलं इथे पूजादेखील करतात आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादही वाटतात. प्रसादात एखाद्या मुलाच्या आईने चिंच घालून केलेला भात असतो.
विनायक चविथी हा अनंतपूरच्या अनेक कामगार वर्गाच्या परिसरांमध्ये साजरा होणारा सण आहे, त्यामुळे हे खेळीमेळीचं वातावरण बरेच आठवडे सुरू राहतं. खासकरून चविथीनंतर शाळेला सुट्ट्या लागल्यावर मुलं मातीच्या मूर्ती बनवतात; बांबू व लाकडाच्या फळ्या रचून, त्यावर घरच्या चादरी आणि इतर टाकाऊ वस्तू आणून देखावा तयार करतात, मग त्यात मूर्ती स्थापन करून ते आपला आवडता सण पुन्हा एकदा साजरा करतात.
शहराच्या गरीब परिसरांमध्ये असे बरेच लुटूपुटूचे खेळ पाहायला मिळतात, ज्यात मुलं खेळ-साहित्य-संसाधनांची कसर आपल्या कल्पकतेने भरून काढतात. एकदा मी एका मुलाला एक काडी घेऊन 'रेल्वे गेट' खेळताना पाहिलं होतं. समोरून गाडी गेली की तो काडी उचलून धरायचा. विनायक चविथीनंतर या क्रीडाविश्वात गणपती बाप्पाचं आगमन होतं.



डावीकडे आणि मध्यभागी: २०१९ मध्ये अनंतपूर येथील आणखी एका वस्तीत मुलं विनायक चविथीनंतरही उत्सव सुरूच ठेवतात. उजवीकडे: ' रेल्वे गेट ' चा खेळ