दिल्लीच्या लाल कुआँ भागातल्या पुल पेलाद मोहल्ल्यात सगळ्यांनाच तो ‘गाडी लावणारा’ किंवा ‘मिर्ची-आलू’ पोरगा माहितीये. या भागातला तो सगळ्यात लहान हातगाडीवाला आहे.

तो वस्तीतल्या अरुंद बोळातून नाल्यांच्या कडेने एका खुल्या जागेकडे पळत जाताना मी त्याला पाहिलं, तिथे तो त्याची हातगाडी लावतो. गल्लीच्या तोंडाशी त्याने त्याची हातगाडी आणली, ती एका जागी पक्की रहावी म्हणून चाकाला टेकू म्हणून दगड लावले आणि तो एका खोलीत गायब झाला. १४ वर्षांच्या अर्जुन सिंगसाठी हे रोजचंच आहे. तो आता आपल्या गाडीवर बटाट्याचे वेफर्स आणि मोमो विकायला ठेवेल.

हा लाजरा पण हसरा मुलगा त्याच्या विधवा आईबरोबर, लक्ष्मी सिंगबरोबर एका लहान खोलीत राहतो. त्यांच्या या लहानशा घरात कसलंही फर्निचर नाही. भिंतीवर एक आरसा आहे आणि त्यावर कोपऱ्यात चिकटपट्टीचं एक छानसं हृदय चिकटवलंय. आणि त्यावर लिहिलंय, ‘लक्ष्मी+अर्जुन’. “मी लिहिलंय ते,” अर्जुन सांगतो, “म्हणजे मग जो कुणी आम्हाला भेटायला येईल त्यांना त्याच्यात आमची दुनिया पहायला मिळेल.”

त्याची ही दुनिया एकाकी आणि अवघड आहे.

१४ जुलै २०१३ रोजी अर्जुनचे वडील राजेश्वर सिंग इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातलं गटार साफ करताना मरण पावले. ते तिथे २०११ पासून कामावर होते. त्याच्यासोबत अजून दोघे होते, त्यांच्या नाकात विषारी वायू गेला आणि त्यातच ते इमारतीच्या तळघरात मरण पावले. तो आणि इतर दोघं, अशोक कुमार आणि सतीश सिंग, या शासन संचलित कला केंद्रातले कंत्राटी कामगार. तिघंही जण वाल्मिकी या दलित समुदायातले, तिघांची घरं त्रिलोकपुरीतल्या वाल्मिकी वस्तीत. (लक्ष्मी त्यानंतर अर्जुनसोबत तिची विवाहित मुलगी राहते तिथे लाल कुआँमध्ये रहायला गेली.)

व्हिडिओ पहाः ‘मला पैसा नकोय. कृपा करून मला कुठे तरी नोकरी मिळवायला मदत करा,’ लक्ष्मी म्हणते

अशोक कुमार आणि सतीश सिंगच्या घरचे तेव्हानंतर मीरतला परतले आहेत. २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने गटार सफाईचं धोकादायक आणि अमानुष काम करताना मरण पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांची भरपाई द्यावी असा निकाल दिला होता. मात्र या तिघांपैकी कुणाच्याही कुटुंबियांना ती मिळालेला नाही. चार वर्षं उलटल्यानंतर लक्ष्मीला चार लाख रुपये मिळाले आहेत – का तर तिचा नवरा कंत्राटी कामगार होता, कायमस्वरुपी नाही म्हणून!

लक्ष्मी तिशीत असताना त्याच राष्ट्रीय कला केंद्रात सफाई कामगार म्हणून काम करायची – झाडलोट, कचरा नेणं, इतर साफसफाई, वगैरे. ती आणि तिचा नवरा, दोघांना प्रत्येकी महिना ३,५०० रुपये मिळत असत. २०११ मध्ये तिच्या मुलीचं, मीनूचं लग्न झालं आणि ती सांगते, तिचा कामातला सगळा रसच संपला आणि त्यामुळे तिचे खाडे व्हायला लागले. आणि तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तर सफाई किंवा मैला साफ करण्याच्या कामाचा ती विचारच करू शकत नाही.

“आम्ही अनुसूचित जातीत येतो, आम्ही वाल्मिकी आहोत,” लक्ष्मी सांगते. “माझं लहानपण उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातल्या संचौली गावात गेलं. माझे वडील, रोशनलाल शेतमजूर होते. माझी आई गावात सफाईचं काम करायची, झाडलोट, कचरा, शेण आणि मैला उचलायचा. त्या काळी गावात संडास नव्हते. चांभार जातीचे लोक मेलेली जनावरं उचलायचे.”

लक्ष्मीचं १३ किंवा १४ व्या वर्षी लग्न झालं, राजेश्वरचं वय असेल १७ किंवा १८. तो मूळचा हरयाणाच्या रोहतकचा पण तो दिल्लीत संडास आणि गटारं साफ करायचं काम करायचा. त्याच्या घरातले सगळे सफाई कामगार होते. “माझी सासू दिल्ली पोलिस मुख्यालयात काम करायची,” लक्ष्मी सांगते. “ती गेल्यानंतर मी त्या जागी नोकरी मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या अधिकाऱ्यांनी काही ऐकलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की नियम बदलले आहेत. माझा नवरा आधी नेहरू स्टेडियमला आणि नंतर निर्माण भवनमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. सुरुवातीला तर तो कंत्राटी कामगार होता म्हणून त्याला महिन्याला फक्त ४०० रुपये मिळायचे. पण तो एकदम बिनधास्त होता. त्याने कधीच कशाची चिंता केली नाही ना आम्हाला कधी चिंता करायचं कारण दिलं.”

a boy with his family getting his pushcart ready
PHOTO • Bhasha Singh

लक्ष्मीचा मुलगा अर्जुन गेल्या वर्षभरापासून हातगाडीवर खायचे पदार्थ विकतोय

भिंतीवर एक आरसा आहे आणि त्यावर कोपऱ्यात चिकटपट्टीचं एक छानसं हृदय चिकटवलंय. त्यावर लिहिलंय, ‘लक्ष्मी+अर्जुन’. “मी लिहिलंय ते,” अर्जुन सांगतो, “म्हणजे मग जो कुणी आम्हाला भेटायला येईल त्यांना त्याच्यात आमची दुनिया पहायला मिळेल.”

राजोश्वर गेला तेव्हा त्याचा मुलगा अर्जुन जेमतेम १० वर्षांचा होता. “माझे बाबा दिसायला भारी होते,” अर्जुन सांगतो. “मी इतका त्यांच्यासारखा होतो, माझ्या भुवया अगदी त्यांच्यासारख्या आहेत. मी त्यांच्यासारखाच बुटका आहे. त्यांना भेंडी आवडायची आणि मलादेखील आवडते. स्वयंपाक करायला जाम आवडायचं त्यांना आणि आता मीही तेच करतोय, अर्थात गरज म्हणून. ते फार प्रेमळ होते आणि मला चिंटू म्हणायचे.”

अर्जुनला त्याच्या वडलांची सगळ्यात जास्त कोणती आठवण येत असेल तर ते नेहमी गायचे ते त्यांचं गाणं – ‘तुम मुझे यूं, भुला न पाओगे’. “माझा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे माहितीये,” अर्जुन विचारतो, “मी आता कुणाला पापा म्हणून शकत नाही. मी १० वर्षांचा पण नव्हतो जेव्हा पापा गेले. माझी आई इतकी दुःखात होती, ती इतकी म्हणजे इतकी रडायची. कुणीच आमच्या मदतीला आलं नाही; सगळ्या नातेवाइकांनी आमची साथ सोडली. मला तर वाटतं मला जमेल तितकं मी पटापट मोठं व्हावं म्हणजे मग मी माझ्या आईचं  दुःख थोडं तरी हलकं करू शकेन.”

आम्ही बोलत होतो आणि घड्याळात तीन वाजले होते. अर्जुनची सगळी तयारी करण्याची वेळ. त्याने जवळच्या पोत्यातून काही बटाटे काढले आणि त्याचे काप करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने त्यात अगदी सहज काही मसाले घातले आणि हे सगळं करताना टीव्हीवरच्या मास्टरशेफसारखी त्याचं माहिती देणं चालू होतं. त्यानंतर त्याने मोमो बनवायला सुरुवात केली. अखेर, सगळं साहित्य त्याच्या हातगाडीवर लादलं – गॅसची टाकी, शेगडी, रोवळी, डाव, ताटल्या आणि चटणी. त्याची आई मक्याची कणसं नीट रचून ठेवायला त्याला मदत करत होती.

अर्जुन रोज आपल्या मोहल्ल्यात दुपारी शाळेनंतर त्याची गाडी लावतो. धंदा चांगला झाला तर दिवसाला १००-१५० रुपयाचा नफा होतो आणि कधी कधी मात्र अगदी ५० रुपयेच सुटतात. अनेकदा लोक अगदी १०-१५ रुपयाची देखील उधारी करतात. शनिवार – रविवार आणि सणांमध्ये धंदा चांगला होतो.

पोटापाण्यासाठीचं हे काम फारसं स्थिर नसलं तरी रोजचं भागवण्यासाठी गरजेचं आहे. कारण ते सोडून त्यांची इतर कमाई म्हणजे लक्ष्मीला सरकारकडून दर महिन्याला मिळणारं २००० रुपये विधवा पेन्शन. ती सांगते, आजूबाजूच्या लोकांना त्यांचं चांगलं बघवत नाही आणि खाण्याच्या गाडीमुळे परिसर घाण होतो अशी ते सतत तक्रार करत राहतात. शेजारच्या मेहरुन्निसा खातून म्हणतात, “एखादी एकटी बाई काही तरी काम करून पुढे जातीये, हे या पुरुषांना पाहवत नाही. आणि त्यातून ती जर वाल्मिकी जातीची असेल तर विचारूच नका. त्यांना तर ती हातगाडी बंद करण्याचा काही ना काही बहाणाच हवाय.”

a boy besides his mother
PHOTO • Bhasha Singh

लक्ष्मी (पिवळी ओढणी घेतलेली), तिची मुलगी मीनू आणि अर्जुन. माझा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे , अर्जुन म्हण तो , मी आता कुणाला पापा म्हणून शकत नाही .

लक्ष्मी आणि अर्जुनची नजीकच्या भविष्यात काय काय करायचंय याची छोटी छोटी स्वप्नं आहेत. उकडलेली अंडी विकायची, रोजच्या गरजेच्या वस्तूंचं एक छोटं दुकान टाकायचं जेणेकरून त्यांच्या कमाईत भर पडेल. पण या छोट्या स्वप्नांसाठीही हातात पैसा पाहिजे. दहा लाखाच्या भरपाईतून ते सगळं करता आलं असतं. हाताने मैला सफाईच्या प्रथेचं निर्मूलन करण्यासाठी काम करणारं सफाई कर्मचारी आंदोलन लक्ष्मीला तिच्या भरपाईच्या लढ्यात मदत करत आहे. पण राजेश्वर सिंग कंत्राटी कामगार होता, नियमित कामगार नाही. ही एक पळवाट वापर करून त्याची नियुक्ती करणारे त्याची पूर्ण भरपाई देण्यास नकार देऊ शकतात.

आंदोलनाने अर्जुनला तुघलकाबादच्या सर्वोदय बाल विद्यालय या सरकारी शाळेत सहावीत प्रवेश मिळवून देण्यातही मदत केली. या कुटुंबाकडे शाळाप्रवेशासाठी लागणारा राहण्याच्या पत्त्याचा पुरावा नव्हता आणि अर्जुनच्या त्रिलोकपुरीतल्या शाळेने बदली दाखला द्यायला उशीर केला. पण आता अर्जुन परत शाळेत जाऊ लागला आहे आणि त्यामुळे आता तो नक्कीच मोठी स्वप्नं पाहू शकतो. बँक मॅनेजर आणि शेफ व्हायचं त्याचं स्वप्न आहे.

लक्ष्मी म्हणते पूर्ण भरपाई मिळाली तरी ती शांत बसणार नाही. हाताने मैला उचलण्याच्या या प्रथेविरुद्ध लढण्याचा तिने निर्धार केला आहे. “कोणत्याच बाईला अशा रितीने नवऱ्याचा मृत्यू पहावा लागू नये, जसा मी पाहिला. अगदी सगळीकडे जाऊन हे बोलायची माझी तयारी आहे. मी भीम यात्रेतही सामील झाले होते [२०१५-१६ मध्ये इतर मुद्द्यांसोबतच गटारांत होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी देशभरात निघालेली बस यात्रा]. पण सरकारला काही ऐकायचंच नाहीये. आमची माणसं मेली तर या जगात कुणालाही काहीही फरक पडत नाही. कारण आमच्या माथी आमच्या जातीचा शिक्का मारलेला आहे ना. जोपर्यंत हाताने मैला उचलायची प्रथा आणि आमची जात एकमेकांशी जोडले आहेत तोपर्यंत तरी आमची या नरकातून सुटका नाही.”

“जेव्हा मी विचार करते की इतकी सारी माणसं अशा रितीने मरतायत पण सरकार त्याबाबत काहीही करत नाहीये, तेव्हा मला इतका संताप येतो,” लक्ष्मी पुढे सांगते, “गटारं साफ करण्याचं कोणतंही तंत्रज्ञान नाही आपल्या देशात? सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा एवढा गाजावाजा चालू आहे, पण जर आजही माणसांना आत उतरून गटारं साफ करावी लागत असतील तर हा देश ‘स्वच्छ’ कसा म्हणायचा, तुम्ही सांगा.”

अनुवादः मेधा काळे

Bhasha Singh

Bhasha Singh is an independent journalist and writer, and 2017 PARI Fellow. Her book on manual scavenging, ‘Adrishya Bharat’, (Hindi) was published in 2012 (‘Unseen’ in English, 2014) by Penguin. Her journalism has focused on agrarian distress in north India, the politics and ground realities of nuclear plants, and the Dalit, gender and minority rights.

Other stories by Bhasha Singh
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale