“मुलं काही डोल्लू कुनिथात इतकी तरबेज नाहीयेत,” १५ वर्षांची विजयलक्ष्मी सरळ सांगते. “आम्ही नक्कीच जास्त चांगलं वाजवतो.”

आणि ते खरंच आहे. लहान चणीच्या या मुली, त्यांच्या शेलाट्या कंबरेला हे मोठे अवजड ढोल बांधलेले, एखाद्या निपुण नर्तकीप्रमाणे आणि कसरत करणाऱ्यांप्रमाणे लवचिकतेने फेर धरतायत. पूर्ण वेळ एकदम तालात, एकमेकींशी एकदम सुसंगत.

या सगळ्या लहान मुली आहेत. त्यांच्यापैकी सगळ्यात मोठ्या असणाऱ्याही अजून मोठ्यांमध्ये गणल्या जात नाहीत. पण ज्या सहजतेने आणि जोशात त्या हा शक्तीचा कस पाहणारा ढोलनृत्य प्रकार सादर करतात ते खरंच अचंबित करून टाकणारं आहे. डोल्लू कुनिथा हे कर्नाटकातलं एक लोकप्रिय लोकनृत्य आहे. डोल्लू म्हणजे ढोल आणि कुनिथा म्हणजे कानडीत नाच. यालाच “गंडू काले” – “पुरुषांचं कौशल्य” किंवा “पुरुषांची कला” असंही म्हणतात. हे धिप्पाड पुरुष १० किलोची ढोल आपल्या कंबरेला बांधून वेगाने आणि जोशात नाचतात. लोक असं मानतात की या नाचप्रकारासाठी शक्तीमान आणि दमसास असलेले धिप्पाड पुरुषच पाहिजेत.

अर्थात, काही तरुण मुलींनी ही चाकोरी मोडायचा प्रयत्न करेपर्यंत तरी असाच समज होता. आणि ही चाकोरी मोडली गेली, अगदी इथे, हेसरगट्टात. बंगळुरूच्या वेशीवर, शहराच्या मध्यभागापासून ३० किमी अंतरावर भाताचं खाचरं आणि माडा-पोफळीच्या सान्निध्यात. आणि या सगळ्या हिरवाईत या मुलींची टोळी अशा प्रथा आणि रिवाज बदलू लागल्यात. या प्रकारचा डोल्लू कुनिथा मुलींसाठी नाही ही संकल्पनेलाच त्यांनी आव्हान दिलंय. त्यांनी हे जुनाट मिथक बाजूला टाकलंय आणि वजनदार ढोल हातात घेतलाय.

व्हिडिओ पहाः दक्षिण भारतभरातल्या अनेक मुलींना एका संस्थेने रस्त्यावरचं जिणं सोडून संघटित केलंय आणि आता त्या पार १० किलोचे ढोल पेलत डोल्लू कुनिथा सादर करतात

या मुली दक्षिण भारताच्या वेगवेगळ्या भागातल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणहून रस्त्यावरचं जिणं सोडून स्पर्श या  ना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थेने त्यांना आसरा दिलाय आणि नवीन आयुष्य सुरू करण्याची एक संधी. त्या सगळ्या आता शिक्षण घेतायत – तसंच नृत्य आणि संगीतामध्ये त्या आकंठ बुडाल्या आहेत. आठवडाभर त्या अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये गढून गेलेल्या असतात. आणि शनिवार-रविवार त्या स्वतःच्याच तालावर नाचतात.

त्या राहतात त्या वसतिगृहात मी वाट पाहत बसले होते. आणि त्या येतात – हसऱ्या चेहऱ्यांचा घोळका. अख्खा दिवस शाळेत घालवल्यानंतरही त्या इतक्या खूश – आश्चर्य आहे.

पण ढोल, शाळेच्या गप्पाटप्पा आणि त्यांच्या स्वप्नांबद्दल सांगण्याआधीः “पदार्थविज्ञान सोपं आहे,” मूळची तमिळ नाडूची असणारी १७ वर्षीय कनका व्ही. म्हणते. जीवशास्त्र जीव काढतं “कारण त्यात एवढं इंग्लिश बंबाळ असतं.” तिला विज्ञान आवडतं, “खास करून पदार्थविज्ञान कारण आम्ही जे काही शिकतो ते आमच्या रोजच्या आयुष्याबद्दलच असतं.” तरीही, “मी फार दूरची अशी स्वप्नं बघितलेली नाहीत,” ती म्हणते. आणि मग हसत पुढे जोडते, “मला कुणी तरी असं सांगितलंय की ज्यांना फारशी पुढची कल्पना नसते तेच सर्वात जास्त यश प्राप्त करतात.”

नरसम्मा एस. वय १७ म्हणते, “मला कला आवडतात. चित्रं काढणं आणि नक्षीकाम माझा आवडता छंद आहे. मी शक्यतो पर्वत आणि नद्यांची चित्रं काढते. मी मोठी होत होते तेव्हा माझे आई-वडील नव्हते. मी कचरा वेचायचे. निसर्गाची चित्रं काढताना चित्त इतकं शांत होतं. माझे मागचे दिवस विसरायला मला मदत होते,” ती म्हणते.

Narsamma playing the dollu kunitha
PHOTO • Vishaka George
Gautami plays the dollu kunitha
PHOTO • Vishaka George

नरसम्मा (डावीकडे) आणि गौतमी (उजवीकडे) आठवडाभर अभ्यास करतात, पण शनिवार रविवार मात्र स्वतःच्याच तालावर नाचतात

वयाच्या नवव्या वर्षी आंध्र प्रदेशच्या चित्तूरमधून कचरा वेचण्यातून नरसम्माची सुटका करण्यात आली होती. तिची ध्येयं काय आहेत हे सांगण्यासाठी तिला बिलकुल आग्रह करावा लागला नाही. फॅशन डिझायनिंग, नर्सिंग, अभिनय ही त्यातली काही. तिच्या आयुष्यात सगळ्यात गर्वाचा क्षण कोणता हे आठवायला तिला अजिबात कष्ट पडत नाहीत. तिने एका नाटकात बालविवाहाविरुद्ध लढणाऱ्या एका आईची भूमिका सादर केली होती तो प्रसंग. “आई-वडील आपल्याच लेकरांबरोबर असं कसं करू शकतात?” ती विचारते. “फुललेलं फूल खुडण्यासारखं आहे हे.”

Kavya V (left) and Narsamma S (right) playing the drums
PHOTO • Vishaka George

काव्या (डावीकडे) आणि नरसम्मा (उडवीकडे) शरीराचा कसा पाहणारा हा नाच केल्यानंतरही आधीइतक्याच उत्साहात होत्या

बोलत बोलत त्या नाचासाठी तयार होतात, भल्या मोठ्या पिंपांसारखे दिसणारे ढोल त्यांच्या छोट्या कंबरेला बांधले जातात. ढोलांचा आकार त्यांच्या निम्मा किंवा जास्तच असेल.

आणि मग जे होतं ते म्हणजे धमाका. हा नाच इतका थकवणारा आहे की ज्या सहजतेने त्या नाचतात ते पाहून आनंद उरात मावत नाही. आणि त्यांचा जोश इतका आहे की माझे पायही नकळत ताल धरू लागतात.

आणि जेव्हा त्यांचा नाच संपतो तेव्हा नुसतं त्यांना थिरकताना पाहूनही मला दमायला होतं. त्या मात्र अजिबात थकल्यासारख्या दिसत नाहीत. बागेत आरामात फेरफटका मारावा तसा त्यांचा आविर्भाव असतो. मनोरंजन आणि सांस्कृतिक प्रकार म्हणून या मुली डोल्लू कुनिथा शिकतायत. आतापर्यंत त्यांनी लोकांसमोर हा नाच सादर केलेला नाही ना त्यासाठी काही मानधन घेतलंय. पण त्यांनी जर ठरवलं तर त्यांच्यासाठी ते अशक्य नाही.

अनुवादः मेधा काळे

Vishaka George

Vishaka George is a Bengaluru-based Senior Reporter at the People’s Archive of Rural India and PARI’s Social Media Editor. She is also a member of the PARI Education team which works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Vishaka George
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale