अल्युमिनियमच्या एका मोठ्या भगुल्यातली बटाटा-वाटाण्याची भाजी ढवळायचं काम चालू आहे. प्रकाश भगत शरीराचा भार डाव्या पायावर देतात, उजवा पाय हवेत उचलला गेलाय. तोल सांभाळण्यासाठी लाकडाच्या काठीचा आधार आहे.
“मला वाटतं मी १० वर्षांचा असल्यापासून काठी घेऊनच चालतोय,” ५२ वर्षीय भगत सांगतात. “मी लहान होतो ना तेव्हापासून पाय उचलूनच चालावं लागतंय मला. माझे आई-वडील सांगायचे, की कुठली तर नस ओढली गेली होती.”
अपंगत्व असलं तरी भगत यांचा निर्धार मात्र ठाम आहे. रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातल्या त्यांच्या पारगावमधून दिल्लीला जाणाऱ्या वाहन जत्थ्यात शेतकऱ्यांनी सामील व्हायचं ठरवलं तेव्हा त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांच्यासोबत जायचं ठरवलं. “मी इथे येण्यामागे पण कारण आहे,” भाजीची चव घेत ती ठीकठाक झाल्याचं बघच ते सांगतात.
या वर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे संसदेत रेटून पारित केले. त्या विरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी ठिय्या देऊन बसले आहेत. या आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि २१ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले सुमारे २,००० शेतकरी नाशिकमध्ये जमले. १,४०० किलोमीटर दूर दिल्लीला जाण्यासाठी त्यांचा चारचाकी वाहनांचा जत्था इथून निघणार होता.
पारगावहून एकूण ३९ जणांनी जत्थ्यासोबत जायचं ठरवलं. “या देशाच्या शेतकऱ्याची फसवणूक सुरू आहे,” भगत सांगतात. “खरं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी हमीभाव मिळायला पाहिजे. पण हे नवे कृषी कायदे त्यांना कर्जाच्या खाईत ढकलणार आहेत. शेतकरी पिळवणूक करणाऱ्या मोठ्या कंपन्यांच्या दावणीला बांधले जाणार आहेत. या कायद्यांची झळ आता पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांना लगेच जाणवत असली आणि त्यामुळे आंदोलकांमध्ये त्यांची संख्या सर्वात जास्त असली तरी सगळ्या देशभरातल्या शेतकऱ्यांवर याचा काही परिणाम होणार नाही असं समजणं चुकीचं ठरेल.”


बसमध्ये कांदा, बटाटा आणि तांदूळ आणि इतरही बरंचसं सामान लादलंय. जत्थ्याचं नेतृत्व करणारे लोक जेव्हा विश्रांती घेतात तेव्हा भगत आणि त्यांचे सहकारी कामाला लागतात
भगत स्वतः मच्छीमार आहेत. “शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायचा तर मी पण शेतकरीच पाहिजे असं थोडंच आहे?” ते विचारतात. “बहुतेक लोकांच्या हे लक्षातच येत नाही की ग्रामीण अर्थव्यवस्था चालते शेतीवरच. आता शेतकऱ्यांनाच वाईट दिवस आले तर माझी मच्छी कोण विकत घेईल?”
भगत खेकडे आणि कोळंबी धरतात आणि पनवेलच्या बाजारात विकतात. त्यातून त्यांची महिन्याला ५,००० रुपयांची कमाई होते. “माझ्याकडे मोठी, मशीनवाली बोट नाहीये,” ते सांगतात. “मी होडी वल्हवत मासे धरतो. बाकी मच्छीमार होडीत उभं राहून गळ टाकतात. पण मला उभं राहून तोल सांभाळता येत नाही. त्यामुळे मला खाली बसूनच मासे धरावे लागतात.”
ते स्वतः मच्छीमार असले तरी भगत यांचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे मटण. “गावठी पद्धतीचं,” ते सांगतात. “मला स्वयंपाक करायला नेहमीच आवडतं,” ते पुढे सांगतात. “आमच्या गावात कुणाकडे लगीन असेल तर मी बरेच पदार्थ करतो. पण त्याचा मी एक पैसा घेत नाही. मला आवडतं म्हणून मी करतो. जर गावाबाहेरच्या कुणाकडे जर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा सणाचा स्वयंपाक करून हवा असेल तर मी फक्त गाडीभाड्याचे पैसे घेतो. त्यामुळे मग आमच्या गावातल्या लोकांनी जेव्हा जत्थ्यात सामील व्हायचं ठरवलं, तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी स्वयंपाकाचं काम करेन म्हणून.” या जत्थ्यात ते रोज ४० माणसांचा स्वयंपाक करतायत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न अखिल भारतीय किसान सभेने आयोजित केलेल्या जत्थ्यात सामील होण्यासाठी पारगावच्या गटाने भाड्याने एक बस केलीये. जत्थ्यातले टेम्पो आणि चारचाकी वाहनांच्या गराड्यात ही केशरी रंगाची मोठाली बस चटकन डोळ्यात भरतीये. बसमध्ये सहा किलो कांदे, १० किलो बटाटे, पाच किलो टोमॅटो आणि तांदळाचा एक कट्टा (५० किलो) आणि इतर साहित्य भरलं होतं. ज्या क्षणी मोर्चातले कार्यकर्ते विश्रांतीसाठी थांबतात, तेव्हा भगत आणि त्यांचे दोन सहकारी कामाला लागतात.


‘मला स्वयंपाक करायला नेहमीच आवडतं... त्यामुळे आमच्या गावातल्या लोकांनी जेव्हा मोर्चात सामील व्हायचं ठरवलं तेव्हा मी स्वयंपाक करेन असं ठरवलं’
मग भगत त्यांची काठी घेऊन बसच्या कोठीकडे निघतात. त्यांचे एक सहकारी स्वयंपाकासाठी लागणारं सामान काढतात, त्यात एक भला मोठा गॅस सिलिंडर पण होता. २२ डिसेंबरची दुपार होती, मालेगाव शहरात मोर्चा जेवायला थांबलाय, भात आणि बटाटा-वाटाण्याची भाजी असा बेत आहे. “तीन दिवस पुरेल इतका शिधा आहे,” भगत सांगतात. बससमोर एका चादरीवर बैठक जमवतात आणि कांदे चिरता चिरता आमच्याशी बोलतात. “आमच्यापैकी बरेच जण मध्य प्रदेशच्या वेशीवरून परत जातील. काही जण दिल्लीला पोचतील. कामं सोडून इतके दिवस राहणं सगळ्यांना काही शक्य नाही.”
त्यांच्या गावचे, पारगावचे बहुतेक जण कोळी समाजाचे आहेत आणि मच्छीमारी हीच त्यांची उपजीविका आहे. “आम्ही दर महिन्याला १५ दिवस दर्यावर असतो. ओहोटीच्या वेळी मात्र मासे धरता येत नाहीत,” भगत सांगतात. दर आठवड्याच्या शुक्रवार किंवा शनिवारी त्यांना भरतीच्या आत पारगावला परतायचंय. “भरती चुकवून चालणार नाय,” ते म्हणतात. “टाळेबंदीनंतर आम्ही फार सोसलंय. आमच्या सुरक्षेसाठी आम्ही मासे धरायचं थांबवलं. आम्हाला करोनाचा संसर्ग टाळायचा होता. त्यात पोलिस आम्हाला बाजारात मासे विकू देत नव्हते. आता कुठे आम्ही हळू हळू स्वतःच्या पायावर उभे राहतोय. आता परत एकदा मध्ये खंड पडला तर तो काही परवडायचा नाही.”
टाळेबंदीच्या सुरुवातीला, पारगावच्या सीमा गावकऱ्यांनी पूर्ण बंद केल्या होत्या. “शासनाने निर्बंध उठवले तरी आम्ही काही बंदी उठवली नव्हती,” भगत सांगतात. “काही होऊ नये म्हणून आपल्या नातेवाइकांना सुद्धा कुणी गावात यायला मनाई केली होती.”
ज्या गावाने टाळेबंदीच्या काळात बाहेरच्या कुणालाही गावात प्रवेश करू दिला नाही त्याच गावातले ३९ जण राज्यातल्या इतरांसोबत हजारोंच्या मोर्चात सामील व्हायला निघालेत. “शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायचा तर शंकाच नको.”
लेखनः पार्थ एम. एन., फोटोः श्रद्धा अगरवाल
अनुवादः मेधा काळे