हिवाळ्यातल्या दुपारी, जेव्हा रानातलं काम उरकलेलं असतं, आणि घरातली तरुण मंडळी आपापल्या कामांवर गेलेली असतात तेव्हा हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यातली गडी माणसं बहुतेक वेळा गावातल्या चौपाल किंवा चावडीवर सावलीत निवांत बसलेली असतात किंवा पत्ते खेळताना दिसतात.
बाया मात्र तिथे कधीच दिसत नाहीत.
“बायांचं इथे काय काम?” गावचा रहिवासी विजय मंडल विचारतो. “त्यांना त्यांच्या कामातून सवड मिळत नाही. वह क्या करेंगी इन बडे आदमियों के साथ बैठ कर?”
दिल्लीपासून अगदी ३५ किलोमीटरवर असणाऱ्या, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात येणाऱ्या सुमारे ५,००० वस्तीच्या या गावात अगदी काही वर्षूंपर्वीपर्यंत काटेकोरपणे पडदा पाळला जात असे.
“बाया चौपालकडे बघतही नसत,” मंडल सांगतो. साधारणपणे गावाच्या मध्यभागी असणाऱ्या चावडीवर बैठका होतात, इथेच तंटे सोडवण्यासाठी पंचायत भरते. “पहले की औरत संस्कारी थी,” हरसाना कलानचे माजी सरपंच सतीश कुमार म्हणतात.
“त्यांना मान, इज्जत समजायची,” मंडल म्हणतात. “चावडीच्या जवळून जरी जायचं असलं ना तरी त्या पडदा घ्यायच्या,” हलकसं हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटतं.
३६ वर्षीय सायरासाठी यातलं काहीही नवीन किंवा नाविन्यपूर्ण नाही. दिल्लीजवळच्या माजरा दबस गावातून लग्न होऊन २० वर्षांपूर्वी ती इथे आली, जेव्हापासून गेली १६ वर्षं ती हे सगळे आदेश, बंधनं पाळत आलीये. इथल्या पुरुषांसारखं ती पूर्ण नाव नाही, फक्त तिचं नाव सांगते.
“मी जर लग्नाच्या आधी माझ्या नवऱ्याला भेटले असते ना, तर मी या लग्नाला मंजुरीच दिली नसती. इस गांव में तो कट्टे ना आती [मी या गावात तर अजिबातच आले नसते],” शिलाई मशीनवर एक जांभळं कापड सरसर सुईखाली सरकवत सायरा सांगते. (तिचं आणि तिच्या घरच्या सगळ्यांची नावं बदलली आहेत.)
“या गावात एखादी बाई बोलायला लागली ना, तर गडी माणसं तिला बोलू देत नाहीत. पुरुष मंडळी सगळं करतायत तर तुम्हाला बोलायची गरजच काय असं त्यांचं म्हणणं असतं. माझ्या नवऱ्यालाही असंच वाटतं की बाईने घरातच रहावं. आता माझ्या शिवणकामासाठी जरी मला काही बाहेर जाऊन आणायचं असेल तरी तो म्हणतो, की मी घरीच राहणं भल्याचं आहे,” सायरा सांगते.
तिचा नवरा, ४४ वर्षीय समीर खान, दिल्लीतल्या नरेलामध्ये एका प्लास्टिकचे साचे बनवणाऱ्या कारखान्यात काम करतो. तो सायराला नेहमी म्हणतो की पुरुष बाईकडे कशा नजरेने पाहतात ते तिला समजत नाही म्हणून. “तो म्हणतो, की तू घरी राहिलीस तर सुरक्षित आहेस, ‘बाहर तो भेडियें बैठे है’,” ती सांगते.
त्यामुळे मग सायरा घरीच असते, त्या सगळ्या काल्पनिक लांडग्यांपासून सुरक्षित. हरयाणाच्या ग्रामीण भागातल्या ६४.५ टक्के स्त्रियांप्रमाणे. ज्या एकटीने बाजारात, दवाखान्यात किंवा गावाबाहेर कुठेच जाऊ शकत नाहीत ( राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवाल-४, २०१५-१६ ). ती रोज दुपारी घराच्या खिडकीपाशी ठेवलेल्या आपल्या शिलाई मशीनवर कपडे शिवते. तिथे भरपूर उजेड असतो, आणि दुपारच्या वेळी इथे हमखास दिवे जातात. या कामातून तिची महिन्याला २,००० रुपयांची कमाई होते, मनाला जरा शांतता मिळते आणि आपल्या मुलांसाठी, १६ वर्षांचा सोहेल खान आणि १४ वर्षांचा सनी अली साठी काही चार-दोन गोष्टी विकत घेता येतात. स्वतःसाठी मात्र सायरा क्वचितच काही खरेदी करते.
सनीचा जन्म झाला आणि काही महिन्यांनीच सायराने लॅप्रोस्कोपी पद्धतीने नसबंदी करून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तिच्या नवऱ्याला याची काहीच कल्पना नव्हती.
सोनिपत जिल्ह्यात १५ ते ४९ वयोगटातल्या सध्या विवाहित असणाऱ्या महिलांमध्ये गर्भनिरोधकांच्या वापराचा दर ७८ टक्के इतका आहे (एनएफएचएस-४) – संपूर्ण हरयाणा राज्यासाठी हाच आकडा ६४ टक्के आहे.
तिच्या मुलाच्या जन्मानंतरच्या काही महिन्यात सायराने दोनदा नसबंदी करून घ्यायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा तिच्या माहेरी, मजरा दबसमधल्या सरकारी रुग्णालयात ती गेली तेव्हा तिथला डॉक्टर चक्क तिला म्हणाला की ती विवाहित आहे असं वाटत नाही. दुसऱ्या वेळी त्याच दवाखान्यात ती तिच्या मुलाला पुरावा म्हणून घेऊन गेली. “तो डॉक्टर मला म्हणाला की हा निर्णय माझा मी घ्यायला मी अजून लहान आहे म्हणून,” सायरा सांगते.
अखेर तिसऱ्या वेळी, माहेरी असताना, दिल्लीतल्या रोहिणीमधल्या एका दवाखान्यात तिनी नसबंदी करून घेतली.
“या वेळी मी माझ्या नवऱ्याशी खोटं बोलले. मी माझ्या मुलाला सोबत घेतलं आणि डॉक्टरांना सांगितलं की माझा नवरा दारुडा आहे म्हणून,” सायरा सांगते. तेव्हाचे प्रसंग आठवून तिला आता हसू आवरत नाही. कसंही करून तिला नसबंदी का करून घ्यायची होती हे मात्र तिला पक्कं आठवतंय. “घरी काहीच ठीक चालू नव्हतं, त्रास आणि सततचा संघर्ष सुरूच. एकच गोष्ट मला नक्की माहित होती – मला आणखी मुलं नको होती.”
नसबंदीचा तो दिवस सायराला स्पष्ट आठवतोयः “त्या दिवशी पाऊस सुरू होता. त्या वॉर्डाच्या काचेच्या दारातून मला माझ्या आईच्या कुशीत माझा मुलगा रडत होता ते दिसत होतं. ज्या इतर बायांची नसबंदी झाली होती त्या गाढ झोपलेल्या होत्या [भूल उतरायची होती]. माझी भूल लवकर उतरली. मला मुलाला पाजायची काळजी लागून राहिली होती. त्यामुळे मी खूप अस्वस्थ होते.”
समीरला जेव्हा कळालं, तेव्हा अनेक महिने त्याने माझ्याशी बोलणं टाकलं होतं. त्याला राग आला होता कारण तिने स्वतः हा निर्णय घेतला होता. त्याची अशी इच्छा होती की तिने तांबीसारखं गर्भाशयात बसवायचं साधन वापरावं, जे नंतर काढून टाकता येतं. पण सायराचा निश्चय पक्का होता की तिला आणखू मुलं नको होती.
“आमची शेती आहे, म्हशी आहेत. आणि घर सांभाळून ते सगळं मीच पाहत होते. गर्भाशयात काही बसवलं आणि त्यामुळे मला काही झालं असतं तर?” तिला तेव्हाची गोंधळून गेलेली २४ वर्षांची ती आठवते, केवळ १० वी पर्यंत शिकलेली, आणि जिला आयुष्याबद्दल किंवा गर्भनिरोधकांबद्दल फारसं काहीच माहित नव्हतं.
सायराची आई निरक्षर होती. वडील नव्हते. पण त्यांनीही कधी तिने शिक्षण सुरू ठेवावं याचा हट्ट धरला नाही. “बाईची गत गुरासारखीच आहे. म्हशीसारखे आमचे मेंदूही बथ्थड झालेत,” सुईवरची नजर वर करत ती म्हणते.
“हरयाणा के आदमी के सामने किसी की नही चलती,” ती पुढे म्हणते. “तो म्हणेल ती पूर्व दिशा. त्याने जर सांगितलं की जेवणात आज हेच बनेल, तर तेच बनतं. खाणं, कपडे, बाहेर जाणं अगदी सगळं त्याच्या म्हणण्यानुसारच घडतं.” सायरा आपल्या नवऱ्याबद्दल बोलायचं थांबवून आपल्या वडलांबद्दल कधी बोलायला लागली ते लक्षातही आलं नाही.
सायराच्या नात्यातली, तिच्या शेजारीच राहणारी ३३ वर्षीय सना खान (तिचं आणि तिच्या सर्व नातेवाइकांचं नाव बदलण्यात आलं आहे) वेगळा विचार करत असेल असं तुम्हाला वाटू शकतं. बीएड केल्यानंतर तिला शिक्षक म्हणून पात्रता मिळवून प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करायचं होतं. पण जेव्हाही घराबाहेर पडून काम करण्याचा विषय निघायचा तेव्हा तिचा नवरा ३६ वर्षीय रुस्तम अली तिला टोमणे मारायचा. एका लेखापालाच्या कचेरीत कार्यालयीन सहाय्यकाचं काम करणारा रुस्तम म्हणायचाः “तू बाहेर जाऊन काम कर. मी घरात बसतो. तूच जाऊन कमवून आण आणि एकटीने हे घर चालव.”
त्यामुळे सनाने आता तो विषय काढणंच थांबवलंय. “काय उपोयग आहे? नुस्ती वादावादी होणार. या देशात पुरुषाचा विचार सर्वप्रथम. त्यामुळे मग बायांनी सगळ्या तडजोडी करायच्या. कारण जर का त्यांनी त्या केल्या नाहीत, तर मग भांडणं होणार,” स्वयंपाकघराबाहेर पाहत ती म्हणते.
जसं सायरा दुपारच्या वेळेत शिवणकाम करते, तसं सना त्या वेळात घरीच प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या शिकवण्या घेते. त्यातून ती महिन्याला रु. ५,००० म्हणजे तिच्या नवऱ्याच्या पगाराच्या निम्मे पैसे मिळवते. यातला बराचसा पैसा मुलांवर खर्च होतो. पण हरयाणातल्या ५४ टक्के स्त्रियांसारखं तिचंही बँकेत खातं नाही, जे ती स्वतः एकटी चालवू शकते.
सनाला कायम वाटायचं की तिला दोनच मुलं हवी आहेत आणि गर्भाशयात बसवायची साधनं वापरून ती मुलांमध्ये अंतर ठेवू शकते. रुस्तम आणि तिची तीन मुलं आहेत – दोन मुली आणि एक मुलगा.
तिची पहिली मुलगी आसिया २०१० साली जन्मली, त्यानंतर सनाने सोनिपतच्या खाजगी दवाखान्यात जाऊन गर्भाशयात आयूडी बसवून आली. बरीच वर्षं तिला असंच वाटत होतं की ती मल्टिलोड आययूडी आहे, कॉपर-टी किंवा तांबी नाही. गावातल्या इतर अनेकींप्रमाणे तिलाही तांबीबद्दल जर शंका होती आणि तिला ती बसवून घ्यायची नव्हती.
“तांबी जास्त काळ टिकते आणि १० वर्षांपर्यंत गर्भधारणा होऊ देत नाही. मल्टिलोड आययूडी तीन ते पाच वर्षांसाठी प्रभावी ठरतात,” हरसाना कलान गावातल्या उपकेंद्रातल्या नर्स (एएनएम) निशा फोगाट सांगतात. “गावातल्या अनेक जणी मल्टिलोड आययूडी वापरतात. आजही त्यांची पहिली पसंती याच साधनाला आहे.” एकमेकींकडून काय काय ऐकून त्यांच्या मनात तांबीबद्दल शंका निर्माण होतात. “एखाद्या बाईला जर गर्भनिरोधक साधन वापरल्याने त्रास झाली तर इतर बायाही ते साधन वापरायचं टाळतात,” निशा सांगतात.
२००६ पासून हरसाना कलानमध्ये आशा कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या सुनीता देवी सांगतात, “बायांनी समजून घेतलं पाहिजे की तांबी बसवून घेतल्यानंतर त्यांनी जड वजन उचलू नये किंवा आठवडाभर विश्रांती घेतली पाहिजे. तांबी गर्भाशयात नीट बसण्यासाठी ते गरजेचं आहे. पण त्या तसं करत नाहीत किंवा करू शकत नाहीत. त्यामुळे मग त्यांना त्रास होऊ शकतो. आणि मग त्यांची नेहमीची तक्रार सुरू होते, ‘वर जाऊन माझ्या काळजाला चिकटलीये’.”
सना आययूडी काढून घ्यायला गेली तेव्हा तिला समजलं की तिच्या गर्भाशयात तांबी बसवली आहे. “माझा नवरा आणि खाजगी दवाखान्यातला डॉक्टर, दोघं माझ्याशी खोटं बोलले. आणि एवढी सगळी वर्षं त्याला [रुस्तम अली] माहित होतं की मी मल्टिलोड आययूडी नाही तर तांबी वापरतीये म्हणून. पण त्याने मला खरं सांगण्याची तोशीसही घेतली नाही. मला जेव्हा समजलं तेव्हा मी त्याच्याशी भांडलेच,” ती म्हणते.
पण तिला जर काही त्रास झाला नाही तर मग खरंच काय फरक पडतो, मी तिला विचारलं. “ते खोटं बोलले. असंच चालू राहिलं तर मग ते माझ्या शरीरात काहीही बसवतील आणि मला खोटं काही तरी सांगतील,” ती म्हणते. “त्याने [रुस्तम अली] मला सांगितलं की डॉक्टरांनीच त्याला मला गाफील ठेवायला सांगितलं, का तर बायांना तांबीच्या आकाराची भीती वाटते म्हणून.”
आययूडी काढल्यानंतर २०१४ साली तिच्या दुसऱ्या मुलीचा जन्म झाला, अख़सी. आता आपलं कुटुंब पूर्ण झालं असं तिला वाटत होतं. मात्र २०१७ पर्यंत तिच्यावर घरच्यांचा दबाव होता. “मुलगा म्हणजे त्यांना मोलाचा वाटतो, मुलींबद्दल त्यांच्या मनात तशी भावना नसते,” ती म्हणते.
०-६ वयोगटातल्या मुलींची संख्या सर्वात कमी असणाऱ्या राज्यांमध्ये हरयाणाचा समावेश होतो, १००० मुलग्यांमागे ८३४ मुली (जनगणना, २०११). सोनिपतमध्ये हा आकडा आणखी कमी, दर हजार मुलांमागे ७९८ मुली इतका आहे. मुलग्याचा हव्यास आहेच पण सोबत मुली नकोशा आहेत हेही सर्वज्ञात आहे. सोबतच अतिशय पुरुषसत्ताक समाजात कुटुंब नियोजनासंबंधीचे निर्णय बहुतेक वेळा नवरा आणि इतर नातेवाईक घेत असल्याचंही दिसून आलं आहे. एनएफएचएस-४ च्या आकडेवारीनुसार हरयाणातल्या केवळ ७० टक्के स्त्रिया स्वतःसंबंधी आरोग्यसेवेच्या निर्णयात सहभागी होतात, पण पुरुषांसाठी मात्र हाच आकडा ९३ टक्के इतका आहे.
कांता शर्मा (त्यांचं आणि त्यांच्या सर्व नातेवाइकांची नावं बदलण्यात आली आहेत), सायरा आणि सनाच्याच वस्तीत राहतात. त्या वगळता त्यांच्या कुटुंबात पाच जण आहेत. त्यांचा नवरा, ४४ वर्षीय सुरेश शर्मा आणि चार अपत्यं. दोघी मुली, आशु आणि गुंजन लग्नानंतर पहिल्या दोन वर्षांतच जन्मल्या. दुसरी मुलगी झाल्यानंतर या दोघांनी ठरवलं होतं की कांता नसबंदी करून घेतील म्हणून, पण सासरचे तयार नव्हते.
“दादींना नातू हवा होता. त्या नातवापायी आम्हाला चार मुलं झाली. घरातल्या मोठ्यांची इच्छा आहे ना, मग तसंच होणार. माझा नवरा घरात सर्वात थोरला आहे. त्यामुळे घरच्यांच्या निर्णयाविरोधात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” ३९ वर्षांच्या कांता सांगतात. गेल्या अनेक वर्षांत अभ्यासातल्या नैपुण्यासाठी मुलींना मिळालेली पदकं आणि चषकांवर त्यांची नजर लागलेली आहे.
गावात नव्या मुली सुना म्हणून येतात तेव्हा सुनीता देवींसारख्या आशा कार्यकर्त्या त्यांची नोंद ठेवतात, पण बहुतेक वेळा त्यांचं प्रत्यक्ष बोलणं मात्र एक वर्षभर उलटून गेल्यानंतरच होतं. “इथे बहुतेक नवविवाहित महिलांना लग्नाच्या पहिल्या वर्षातच दिवस जातात. बाळ जन्मल्यानंतर, आम्ही तिच्या घरी भेट देतो आणि तिच्या सासूसमोरच तिच्याशी कुटुंब नियोजनाबद्दल बोलतो. आणि मग, जेव्हा कुटुंबाची एकत्र चर्चा होते, आम्हाला त्यांचा निर्णय सांगितला जातो,” सुनीता सांगतात.
“नाही तर सासू आमच्यावर खवळते, आणि म्हणते, ‘हमारी बहू को क्या पट्टी पढा के गयी हो’,” सुनीता म्हणतात.
तिसरी मुलगी झाल्यानंतर मात्र कांतांनी गर्भनिरोधक गोळ्या घ्यायला सुरुवात केली. सासू-सासऱ्यांपासून लपवून त्यांचा नवरा त्यांना या गोळ्या आणून देत असे. काही महिन्यांनी त्यांनी गोळ्या घेणं थांबवलं आणि मग त्यांना परत दिवस गेले. या वेळी मुलगा झाला. पण दैवदुर्विलास असा की दादींना काही नातवाचं तोंड पाहता आलं नाही. कांतांच्या सासूबाई २००६ साली वारल्या. त्यानंतर एक वर्षाने त्यांचा मुलगा, राहुल जन्मला.
तेव्हापासून कांताच त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यात ज्येष्ठ महिला आहेत. त्यांनी आययूडी बसवून घेतली. त्यांच्या मुली शिकतायत, थोरली नर्सिंगच्या पदवीचं शिक्षण घेतीये. तिच्या लग्नाचा विषयही कांतांच्या मनात अजून नाही.
“त्यांनी शिकावं आणि यशस्वी व्हावं. आपणच आपल्या मुलीला तिला काय मिळवायचंय त्यात मदत केली नाही तर तिच्या नवऱ्याने किंवा सासरच्यांनी तिला शिकू द्यावं अशी अपेक्षा तरी कशी करणार? आमचा काळ वेगळा होता. तो गेला आता,” कांता म्हणतात.
आणि त्यांच्या भावी सुनेबद्दल? “तेच,” कांता म्हणतात. “तिला काय करायचंय हा तिचा निर्णय असेल. काय करायचं, काय वापरायचं [गर्भनिरोधक]. आमचा काळ वेगळा होता. तो आता गेला.”
शीर्षक चित्रः प्रियांका बोरार नव माध्यमांतील कलावंत असून नवनवे अर्थ आणि अभिव्यक्तीच्या शोधात ती तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग करते. काही शिकता यावं किंवा खेळ म्हणून ती विविध प्रयोग करते, संवादी माध्यमांमध्ये संचार करते आणि पारंपरिक कागद आणि लेखणीतही ती तितकीच सहज रमते.
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया
zahra@ruralindiaonline.org
शी संपर्क साधा आणि
namita@ruralindiaonline.org
ला सीसी करा
अनुवादः मेधा काळे