संध्याकाळ होताच तो एका बागेत गेला. सुनसान. बाकड्यावर बसताना जवळ असलेली लांब काठी आणि फोन बाजूला ठेवून दिला. वर्षातून दुसर्यांदा ती बाग अगदी सुनसान आणि शांत झाली होती. लहान मुलं आणि मोठी माणसं पुन्हा एकदा आपल्या घरात अडकून पडलेली.
काही दिवस झाले तो बागेत येत होता. रात्र होताच, रस्त्यावरील दिवे लागताच, मैदानावर झाडांच्या फाद्यांच्या सावल्या पडू लागल्या. झाडांमधून हलकी झुळूक येत होती. भिरभिरत येणारा पाचोळा त्याचं लक्ष वेधून घेत होता पण त्याच्या आत दाटून आलेला अंधार अधिक गडद होत होता. त्या वादळाचा सामना करत तो तासंतास तिथे शांत बसून होता.
पंचविशीच्या त्या तरुणाला आसपासचे काही जण ओळखत असले, तरी बहुतांश लोकांसाठी तो अपरिचितच होता. त्याने घातलेला युनिफॉर्म बघून तो करत असलेलं काम लक्षात येत होतं, तो जवळच्याच एका इमारतीत चौकीदार म्हणून काम करत असे. त्याचं नाव? कुणाला काय पडलंय? सात वर्षं काम करूनही इमारतीतील ‘जमीनदारांसाठी’ तो अनोळखीच होता, त्याच्या अस्तित्वाची त्यांना कसलीही फिकीर नव्हती.
तो उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड प्रांतातून आला होता. तिथेच कवी आणि कथाकार असलेल्या त्याच्या वडलांचा खून करण्यात आला होता. का? आपले विचार मांडल्याबद्दल, व्यक्त केल्याबद्दल. त्यांची एकमेव ठेव, त्यांचं लेखन आणि पुस्तकं, जाळून टाकण्यात आली होती. मागे राहिलं होतं मोडकळीला आलेलं, अर्धवट जळालेलं एक झोपडीवजा घर, दुःखाचा डोंगर कोसळलेली आई आणि घाबरलेला १० वर्षाचा मुलगा. मारेकरी तिच्या मुलालाही घेऊन जातील या भीतीखाली तिने घाबरून आपल्या मुलाला पळून जायला सांगितलं होतं.
त्याला शिकायचं होतं, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊन ठेवत लिहायचं होतं, परंतु त्याला मुंबईत रेल्वे स्टेशनवर लोकांचे बूट पॉलिश करावे लागत होते. त्याने गटारं साफ केली, बांधकामावर काम केलं आणि काही वर्षात तो चौकीदाराच्या नोकरीपर्यंत पोहोचला. चौकीदार म्हणून मिळणाऱ्या पगारातून तो आईला पैसे पाठवू लागला. त्याच्या आईने लगेचच लग्न कर म्हणून त्याला गळ घातली होती.
तिने एक तरुण मुलगी पसंत केली. तिचे काळेभोर डोळे बघून तो मोहित झाला होता. मधुना भंगी फक्त १७ वर्षांची होती आणि नावाप्रमाणेच प्रेमळ आणि हसमुख होती. तो तिला मुंबईला घेऊन आला. त्या आधी तो नालासोपाऱ्यात चाळीतल्या एका खोलीत १० जणांबरोबर राहायचा. मधुना शहरात आल्यावर त्याने मित्राची खोली काही दिवसांकरिता भाड्याने घेतली. ती आल्यापासून दोघे नेहमी एकमेकाला बिलगून राहत असत. मुंबईतील लोकलच्या गर्दीला, मोठमोठ्या इमारतींना, दाट वस्तीला घाबरून ती लगेचच म्हणाली “गावाकडची हवाच इथे नाहीये, मला नाही राहायचं इथे.” चौकीदारालाही पहिल्यांदा मुंबईत आल्यावर अगदी हेच वाटलेलं.
काही महिन्यातच मधुनाला दिवस गेले आणि ती गावी परत गेली. चौकीदार तिच्यासोबत राहायची तयारी करत होता परंतु लॉकडाऊनमुळे सगळंच फिसकटलं. त्याने गावी परत जाता यावं म्हणून गयावया केली परंतु मालकाने नकार दिला. मालकाने सांगितलं की आत्ता गावी गेला तर त्याची नोकरी जाईल आणि त्याच्यामुळे ही नवीन ‘बीमारी’ त्याच्या बाळाला होईल.
या लोकांना आपली काळजी वाटते म्हणून हे सांगत असतील असं म्हणत चौकीदाराने स्वतःला समजवायचा प्रयत्न केला. (खरं तर मालकांना चौकीदाराने इमारतीच्या इमारतीला पहारा देण्याचे काम सोडून जाऊ नये असं वाटत होतं.) त्याला वाटलं काही आठवडेच आपल्याला वाट पहावी लागेल आणि तसंही त्याच्यासाठी पैसाही महत्वाचा होता. लहानपणी त्याला जे जे मिळालं नव्हतं ते त्याला आपल्या बाळाला पुरवायचं होतं. काही दिवसांपूर्वी त्याने बाजारात एक पिवळ्या रंगाचा छोटासा ड्रेस बघितला होता. दुकान उघडताच त्याला तो ड्रेस आपल्या बाळासाठी घ्यायचा होता आणि मधुनासाठी एक सुंदर साडी. अस्वस्थतेतही लहान बाळासाठी जोपासलेली स्वप्न दडलेली होती.
गावात राहत असलेल्या मधुनाकडे फोन नव्हता, त्यात भर म्हणजे गावामध्ये नेटवर्क व्यवस्थित येत नव्हतं. चौकीदाराने आपला नंबर तिला एका कागदावर लिहून दिला होता, तो कागद घेऊन ती किराणा मालाच्या दुकानाच्या शेजारी जाऊन बूथवरून त्याला फोन करायची. दुकानं बंद झाल्यावर शेजाऱ्याला विनंती करून ती त्याच्याशी संपर्क साधायची.
तिने नवऱ्याला गावी परत यायची विनंती केली पण तो मुंबईत अडकून पडला होता. काही आठवड्यांनी त्याला बातमी कळली: त्यांना मुलगी झाली. घरच्यां अजून तिचं नाव ठेवलं नव्हतं, मधुनाची इच्छा होती कि नाव ठेवण्याआधी त्याने येऊन बाळाला एकदा बघावं.
रात्र गडद होताच आजूबाजूचे दिवे मंद होतं गेले, चौकीदार बागेतील बाकड्यावरून उठला आणि रात्री राऊंड मारायला निघाला. इमारतीतील सगळ्या घरांमधून प्रकाश बाहेर पडत होता. काही घरांमधून टीव्हीचा प्रकाश दिसत होता. लहान मुलांचा गोंगाट ऐकू येत होता, कुकरच्या शिट्ट्या वाजत होत्या.
लॉकडाऊन दरम्यान तो इमारतीत दिवसरात्र लोकांच्या घरापर्यंत ऑनलाईन मागवलेले खाद्यपदार्थ पोहोचवत असे. त्याच्या मनात मधुना आणि लहान बाळाचा विचार यायचा, ‘त्यांना पोटभर खायला मिळत असेल ना’ याची चिंता त्याला नेहमी असायची. तो आजारी लोकांना रुग्णवाहिकेत घेऊन जायला मदत करायचा, त्याला विसर पडायचा कि हा आजार त्यालाही लागू शकतो. त्याने आपल्या सोबत काम करणाऱ्या माणसाला आजारी पडल्याच्या कारणावरून कामावरून काढून टाकताना बघितलं, त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याला खोकला आलां तेव्हा तो कोपर्यात जाऊन लपून खोकला, कारण त्याला आपली नोकरी जाण्याची भीती होती.
त्याने एका घरकाम करण्याऱ्या बाईला इमारतीत कामावर परत घेण्यासाठी विनवणी करताना बघितलं. तिच्या मुलाला क्षयरोग झाला होता आणि आजार आणि उपासमारीमुळे तो खंगून गेला होता, तिचा नवरा सगळे जमा केलेले पैसे घेऊन पळून गेला होता. काही काळानंतर चौकीदाराने त्या बाईला आणि तिच्या मुलीला रस्त्यावर भीक मागत बसलेलं पाहिलं.
त्याने पाहिलं कि एका भाजी विक्रेत्याचा ठेला काही गुंडांनी पलटवला. तो भाजी विक्रेता काम करण्यासाठी गयावया करत होता, तो रडला, भेकला. त्या दिवशी त्याच्याकडे ‘इफ्तार’ साजरा करण्यासाठी काहीही नव्हतं. त्याचं कुटुंब त्याची वाट बघत होतं. गुंडांनी त्याला सांगितलं ‘काम करताना तुला आजार होईल, आम्ही तुझं रक्षण करतोय.’ रस्त्यावर सगळ्या भाज्यांचा सडा पडला होता, आणि गुंड त्यात त्याचा ठेला घेऊन गेले. त्याने भाज्या हाताने उचलुन शर्टात कोंबायचा प्रयत्न केला, टोमाटो शर्टात कोंबल्यामुळे त्याचा शर्ट लाल झाला. कोंबलेल्या भाज्याही थोड्याच वेळात परत खाली पडल्या.
इमारतीतील लोकांनी खिडकीतून हे सगळं बघितलं, आपापल्या फोनवर रेकोर्ड केलं, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करण्यात आले, सरकारला जाब विचारणारे लेखही लिहिले गेले.
त्याने बाजारात पिवळ्या रंगाचा छोटासा ड्रेस बघितला
होता. दुकान उघडताच आपल्या बाळासाठी घ्यायचा होता आणि मधुनासाठी
एक सुंदर साडी
डिसेंबर उजाडला आणि चौकीदाराला वाटलं कि आता आपल्याला घरी जाता येईल, कारण बाकीचे काही जण कामावर यायला लागले होते. परंतु काही नवीन लोकंही काम शोधतं आले होते. त्याने त्यांची हतबलता पाहिली, त्यांच्या डोळ्यात त्याला ईर्ष्या दिसली. त्याला कळालं कि आपण आत्ता गावी गेलो तर आपली नोकरी जाऊ शकते, म्हणून त्याने काळजावर दगड ठेवत मुंबईतच थांबायचं ठरवलं. तो हे सगळं मधुना आणि बाळासाठीच करत होता. त्याला माहिती होतं कि ती समजून घेईल. त्याला खात्री होती की गावातला जमीनदार कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावतोय किंवा पोटभर अन्न मिळत नाहीये याबद्दल ती तक्रार करणार नाही.
त्यानंतर अजून एका लॉकडाऊनची बातमी आली. रुग्णवाहिकांचे भयाण आवाज दिवसरात्र येत होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थिती अधिकच भीषण होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर एका वृद्ध वडिलांना घराबाहेर काढलेलं त्याने पाहिलं. त्याने लहान लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये नेताना पाहिलं.
त्याने आपलं काम चालूच ठेवलं आणि मधुनाला शब्द दिला कितो लवकरच घरी येईल. ती घाबरून नेहमी फोनवर रडायची, म्हणायची “स्वतःला वाचवा, बरं. आम्हाला गरज आहे तुमची. बाळाला आपले वडील आहेत हेच माहित नाहीये अजून.” हे ऐकून त्याच्या काळजात चर्ररर् व्हायचं आणि तो शांत व्हायचा. त्या काही मिनिटांच्या संभाषणाच्या आधारे दोघेही कठीण काळात तग धरून उभे होते. ते कमी बोलायचे पण एकमेकांच्या श्वासाचा आवाज ऐकून त्यांना शांत वाटायचं.
थोड्या दिवसांनी अजून एक फोन आला “त्यांना कुठल्याही हॉस्पिटलने घेतलं नाही. सगळे बेड्स भरले आहेत, ऑक्सिजनच मिळत नाहीये. तुझी पत्नी आणि मूल शेवटपर्यंत श्वास घेण्यासाठी धडपडत होतं,” एका गावकऱ्याने बिथरलेल्या आवाजात त्याला सांगितलं. तो स्वतः आपल्या वडिलांसाठी ऑक्सिजन सिलेंडर शोधतं फिरत होता. संपूर्ण गावच श्वास घेण्यासाठी भीक मागत होतं.
शेवटच बंधन ज्यासाठी आणि ज्यामुळे तो तग धरून उभा होता, तेच आता तुटलं होत. त्याच्या ‘ मालकाने’ अखेर त्याला ‘सुट्टी’ दिली. पण तो आता कुणासाठी आणि कुणाकडे जाणार होता? तो पाकिटबंद खाणं पोहोचवायच्या आपल्या कामावर पुन्हा रुजू झाला. त्याच्या छोट्या पिशवीत व्यवस्थित गुंडाळून ठेवलेला पिवळा ड्रेस आणि साडी पडून होते. मधुना आणि त्याचं अनाम बाळ कुठेतरी फेकलं गेलं होतं किंवा त्यांचं सरण पेटलं होतं.
अनुवादः हृषीकेश पाटील