‘‘केसांना रंग लावला की ते आणखी पांढरे होतात,’’ पुष्पवेणी पिल्लई म्हणते. ‘‘हे बघ, याच्यासारखे,’’ बोलता बोलता ती जमिनीवरच्या पांढर्या लाद्यांकडे बोट दाखवते. पांढर्या आणि फिकट निळ्या रंगसंगतीच्या लाद्या आहेत तिच्या घरात. साठी कधीच उलटली आहे पुष्पवेणीची, पण डोक्यावर एखाद दुसराच पांढरा केस दिसतोय. ‘‘खोबरेल तेल आणि लाइफबॉय साबण ओन्ली...’’ ‘ओन्ली’ या इंग्रजी शब्दावर जोर देत ती सांगते. तिला तस्संच म्हणायचं असतं!
दुपारच्या वेळेला चकचकीत टाइल्सच्या जमिनीवर ती बसलेली असते, ‘जाने कहां’ गेलेल्या ‘वो दिन’च्या आठवणी काढत आणि आताच्या जमान्याविषयी, वर्तमानाविषयी बोलत. ‘‘माझ्या आईच्या वेळी...’’ ती आठवणींत रमते. ‘‘तिची सासू तिला ओल्या खोबर्याचा तुकडा द्यायची. माझी आई तो चावायची आणि मग अंघोळ करताना तो डोक्याला चोळायची. त्यांचं खोबरेल तेल होतं ते.’’
पुष्पवेणीच्या शेजारी बसलेली वासंती पिल्लई तिला दुजोरा देते. दोघी लांबच्या नात्यातल्या आहेत. धारावीच्या एकाच गल्लीतल्या एका खोलीच्या घरांमध्ये दोघी पन्नास वर्षं राहातायत. इथल्या जगण्यानं आयुष्यात मिळालेलं समाधान, दोघी जवळच राहात असल्यामुळे त्यांच्यात गेली अनेक वर्षं असलेलं नातं आणि इथल्या बदललेल्या जगाच्या भरपूर आठवणी... दोघी बोलत राहातात.
पुष्पवेणी नवरी म्हणून धारावीत आली तेव्हा जेमतेम चौदा-पंधरा वर्षांची होती. त्याच गल्लीतल्या मैदानात उभारलेल्या मंडपात तिचं लग्न झालं होतं. मुलगा धारावीतच राहाणारा होता. ‘‘चाळीस वर्षांचा होता तो,’’ ती सांगते. इतका मोठा...? ‘‘हो. बुटका होता ना... कळलंच नाही आम्हाला! आणि त्यावेळी या अशा गोष्टी कोणी पाहातही नव्हतं ना! लग्नाचं जेवण होतं, सांबार-भात. व्हेज फक्त!’’
लग्नानंतर पुष्पवेणी आणि तिचा नवरा चिनासामी इथल्या एका खोलीत राहायला आले. चिनासामीने त्यावेळी चिक्कार असलेले पाचशे रुपये मोजून ही खोली घेतली होती. धारावीतच एका छोट्याशा कारखान्यात तो नोकरी करत होता. शस्त्रक्रियांसाठी लागणारे दोरे आणि वायर बनवण्याचं वर्कशॉप होतं ते. सुरुवातीला ६० रुपये पगार होता. १९९५ च्या आगेमागे निवृत्त झाला तेव्हा त्याचा पगार होता २५ हजार रुपये.
ती दोनेकशे चौरस फुटांची खोली हे पुढली पन्नास वर्षं पुष्पवेणीचं घर झालं. नंतर, जसं कुटुंब वाढलं, तसा त्यांनी वर पोटमाळा चढवून घेतला. ‘‘एक वेळ अशी होती, आम्ही नऊ माणसं होतो घरात.’’ पुष्पवेणी सांगते. टी-जंक्शनकडून धारावीत वळणारी गल्ली. टेम्पो आणि ऑटोरिक्षांच्या गराड्यातून वाट काढतच इथे पुढे सरकावं लागतं. ‘‘माझी तिन्ही मुलं त्याच खोलीत असताना जन्माला आली. त्यांची लग्नं झाली तीही आम्ही तिथेच असताना आणि त्यांना मुलं, अगदी नातवंडं झाली तीही मी त्याच खोलीत राहात असताना.’’
वासंतीची आता साठी उलटली आहे. वीस वर्षांची असताना तीही लग्न करून याच गल्लीत राहायला आली. तिची सासू आणि पुष्पवेणीचा नवरा ही बहीणभावंडं. त्यामुळे आली तेव्हा वासंतीचं कुटुंब होतं धारावीत. ‘‘तेव्हापासून मी इथेच आहे. ही गल्ली सोडून कुठेच गेले नाही राहायला,’’ ती सांगते.
सत्तरच्या दशकात या दोघी धारावीत राहायला आल्या तेव्हा धारावी खूपच वेगळी होती. ‘‘खोल्या छोट्या होत्या, पण त्या सुट्या होत्या. त्यांच्या मधे मोकळी जागा बरीच होती,’’ पुष्पवेणी सांगते. तिचं घर पहिल्या मजल्यावर होतं. ‘सबकुछ’ असलेली सिंगल रूम, थोड्या अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृह. ‘‘आता इथे घरं एकमेकांना इतकी चिकटली आहेत, की गल्लीतून चालणंही अशक्य होतं.’’ हातांनी गल्लीचा अरुंदपणा दाखवत ती म्हणते. (तेव्हापासून वाढत गेलेली उत्तर मध्य मुंबईतली धारावी आता एक चौरस मैलावर पसरली आहे. झोपडपट्ट्या, इमारती, दुकानं, छोटेमोठे कारखाने आणि उद्योग यांच्यासह जवळपास दहा लाख लोकांना तिने आपल्या पोटात घेतलं आहे.)
‘‘इथे खाडी होती... जंगल होतं सगळं,’’ वासंती आपल्या आठवणीतल्या धारावीबद्दल सांगते. ‘‘माहीमच्या खाडीचं पाणी (आताच्या टी जंक्शनच्या) पोलीस चौकीपर्यंत यायचं. इथे सतत चिखल, माती आणून टाकली गेली. जमीन तयार होत गेली आणि खोल्या उभ्या राहात गेल्या.’’ इथून जवळच असलेलं वांद्रे-कुर्ला संकुलही तिला आठवतं ते तिथली दलदल, खाजण आणि तिथे असलेलं खारफुटीचं जंगल याच स्वरूपात. ‘‘इतका सुनसान असायचा तो भाग... त्याच्या जवळपासही जायला घाबरायचो आम्ही. आता जिथे कलानगरचा बसस्टॉप आहे, तिथपर्यंत आम्ही बायकाबायका मिळून जायचो आणि तिथे पाइपलाइन होती, तिथल्या पाण्याने कपडे धुऊन आणायचो. आता ते सगळं बुजवलंय.’’
पूर्वी जे काही विकत घ्यायला लागायचं, त्याचा हिशेब असायचा तो ‘पैशा’त. पुष्पवेणीला आपलं पुण्यातलं लहानपण आठवतं. तिचे वडील खडकीच्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात कामाला होते. (ऐंशीहून अधिक वय असलेली तिची आई अजूनही पुण्याला राहाते.) ‘‘एक पैशाला मूठभर दाणे मिळत होते,’’ ती सांगते. किमती नेमक्या नसतील कदाचित, थोडं इकडेतिकडे होत असेल, पण ‘गेले, ते दिन गेले’ हा भाव पुष्पवेणीच्या बोलण्यात, तिने दिलेल्या यादीत सतत जाणवतो... ‘‘सोनं पन्नास रुपये तोळा होतं. अर्थात, तरीही आम्हाला परवडत नव्हतंच. चांगली सुती साडी दहा रुपयांना मिळायची. माझ्या वडिलांना पगार होता ११ रुपये. पण तरीही ते एक घोडागाडी भरून महिन्याचं सामान घेऊन यायचे.’’
‘‘आम्ही त्या वेळी टुकीने संसार केला. दिवसाला एक रुपया खर्च असायचा... वीस पैशाच्या भाज्या, दहा पैशाचे गहू आणि पाच पैशाचे तांदूळ,’’ वासंती सांगते. ‘‘आणि तरीही सासू म्हणायची, रोजच्या खर्चातून दहा पैसे तरी वाचवत जा.’’
वासंती धारावीत आली तेव्हा लाइफबॉय साबण तीस पैशाला मिळायचा. ‘‘एवढा मोठ्ठा असायचा तो... हातात मावायचाही नाही. मग कधीकधी आम्ही पंधरा पैशाचा अर्धा आणायचो,’’ ती सांगते.
१९८० च्या दशकापर्यंत बांधकाम कामगार म्हणून तिला दिवसाला पंधरा रुपये मजुरी मिळायची. शहरात कुठेही काम सुरू असायचं. ‘‘जिथे काम मिळायचं, तिथे मी धावत जायचे,’’ ती सांगते. वयाच्या सतराव्या वर्षी सेलमहून इथे मावशीकडे राहायला आल्यावर सुरुवातीला वासंती शिवडी, चकाला इथे साबणांच्या कारखान्यांत काम करायची. साबणाचं पॅकिंग करायचं. ‘प्युरिटी’ नावाचा एक साबण होता तेव्हा,’’ तिला आठवतं. त्यानंतर तिला मस्जिद बंदरला मासे पॅक करायच्या युनिटमध्ये काम मिळालं. आणि नंतर कितीतरी वर्षं ती सहा घरांमध्ये घरकामं करत होती.
तमिळ नाडूत वासंतीचे वडील पोलिस हवालदार होते. ती तीन वर्षांची असतानाच आई वारली. वासंती दहावीपर्यंत शिकली. तिची स्मरणशक्ती तल्लख आहे, अगदी बारीकसारीक गोष्टीही तिला आठवतात. आणि त्याचं श्रेय ती पूर्वीच्या ‘असली माला’ला देते! ‘‘आम्ही घराशेजारच्या शेतातला ऊस खायचो. दाणे, टोमॅटो, आवळा, सगळं थेट शेतातून पोटात! लांब दोर टाकून चिंचा पाडायचो आणि तिखटमीठ लावून त्या खायचो.’’ आपल्या तल्लख स्मरणशक्तीचं हेच रहस्य आहे, असं वासंती ठामपणे सांगते... पुष्पवेणीने ज्या ठामपणे केस काळे राहाण्याचं रहस्य खोबरेल आणि लाइफबॉय साबण आहे हे सांगितलं, अगदी तस्संच!
चकालाच्या साबणाच्या कारखान्यात वासंतीला एक तरुण भेटला आणि तोच नंतर तिचा नवरा झाला. ‘‘आधी लव्ह, आणि मग अरेंज्ड मॅरेज आहे आमचं,’’ हलकेच हसत खुललेल्या चेहर्याने ती सांगते. ‘‘तरुणपणी कोण प्रेमात पडत नाही? माझ्या मावशीला कळल्यावर तिने आवश्यक ती सगळी चौकशी केली आणि तीन वर्षांनंतर, १९७९ मध्ये ‘स्थळ आलंय’ असं सांगत ‘अरेंज्ड’ म्हणून माझं लग्न झालं.’’
वासंती नवर्याचं नाव घेत नाही. ती पुष्पवेणीला ते मोठ्याने म्हणायला सांगते. नंतर मात्र स्वतःच त्याचं नाव सांगते ते त्याच्या अचूक स्पेलिंगमधून... ए ए एस ए आय, टी एच ए एम बी आय. (आसाई थंबी). ‘‘खूप चांगला होता तो,’’ ती म्हणते. तिच्या डोळ्यांत अजूनही त्याच्याबद्दलचं प्रेम दिसतं. ‘‘इतना सोना आदमी... आम्ही खूप आनंदात जगलो.’’ थोडी गप्प होते ती आणि मग पुस्ती जोडते, ‘‘माझ्या सासरीही (चेन्नई) मला एखादी गोष्ट मिळाली नाही असं झालंच नाही. माझा नवराच फक्त चांगला होता असं नाही, माझी सासूसुद्धा चांगली होती. मला जे हवं होतं, ते ते सगळं मिळालं.’’
२००९ मध्ये आसाई थंबी गेला. ‘‘प्यायचा तो... श्वासाचाही त्रास होता त्याला,’’ वासंती सांगते. ‘‘पण आम्ही इतकं मस्त आयुष्य जगलो... एकदम ‘सुकून’... जवळजवळ पस्तीस वर्षं होतो आम्ही एकत्र. पण आताही त्याची आठवण आली की मला रडूच येतं.’’ वासंतीचे डोळे भरून आलेले असतात. डोळ्यांतलं पाणी परतवण्याचा ती निकराने प्रयत्न करत असते.
त्यांना एकच मूल झालं. मुलगा होता. पण जन्मल्यावर लगेचच गेला तो. ‘‘मी हॉस्पिटलमधून परत येण्यापूर्वीच...’’ ती सांगते. ‘‘मी फार बोलत नाही याविषयी. पुष्पवेणीची मुलं माझीही मुलं आहेत. आता त्यांच्यापासून दूर, नालासोपार्याला राहाण्याच्या कल्पनेनेच माझं हृदय फडफडायला लागतं.’’
या वर्षी (२०२१) ऑक्टोबरमध्ये वासंतीने तिची धारावीची खोली विकली. पुष्पवेणीने त्याआधी मे महिन्यातच तिची खोली विकली होती. मुंबईत जमीन आणि घर, दोन्हीच्या किमती प्रचंड. त्यामुळे दोघींना आपापल्या खोल्यांचे काही लाख रुपये मिळाले. पण या प्रचंड खर्चिक शहरात हे काही लाख माहीमच्या खाडीतल्या एका थेंबासारखे होते.
धारावी हे मुंबईतलं एक मोठं उत्पादन केंद्र. असंख्य गोष्टी इथे तयार होतात. वासंती आणि पुष्पवेणी, दोघी इथल्याच तयार कपड्यांच्या काही कारखान्यांमधून हातशिलाईची कामं आणतात आणि करतात. एका जीन्स पँटचे पाय आणि लूप यांचे धागे कापले की एका पँटचा दीड रुपया मिळतो. दोघी दोन-तीन तास बसल्या तर दिवसाचे पन्नास-साठ रुपये निघतात. किंवा मग शेरवानी-कुर्त्याला हुक लावतात. कोणतंही काम केलं तरी त्याचा मोबदला प्रत्येक कपड्याच्या दरानुसार मिळतो. दुपारच्या वेळी पांढर्या-निळ्या लादीवर कपडे पसरून त्यांची ही कामं चाललेली असतात.
वासंती आणि पुष्पवेणी, दोघी धारावीतल्या तयार कपड्यांच्या काही कारखान्यांमधून हातशिलाईची कामं आणतात आणि करतात. एका जीन्स पँटचे पाय आणि लूप यांचे धागे कापले की एका पँटचा दीड रुपया मिळतो
पुष्पवेणीने आपली धारावीतली खोली विकली आणि आलेल्या पैशात धारावीतच पागडीवर दोन मुलांसाठी दोन खोल्या घेतल्या. ती तिच्या मोठ्या मुलाबरोबर राहाते. ४७ वर्षांचा तिचा मुलगा रिक्षा ड्रायव्हर आहे. तो, त्याची पत्नी आणि तीन मुलं असं त्यांचं कुटुंब. (पुष्पवेणीचा नवरा १९९९ मध्ये गेला.) मुलाच्या या घरात एक छोटं स्वयंपाकघर आहे, आणि बारका संडास. एका खोलीतून छोट्या का असेना, पण दोन खोल्यांच्या ‘सेल्फ कंटेन्ड’ घरात येणं, ही पुष्पवेणीच्या कुटुंबासाठी वरची पायरी आहे.
बेचाळीस वर्षांचा तिचा धाकटा मुलगा धारावीच्या दुसर्या भागात राहातो. त्याने ‘स्पोर्ट्स’मध्ये काम केलंय, असं पुष्पवेणीने मला सांगितलं. थोडं खोदलं तेव्हा कळलं, ते ‘एक्सपोर्ट’ आहे.... धारावीतच एका एक्सपोर्ट कंपनीत तो काम करत होता. पण लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली. दरम्यान त्याला ब्रेन हॅमरेज झालं, त्याचं ऑपरेशन झालं. त्यातून आता तो सावरतो आहे, बरा होतो आहे, नवी नोकरी शोधतो आहे. पुष्पवेणीची मुलगी ५१ वर्षांची आहे, तिला चार नातवंडं आहेत. ‘‘मी पणजी आहे आता...’’ पुष्पवेणी हसत म्हणते.
‘‘माझी दोन्ही मुलं माझी व्यवस्थित काळजी घेतात,’’ ती सांगते. ‘‘माझ्या सुनाही चांगल्या आहेत. काही टेन्शन नाही, काही तक्रार नाही माझी. छान आरामात जगतेय मी आता.’’
वासंतीने आपली धारावीतली खोली विकून आलेल्या पैशातली काही रक्कम इथपासून साठ किलोमीटरवर असलेल्या नालासोपार्याला घर खरेदी करण्यासाठी वापरली. ते बांधून होतं आहे, तोवर ती तिथे भाड्याने खोली घेऊन राहाते आहे. अधूनमधून ती धारावीला पुष्पवेणीकडे राहायला येते. ‘‘माझी खोली तयार होतेय. काम सुरू असताना मी तिथे जवळपासच असायला हवं,’’ ती म्हणते. ‘‘म्हणजे मग माझ्या खोलीत कायकाय आणि कसंकसं करतायत, कडाप्पाचे शेल्फ वगैरे, ते मी प्रत्यक्ष जाऊन पाहू शकते. मी तिथे नसले तर ते कसंही वाकडंतिकडं करून टाकतील सगळं.’’
तळमजल्यावर असलेली वासंतीची खोली तयार झाली की तिला तिथे बिस्किटं, गोळ्या, चिप्स, साबण अशा वस्तूंचं छोटंसं दुकान सुरू करायचंय. ते तिच्या उत्पन्नाचं साधन असेल. ‘‘मी आता घरकामं करू शकणार नाही,’’ ती म्हणते. ‘‘म्हातारी होत चाललेय मी. पण गरीब असले, तरी मला आयुष्यात ‘सुकून’ मिळाला. मला खायला अन्न आहे, ल्यायला कपडे आहेत, राहायला घर आहे. काही कमी नाही मला, ना कसली चिंता. यापेक्षा अधिक काय हवं असतं माणसाला?’’