पहिल्या प्रथम पेरुवेम्बा म्हणजे कातडं कमवण्याचा कारखाना वाटू शकतं. गावात घराच्या अंगणांमध्ये गायी, बैल आणि बकऱ्यांचं कातडं वाळत घातलेलं असतं, जणू काही इथे चामडं विकलं जात असावं. पण अंगण ओलांडलं की घरांमध्ये, याच चामड्यापासून अतिशय उत्तम नाद असणारी तालवाद्यं बनतात. आणि ते बनवणारे हात आहेत कडची कोल्लन कारागिरांचे.

दक्षिण भारतात सगळीकडेच पेरुवेम्बामध्ये चामड्यापासून बनवलेल्या तालवाद्यांना मागणी असते. केरळमध्ये पलक्कडपासून १४ किलोमीटरवर हे गाव आहे. “आम्ही काही संगीतकार नाही आणि आम्हाला काही ही वाद्यं वाजवता येत नाहीत. पण आम्हाला चांगल्या दर्जाची वाद्यं बनवण्यासाठी आवश्यक असलेलं श्रुतींचं ज्ञान मात्र आहे,” कडची कोल्लन बनवणारे, ४४ वर्षीय के. मणीकंदन सांगतात. “मागणी आल्यावरच आम्ही वाद्य बनवायला घेतो. घेणाऱ्याच्या मागणीनुसार वाद्यात फेरफार केले जातात. आम्ही दुकानांना किंवा व्यावसायिक विक्रेत्यांना वाद्यं विकत नाही.”

पेरुवेम्बाचे कडाची कोल्लन मृदंग, मड्डालम, चेंडा, तबला, ढोल, गंजिरा आणि इतर ढोलवाद्यं बनवतात, जी जास्त करून देवळांमध्ये आणि कर्नाटकी संगीतात वापरली जातात. गेली २०० वर्षं हा समाज तालवाद्यं तयार करतोय. त्या पूर्वी ते धातूचं काम करणारे कारागीर होते आणि शेतीसाठी अवजारं बनवायचे असं मणीकंदन सांगतात. पलक्कड हे कर्नाटकी संगीताच्या केंद्रस्थानी असल्याने पेरुवेम्बाच्या कडाची कोल्लन समाजाला वाद्यं बनवण्याची प्रेरणा मिळाली, आणि त्यातून मिळू शकणाऱ्या अधिकच्या उत्पन्नाचीही. पेरुवेम्बा पलक्कड जिल्ह्याच्या पेरुवेम्बा ग्राम पंचायतीत येतं.

विख्यात मृदंग विशारद पालघाट टी. एस. मणी अय्यर (१९१२-१९८१) यांनी इथे बनवलेला मृदंग वाजवला आणि त्यानंतर, पेरुवेम्बाची ख्याती केरळच्या बाहेर कर्नाटकी संगीतक्षेत्रात पसरू लागली. त्यांनी मद्रासच्या (आता चेन्नई) संगीतकारांना या गावी बोलावलं आणि त्यानंतर यातले अनेक कायमसाठीच इथल्या कडाची कोल्लन कारागिरांचे ग्राहक झाले. अय्यर यांचे स्वतःचे मृदंग मणीकंदन यांचे वडील, पेरुवेम्बाचे कृष्णन मृदलपरम्बू यांनी बनवले होते आणि त्यांच्यासोबत अय्यर यांची घट्ट मैत्री होती.

The Kadachi Kollan wash and dry the animal skins in their courtyards in Peruvemba village
PHOTO • P. V. Sujith

पेरुवेम्बामध्ये कडची कोल्लन आपल्या घराच्या अंगणांमध्ये जनावरांचं कातडं धुऊन सुकायला ठेवतात

सध्या पेरुवेम्बा गावात राहणाऱ्या ३२० कुटुंबांपैकी ८० कडची कोल्लन समुदायाची आहेत (ग्राम पंचायतीतील नोंदी). २००७ साली, या गावातल्या कारागिरांनी चामड्यापासून वाद्यं तयार करणाऱ्यांचा एक राज्य स्तरीय संघ स्थापन केला – केरला स्टेट थुकल वाद्योपकरण निर्माण संघम. तेव्हापासून, वाद्यांच्या किंमती आणि दुरुस्ती आणि वाद्य पुनरुज्जीवित करण्यासाठीचे दर संघाच्या सदस्यांनी एकत्रित रित्या ठरवायला सुरुवात झाली. ते सदस्यांमध्ये कामाची विभागणी समान व्हावी हे सुनिश्चित करतात. मणीकंदन या संघाचे सचिव असून, त्यात एकूण ६५ सदस्य आणि गावातले ११४ प्रशिक्षणार्थी आहेत.

गेली कित्येक वर्षं वादक आणि संस्थांसाठी या विख्यात वाद्यांचं डिझाइन आणि निर्मिती करणाऱ्या पेरुवेम्बाच्या कारागिरांना नियमित उत्पन्न मिळत होतं. पण कोविड-१९ ने हे चित्र बदलून टाकलं.

जानेवारी २०२० मध्ये केरळमध्ये भारतातल्या कोविडच्या पहिल्या तीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर राज्य शासनाने तिथे कडेकोट टाळेबंदी जाहीर केली. फेब्रुवारीनंतर एकही ग्राहक पेरुवेम्बामध्ये येऊ शकला नाही. अर्थात जेव्हा विक्री तेजीत असते त्याच काळात, उन्हाळ्यात एकही ऑर्डर नोंदवण्यात आली नाही.

“केरळमध्ये फेब्रुवारी ते जून हा उत्सवांचा काळ असतो. पण त्याच काळात कुणीही एकही वाद्य खरेदी केलं नाही. वाद्याच्या दुरुस्तीसाठीही मागणी आली नाही,” मणीकंदन सांगतात. उन्हाळ्यात मंदिरं आणि चर्चेसमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या उत्सवसोहळ्यांमध्ये वादक मोठ्या संख्येने एकत्र येतात – कधी कधी तर ५०० जणही. ते पंचारि मेलम आणि पंचवाद्यम सारखे पारंपरित वाद्यमेळ सादर करतात.

टाळेबंदीच्या काळात या वाद्यांची विक्री झपाट्याने खालावली. २०२० साली फक्त २३ वाद्यं विकली गेली, आणि ती सगळी टाळेबंदीच्या आधी. “तेही फक्त मृदंग आणि तबला, यंदा एकही चेंदा विकला गेला नाही,” मणीकंदन सांगतात. या तुलनेत, २०१९ साली ३८० वाद्यं विकली गेली – त्यातली ११२ चेंडा होती – पंचारि मेलन वृंदासाठी हाच महत्त्वाचा ढोल असतो.

Left: K. Manikandan fastens the leather straps of a mridangam. Right: Ramesh and Rajeevan Lakshmanan finish a maddalam
PHOTO • P. V. Sujith
Left: K. Manikandan fastens the leather straps of a mridangam. Right: Ramesh and Rajeevan Lakshmanan finish a maddalam
PHOTO • P. V. Sujith

डावीकडेः के. मणीकंदन मृदंगाच्या वाद्या ताणून घट्ट करतायत. उजवीकडेः रमेश आणि राजीवन लक्ष्मणम मड्डालमवर काम पूर्ण करतायत

कथकली नृत्यनाट्यात चेंडा आणि शुद्ध मड्डालम ही वाद्यं असतात आणि ही दोन्ही पेरुवेम्बाची सर्वात लोकप्रिय वाद्यं आहेत. नवीन मड्डालमसाठी तब्बल २५,००० रुपये मोजावे लागू शकतात आणि चेंडा १२,००० ते १५,००० रुपयांपर्यंत मिळतो असं ३६ वर्षीय राजीवन लक्ष्मणन सांगतात, जे मड्डालम तयार करण्यात निपुण आहेत. जुन्या मड्डालमची पुडी बदलण्यासाठी रु. १२,००० पर्यंत खर्च येऊ शकतो आणि नुसत्या वाद्या बदलून ताणायच्या असतील तर ८०० रुपये. प्रत्येक वाद्याच्या खरेदीवर ८ टक्के इतकी नफ्याची मर्यादा घातली आहे.

“कोविड-१९ टाळेबंदी लागण्याआधी, गावातल्या प्रत्येक कुटुंबाची महिन्याला १७,००० ते ४०,००० रुपये इतकी कमाई होत होती,” ६४ वर्षांचे मणी पेरुवेम्बा सांगतात.

“आमच्यासाठी संकट जास्तच गहिरं होतं कारण आम्हाला उत्पन्नाचं दुसरं कोणतंच साधन नाही,” राजीवन सांगतात. पण शेती असल्याने पेरुवेम्बाच्या कडची कोल्लन कुटुंबांना टाळेबंदीच्या काळात जरा तरी आधार होता. बहुतेकांची गावात अर्धा ते एक एकर जमीन आहे ज्यावर मुख्यतः केळी आणि नारळ आहेत. स्थानिक बाजारात केळी प्रति किलो १४ रुपये आणि नारळ ५४ रुपये अशा भावात विकले गेले. काहींनी घरच्यासाठी भात लावला.

टाळेबंदी लागण्याआधी देखील या वाद्यकारांना जनावरांचं कातडं मिळवणं मुश्किलच झालं होतं. केंद्राच्या Prevention of Cruelty to Animals (Regulation of Livestock Markets) Rules, 2017 या कायद्यामुळे गुरांचं कातडं कमी मिळू लागलं होतं. या नियमांमुळे राज्यांतर्गत गुरांच्या वाहतुकीला फटका बसला होता आणि तमिळ नाडूच्या कोइम्बतूरच्या कत्तलखान्यातून होणारा चामड्याचा पुरवठा पूर्णच ठप्प झाला.

आता पेरुवेम्बाच्या या वाद्यकारांची भिस्त इथून तीन किलोमीटरवर असलेल्या पुदुनगरम इथल्या मटणाच्या बाजारावर आहे. “कातडी विकणारेही संकटात सापडले आहेत. हे असंच चालू राहिलं तर आम्हाला ही वाद्यं तयार करणं थांबवावं लागेल,” राजीवनचा भाऊ, २५ वर्षीय रमेश लक्ष्मणन म्हणतो.

Left: The men of a family work together at home. Right: Applying the black paste on a drumhead requires precision
PHOTO • P. V. Sujith
Left: The men of a family work together at home. Right: Applying the black paste on a drumhead requires precision
PHOTO • P. V. Sujith

डावीकडेः कुटुंबातले पुरुष एकत्र घरी काम करतात. उजवीकडेः वाद्यावर काळी शाई लावण्याचं काम फार काटेकोरपणे करावं लागतं

“पुरुवेम्बामध्ये गायीचं कातडं वापरलं जात नाही असं एकही वाद्य नाही,” सुमोद कन्नन हे ३८ वर्षीय कारागीर सांगतात. एका गायीच्या कातड्यासाठी ४,००० रुपये मोजावे लागतात. “सगळ्या कातड्यांमधून गायीचंच कातडं प्रत्येक वाद्यासाठी लागतं. मृदंगासाठी कमी मात्र मड्डालमसाठी जास्त.” गायीचं कातडं आणि त्यासोबत म्हैस आणि बकऱ्याचं कातडं वापरलं जातं. वाद्याप्रमाणे याचं प्रमाण बदलत असतं. “चेंडा आणि मड्डालमसाठी मुख्यतः गायीचंच कातडं वापरलं जातं आणि मृदंगासाठी बकऱ्याचं. एडक्का बनवण्यासाठी गायीच्या आतड्यांचा वापर केला जातो,” ४७ वर्षीय के. व्ही. विजयन सांगतात.

कडाची कोल्लन समुदायात कुटुंबातले सगळेच सदस्य वाद्यनिर्मितीच्या प्रक्रियेत समाविष्ट असतात. बायका कातडी धुतात, घासतात आणि वाळल्यानंतर त्या मऊ करण्याचं काम करतात. पुरुष कातडी कमावतात, वाद्याच्या खोडासाठी लाकडाला आकार देतात आणि वाद्य तयार करतात. ते त्यांची उपकरणं, हत्यारं स्वतःच तयार करतात, मग त्यात छिन्नी, सुऱ्या, पाती, रीमर्स, दाभणी आणि चिमटे अशा अनेक हत्यारांचा समावेश असतो. मुलांना लहानपणापासूनच या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जातं. पुडीवर शाई, ज्याला माशियिदल म्हणतात, ती कशी लावायची तेही शिकवलं जातं. ही शाई या भागात मिळणाऱ्या पुरणक्कल्लू या काळ्या दगडाची पूड शिजवलेल्या भातात कालवून तयार केली जाते. “शाई लावायचं काम फार काटेकोरपणे करावं लागतं,” सुनोद कृष्णन सांगतात.

पेरुवेम्बामध्ये तयार होणाऱ्या सगळ्या वाद्यांचं खोड फणसाच्या लाकडापासून तयार केलं जातं, कारण पलक्कड जिल्ह्यात ही झाडं मुबलक आढळतात. वाद्यकार गावातल्या शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून २,७०० रुपये प्रति घन मीटर भावाने हे लाकूड विकत घेतात.

ईशान्येकडून येणारा (ऑक्टोबर-डिसेंबर, परतीचा) पाऊस लांबल्यामुळे फणसाच्या लाकडाचा दर्जा बिघडायला लागलाय, राजीवन सांगतात. “वातावरणातल्या बदलांमुळे हे होतंय. जनावराचं कातडं वाळवण्याची पारंपरिक पद्धत देखील धोक्यात आलीये,” ते म्हणतात. डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या मोसमात केरळमध्ये गेल्या १०० वर्षांतला सर्वात जास्त पाऊस झाला, त्रिसूर इथल्या केरळ कृषी विद्यापीठाच्या वातावरण बदल शिक्षण आणि संधोशन अकादमीमध्ये वैज्ञानिक अधिकारी असणारे डॉ. गोपालकुमार चोलयिल सांगतात.

“आम्ही पर्यायी काही वापरण्याचा विचारही केलेला नाही. फणसाचं लाकूड आणि जनावराचं कातडं आमच्यासाठी नितांत गरजेचं आहे,” मणीकंदन म्हणतात. “जर सरकारने देशभर गोहत्येवर बंदी आणली, तर आम्हाला परत धातूकाम सुरू करावं लागेल.” राज्याच्या इतर भागात – पलक्कड जिल्ह्यातील लक्किडी पेरूर तसंच थ्रिसूरमधले वेल्लारक्कड आणि वेलप्पाया - स्थायिक झालेला कडाची कोल्लन समाज आजही शेतीसाठीची अवजारंच बनवतोय, ते सांगतात.

Kadachi Kollan craftsmen start learning the craft in their childhood
PHOTO • P. V. Sujith

कडाची कोल्लन कारागीर लहानपणापासूनच वाद्य तयार करायला शिकतात

२०१९ साली, केरळ सरकारने कडाची कोल्लन जात अनुसूचित जमातींच्या यादीतून काढून इतर मागासवर्गीय सूचीमध्ये समाविष्ट केली. तेव्हापासून त्यांना शासनाकडून अनुदान आणि इतर लाभ मिळणं थांबलं आहे. “शासनाने केलेल्या अभ्यासांमधून असं आढळून आलं की कडाची कोल्लन ओबीसी प्रवर्गात मोडतात. कुणी तरी काही तरी घोटाळा करून आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला असणार. पण आता शासनाकडून आर्थिक मदत किंवा सहाय्य काहीच मिळत नाही,” मणीकंदन सांगतात.

स्वरालय या पलक्कडच्या विख्यात सांस्कृतिक संस्थेचे सचिव असणारे टी. आर. अजयन सांगतात की पेरुवेम्बाचे कारागीर आणि त्यांची परंपरा कर्नाटक संगीताच्या क्षेत्रात पलक्कडचं स्थान उंचावण्यात फार मोलाची कामगिरी बजावतात. “राज्यातली आणि बाहेरची मंदिरं तसंच संगीतोत्सव या गावावर भिस्त ठेवून आहेत. इतरत्र कुठेच इतक्या विविध प्रकारची वाद्यं तयार केली जात नाहीत.”

पण पेरुवेम्बाच्या तरुणांनी इतर कामधंदा शोधायला सुरुवात केली आहे. “या कामाला [वाद्यनिर्मिती] खूप कष्ट आणि चिकाटीची गरज असते. चिक्कार कष्ट हेच भांडवल. त्यामुळे नवी पिढी दुसऱ्या पर्यायांचा विचार करतीये,” २९ वर्षीय एम. रवीचंद्रन म्हणतो. त्याचा २१ वर्षांचा भाऊ पलक्कडच्या कॉलेजमधून इतिहास विषय घेऊन एमए झाला आहे. “पूर्वीच्या रिवाजाप्रमाणे आम्ही बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर पूर्ण वेळ याच कामात पडलो. पण तरूण पिढीला त्याचं काहीही घेणं देणं नाही. त्यामुळे या गावाचं हे एकमेवाद्वितीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे.”

टाळेबंदीच्या काळात पेरुवेम्बाच्या कडाची कोल्लन कुटुंबांवर जे संकट कोसळलं ते फारच गंभीर होतं, मणीकंदन सांगतात. पण चांगले दिवस परत येतील असा विश्वास त्यांना वाटतो. डिसेंबर महिन्यात त्यांच्या संघाला १२ वाद्यांच्या दुरुस्तीचं काम मिळालं आणि जानेवारीपासून नवीन वाद्यांसाठी हळूहळू चौकशी सुरू झाली आहे. “असं वाटतंय की फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत आमचा गाडा थोडाफार का असेना, पुन्हा रुळावर आलेला असेल असं दिसतंय,” ते सांगतात. “मला नाही वाटत २०२१ हे वर्ष २०२० ची पुनरावृत्ती ठरेल.”

अनुवादः मेधा काळे

K.A. Shaji
shajiwayanad@gmail.com

K.A. Shaji is a journalist based in Kerala. He writes on human rights, environment, caste, marginalised communities and livelihoods.

Other stories by K.A. Shaji