त्याच्या वर्कशॉपवर कसलीही पाटी नाही. “यह तो एक गुमनाम दुकान है,” तो म्हणतो. त्या ८ फूट बाय ८ फुटाच्या शेडच्या आत बघावं तर सगळ्या ऍसबेसटॉसच्या भिंती काजळी आणि जळमटांनी भरून गेल्या आहेत. एका कोपऱ्यात चिखलमातीची आणि लोखंडाची मातीची भट्टी दिसते. खोलीच्या मध्यावरचा जळलेल्या काळ्या मातीचा ढिगारा निळ्या ताडपत्रीनं झाकला आहे.
दररोज सकाळी सात वाजले की, हैद्राबादच्या पश्चिमेकडच्या दूध बावलीच्या अरुंद गल्ल्यांमधून सायकल मारत अझीम वर्कशॉपमधे येतो. त्याच्या वर्कशॉपची मागची भिंत हकीम मीर वजीर अलीच्या कब्रस्तानच्या कुंपणामधे मिसळून गेली आहे.
प्लास्टिकचे धुळकट डबे,
गंजलेले धातूचे डबे,
तुटक्या बादल्या आणि जमिनीवर सगळीकडे पसरलेली
हत्यारं आणि पंच (ठसे) या सगळ्याच्या मधे तो रोजचं काम सुरु करतो. ही जागा काम
करण्यासाठीही पुरेशी नाही. तो इथे वाळूच्या साच्यांमधे धातूचे बिल्ले तयार करतो.
अठठावीस वर्षांच्या अझीमनं केलेली ही टोकन
हैद्राबादमधली मोजकी चहाची दुकानं,उपाहारगृहं आणि भोजनालयं अजूनही वापरतात. पूर्वी गिरण्या, लष्कराशी
संबंधित दुकानं,
रेल्वे, बँका,क्लब, सहकारी भांडार आणि इतर अनेक ठिकाणी यासारखी कँटीन
टोकन वापरली जायची. पण जसजसा काळ गेला आणि लोक प्लास्टिकचं टोकन
किंवा कागदी पावती जास्त वापरायला लागले, तशी धातूच्या
टोकनची मागणी कमी कमी होत गेली. हैद्राबादमधल्या काही भोजनालयात यांचा उपयोग दिवसाच्या मिळकतीचा हिशोब करायला होतो. गिऱ्हाईकांनी एखादा पदार्थ मागितला की त्यांना त्याचं टोकन
देतात.
घरी आणि इतर दुकानदारांमध्ये अझीमला सगळे अझू म्हणतात. तर अझूच्या अंदाजाप्रमाणे, तो टोकनचं ओतकाम करणाऱ्या या शहरातल्या शेवटच्या कारागिरांपैकी एक आहे. अख्ख्या हैद्राबादमधे असे दहापेक्षा कमी कारागीर असावेत.


दररोज सकाळी अझीम दुकानाशेजारी त्याची सायकल ठेवतो आणि
कामाचा दिवस सुरु करतो
.
वेगवेगळी अक्षरं असलेली किंवा
पदार्थांच्या आकारातले बिल्ले करायला सुरुवात करतो
बॉक्सच्या असंख्य रांगांमधून तो काही बॉक्स काढून जमिनीवर ठेवतो. त्यांच्यावर इंग्लिशमधे कोरलेली चिन्ह आहेत - चहा, भात, इडली, पाया, फिश, सीबीएस (चिकन बिर्याणी सिंगल), सीबीजे (चिकन बिर्याणी जंबो), एमबीएस (मटण बिर्याणी सिंगल), एमबीजे (मटण बिर्याणी जंबो) आणि असेच इतर प्रकार. बरीच टोकन त्या त्या पदार्थांच्या आकाराची बनवलेली आहेत - चहाची किटली, मासा, कोंबडी, शेळी, डोसा आणि इतरही बरीच.
“ही टोकन
बनवण्यात आम्ही स्पेशालिस्ट आहोत आणि अख्ख्या हैद्राबादमधून इथे
दुकानदार येतात. पण आता धंदा फारच कमी झाला आहे.” मोहम्मद रहीम, अझीमचे काका
म्हणतात. पारंपरिक ओतकाम
करणारे रहीम आता साठीला टेकले आहेत.
अझीम सांगतो की त्याचे आजोबासुद्धा ओतकाम करत असत. जोवर शेवटच्या
निजामाचं राज्य होतं (१९४८ पर्यंत)
तोपर्यंत ते अशी टोकन आणि राजवाड्यासाठी अलंकारिक
वस्तू करत असत. ते घरांसाठी
धातूपासून शोभेच्या वस्तूसुद्धा करायचे. रहीम सांगतात की सायकलच्या मालकांचं नाव कोरलेली
धातूची पट्टी ते तयार करायचे. ही सायकलवर ठोकली जायची.
अझीम त्याच्या वडिलांनी अनेक वर्षांपूर्वी केलेली
सायकलला बसवायची नावाची प्लेट दाखवतो.
मोहम्मद मुर्तुजा,
अझीमचे वडील एक निष्णात कारागीर होते. परिसरातल्या सगळ्यांकडून त्यांच्या कामाला भलतीच मागणी असायची. पण अझीमचा जन्म होण्याच्याही आधी एकदा भट्टीत
स्फोट झाला, आणि त्यांचा
उजवा हात जायबंदी झाला आणि नंतर कापून टाकावा लागला.
तरीही मुर्तुजा आणि रहीम
यांनी घराण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. अझीमनं जेव्हा पहिल्यांदा ओतकाम सुरु केलं, तेव्हा तो काय वयाचा होता हे त्याला आठवतही नाही. अझीम चौथीपर्यंत शाळेत शिकला. पण पुढे एकदा शाळेत त्याचं मित्राशी भांडण झाल्याचं निमित्त
करून वडिलांनी शाळा सोडायला लावली . तो सांगतो “टोकन तयार करणं हे एकच काम मला येतं.”



घरात टोकनचं काम करण्याची परंपरा आहे
.
भट्टी घरातच होती तेव्हा अझीमची बायको नझिमा
(
मधे उभी असलेली
)
त्याला हातभार लावायची
.
अझीमचे वडील
(
उजवीकडचे
)
सराईत ओतकाम करणारे होते
त्यांनी गेल्या काही वर्षांमधे वर्कशॉपच्या जागा अनेक वेळा बदलल्या आहेत - कधी दुकान जमीनदोस्त केल्यामुळे, कधी शेजाऱ्यांनी भट्टीच्या वासाची तक्रार केल्यामुळे तर कधी जागा कमी पडल्यामुळे. त्यांनी एकदा चारमिनारच्या जवळच्या त्यांच्या शेडमधे काम केलं होतं. तिथे मशिदीच्या बाजूला त्यांचं दुकान आहे. शिवाय काही काळ त्यांनी त्यांच्या घरातही काम केलंय. त्यांच्या तीन खोल्यांपैकी एका खोलीत भट्टी पेटवून. तेव्हा अझीमची बायको, नसीमा बेगम बरंच काम हाताळायची - जवळच्या माळावरून माती गोळा करणे, ती चाळणं आणि साच्यात भरणं, इत्यादी.
मार्च २०२० मधे लॉकडाऊन लागला. त्या काळात
मुर्तुझाला मिळणाऱ्या अपंगांसाठीच्या पेन्शनवरच त्यांची गुजराण झाली. महिन्याला दोन
हजार रुपये. अझीमच्या तीन
बहिणींची लग्न झाली आहेत आणि तिघी गृहिणी आहेत. त्याचा धाकटा भाऊ दुचाकी गाड्यांच्या दुकानात वेल्डरचं काम करतो.
मुर्तुझा २०२० सालच्या एप्रिलमधे वारले आणि घरात येणारं पेन्शन बंद झालं. (अझिमची आई खाजा यांचं २००७ मधेच निधन झालं.) मग त्या वर्षी नोव्हेंबरमधे, अझीम सध्या ज्या दुकानात काम करतोय ते कब्रस्तानच्या जवळचं दुकान त्याने भाड्यानं दिलं. जास्त गिऱ्हाईक आणि जास्त मिळकतीच्या आशेनं. पण ही शेड फुटपाथवर आहे आणि महापालिका ती कधीही पाडू शकते.
मधे एकदा आमची भेट झाली तेव्हा तो सांगत होता की आदल्या दिवशीच त्याला बेगमपेटच्या एका भोजनालयातून टोकनची ऑर्डर मिळाली आहे म्हणून.
पहिलं काम म्हणजे
भोजनालयाच्या (इटरी) विशेष गरजेनुसार टोकनचा योग्य आकार निवडायचा - जसं चहाचा कप किंवा मासा. बहुतेकदा त्याच्याकडे अशा आकारांचे व्हाईट मेटलचे मास्टर
टोकन तयार असतात. खूप पूर्वी तयार केलेले. यानंतर त्यांची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्याची अनेक
थरांची प्रक्रिया सुरु होते.



( डावीकडे ) साच्यात मास्टर टोकन ठेवताना ( मधे ) पायाने दाबून माती घट्ट बसवताना ( उजवीकडे ) टोकनच्या आकारातले बारकावे करताना , वितळलेल्या धातूला वाट करून द्यावी लागते
अझीम एक पेटी (साचा) लाकडी फळीवर ठेवतो. त्यावर संजिरा पावडर (कास्टिंग पावडर) भुरभुरवतो. “पावडरमुळे टोकन (मातीला) चिकटणार नाही.” तो सांगतो. नंतर त्या फळीवर योग्य ती टोकन, एक एक करून नीट ठेवली जातात.
यानंतर तो बाइंडिंग घातलेल्या बारीक मातीनं
पेटीचा चवथा भाग भरतो. बाइंडिंग म्हणजे पातळ गूळ असतो. अझीम म्हणतो की
कुठलीही माती किंवा वाळू चालते. ती चाळून घेतली म्हणजे त्यात खडे रहात नाहीत. हे चिकट मिश्रण
अस्तर मिट्टीवर (तळातली माती)
ओततात. खोलीत निळ्या टारपोलिनच्या खाली, आधीच्या
ओतकामातली उरलेली जळालेली माती ठेवली आहे.
त्यातली थोडी तो त्यावर टाकतो.
पेटी जवळजवळ पूर्ण भरल्यावर अझीम पायाने माती
घट्ट दाबतो. नंतर ती फ्रेम
तो उलटी करतो. आता त्या
मिश्रणावर टोकनचा चांगला ठसा उमटतो. साच्याला एक झाकण आहे.
त्याच्यावर तो थोडी संजिरा पावडर भुरभरतो, पुन्हा अस्तर
मिट्टी आणि जळक्या काळ्या मातीचे थर. हे मिश्रण तो पायांनी दाबतो.
आतापर्यन्त त्याचे पाय माती आणि काजळीने भरून गेले आहेत.
यानंतर अझीम पेटीतली जास्तीची माती काढून टाकतो आणि पेटी उघडतो. आतले मास्टर शेप
(टोकनचे आकार) तो हळूच काढून
घेतो. मातीच्या
मिश्रणावर त्या आकारांचा पोकळ ठसा उमटलेला दिसतो.
अझीम एका पातळ काडीनं
वितळलेलं ऍल्युमिनियम वाहण्यासाठी वाटा तयार करतो. मातीवर आधीच्या ऑर्डरचे, आधीच्या भोजनालयाचे टोकन (ठसे) उमटलेले असतात. तो काडी घेऊन ते मिटवून टाकतो. आता तो पेटी बंद करून त्याला घट्ट कुलूप लावतो, त्याच्यावर लाकडी फळी ठेवतो. आता ही पेटी हीट कास्टिंग करायला, भट्टीत भाजायला तयार झाली आहे.



(
डावीकडे
)
वितळलेलं अल्युमिनियम ओतायच्या आधी अझीम फटींवर संजिरा
पावडर टाकताना
(
मधे
)
हाताने चालवायचा भाता वापरताना
(
उजवीकडे
)
भट्टीमधे वितळण्यासाठी ठेवलेले धातूचे तुकडे
हाताने चालवण्याचा ब्लोअर वापरून भट्टीतल्या कोळशाला हवा दिली जाते. कोळसा रसरसून पेटला की तो जुनी अल्युमिनियमची नाणी किंवा आधी वापरलेले तुकडे धातू ठेवण्याच्या भांड्यात टाकतो. हे सगळं वितळून पातळ झाल्यावर एका पकडीनं धरून पेटीत ओततो. ते करताना अझीमकडे स्वतःच्या सुरक्षेसाठी काहीही नाही. तो म्हणतो, मला याच प्रकारे काम करायचा सराव झाला आहे आणि सुरक्षा साधनं महाग असतात.
थोड्या वेळानं हे सगळं निवून घट्ट होतं. काही मिनिटातच
साचा उघडला जातो आणि आतलं नवं टोकन दिसतं. ते बाहेर काढून अझीम त्यांच्या कडा फाईलनं घासून
धारदार करतो. धातूची ती छोटी
वस्तू हातावर घेत तो म्हणतो, “ये रहा हमारा कॉईन.”
पुढची पायरी म्हणजे भोजनालयाचं आणि पदार्थाचं नाव
टोकनवर इंग्लिशमधे कोरून काढणं. यासाठी अक्षरं आणि आकड्यांचे ठसे (पंच) तयार केलेले
आहेत. भट्टीतून बाहेर
आलेल्या गरमागरम टोकनवर पंच ठोकला की अक्षरांचा शिक्का उमटतो.
एक बॅच तयार झाली की तो ही टोकन घेतो,
आणि सुधारलेले आकार वापरून नवा साचा तयार करतो.
प्रत्येक बॅचमधे किती टोकन
असतील हे पेटीच्या आकारावर अवलंबून असतं. "माझ्याकडे १२ वेगवेगळ्या आकाराच्या पेट्या आहेत," साच्याच्या एका ढिगाऱ्याकडे बोट दाखवत तो सांगतो. १५ बाय १९ इंचाच्या एका मध्यम पेटीत, तो एकावेळी साधारण ४० टोकन बनवू शकतो. टोकनची मागणी वाढली तर तो एका दिवसात १० तास काम करून ६०० पर्यंत टोकन
बनवू शकतो.



डावीकडे आणि मध्यभागीः नव्याने पाडलेली नाणी. उजवीकडेः तयार नाणी साच्यातून काढली की फाइलचा वापर करून हवा तसा आकार दिला जातो
कधीकधी अशा एखाद्या आकाराचं टोकन हवं असतं की ज्याचं मास्टर डिझाईन अझीमकडे नसतं. अशा वेळी तो गिऱ्हाईकाला टोकनची प्लॅस्टिकची ३-डी प्रतिकृती आणायला सांगतो. पण हे महाग पडतं, त्यामुळे बरेचजण जुनेच आकार पुन्हा करून घेतात. (अझीमचे वडील मुर्तुजा काम करायचे तेव्हा ते हातानं नवीन आकार आणि डिझाईन कोरून काढायचे.)
“धातूचे बिल्ले प्लॅस्टिकच्या बिल्ल्यांपेक्षा जास्त काळ टिकतात आणि स्वस्त पडतात," मुहम्मद मोहीन सांगतो.
अझीमच्या वर्कशॉपपासून १३ किलोमीटरवर असलेल्या
बेगमपेठमधल्या एका हॉटेलात तो वेटरचं काम करतो.
आज एक ऑर्डर देण्यासाठी तो आला आहे. "टोकन ही
आकड्यांऐवजी हातानं वस्तू मोजण्याची पद्धत आहे.
आमच्या गिऱ्हाइकांनाही ती बरी वाटते.” तो पुढे सांगतो, “आम्ही एका
पदार्थासाठी १०० टोकन ठेवतो. ती संपल्यावर त्याच्या शंभर प्लेट विकल्या गेल्याचं आम्हाला कळतं. आम्ही दिवसाचा
गल्ला याच पद्धतीनं मोजतो. आम्ही सगळे अशिक्षित असल्यानं या पद्धतीतच अडकलो
आहोत.”
एका टोकनसाठी अझीम तीन रुपये घेतो. पण एकूण १०००
पेक्षा कमी टोकन बनवायची असतील तर तो ४ रुपये भाव सांगतो.
“मला रोज काही ऑर्डर मिळत नाही. आठवड्यातून दोन-तीन वेळा काही
गिऱ्हाइकं येतात,” तो म्हणतो. "त्यांना मी आणि माझं दुकान माहिती आहे. किंवा
त्यांच्याकडे माझा मोबाईल नंबर असला तर ते फोनवर टोकनची ऑर्डर देतात. कोणाला ३०० हवी
असतात, तर कोणाला १०००. माझं उत्पन्न
निश्चित असं काही नाहीये. माझी आठवड्याची कमाई कधी फक्त १००० रुपये होते तर
कधी २५०० पर्यंत जाते."
आणि कधीकधी असं होतं की लोक
ऑर्डर देतात, पण झालेलं टोकन घ्यायला येतच
नाहीत. अझीम सर्वात वरच्या कप्प्यातली एक पेटी दाखवतो. “मी ही १००० टोकन केली पण गिऱ्हाईक कधीच आलं नाही.” तो सांगतो. काही काळानं तो ही टोकन वितळवून त्याची नवीन टोकन करतो.



(
डावीकडे
)
टोकनवर अक्षरं कोरताना
. (
मध्यभागी
)
ही १००० टोकन कधी घेतली गेली नाहीत
.
(
उजवीकडे
)
पेटीत टोकन कशी रचतात ते
दाखवताना अझीम
अझीम सांगतो की त्याच्या उत्पन्नाचा बराच भाग दुकानांची भाडी भरण्यात जातो. मशिदीजवळच्या जुन्या दुकानाचं भाडं ८०० रुपये आहे. (या दुकानामुळे त्याला गिऱ्हाईक मिळतं आणि ते बाजारात मोक्याच्या जागी असूनही त्याचं भाडं कमी आहे. म्हणूनच त्यानं ते ठेवलं आहे.) कब्रस्तानजवळच्या सिमेंट शेडच्या दुकानाचं भाडं २,००० रुपये आहे. “शिवाय दर महिना मुलांच्या शाळेची फी, वाणसामान आणि घरातल्या इतर गरजांसाठी मला ६००० ते ७००० रुपये लागतात,” तो सांगतो. त्याचा धाकटा भाऊही घरी हातभार लावतो.
दुपार झाली की बहुतेक वेळा अझीम मोइनपुरातल्या त्याच्या घरी येतो. हे दुकानापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. घरात अगदी मोजकंच फर्निचर आहे. कोबा केलेल्या जमिनीवर प्लास्टिकच्या चटया अंथरल्या आहेत. "माझ्या मुलांना माझं काम करायला लागू नये असं मला वाटतं. भट्टीजवळ उकळता धातू हाताळणं धोक्याचं आहे,” तो सांगतो.
“माझ्या मुलांना सुरक्षित भवितव्य मिळावं असं मला वाटतं. मला त्यांना शक्य तितकं उत्तम शिक्षण द्यायचं आहे,” त्याची बायको नझिमा पुढे म्हणते. त्यांची तीन वर्षांची मुलगी समीरा तिला बिलगली आहे आणि सहा
वर्षांचा मुलगा ताहीर कोपऱ्यात खेळतोय. त्याच्या हातात बरीच टोकन दिसतात आणि त्याच्या आजोबांनी
त्याच्यासाठी बनवलेला छोटासा लोखंडी हातोडा!
अनुवादः सोनिया वीरकर