२०२१ साली जुलै महिन्यात पुराचं पाणी घरात शिरू लागलं आणि शुभांगीताई कांबळेंना घर सोडावं लागलं. पण बाहेर पडता पडता न चुकता तिने दोन वह्या मात्र सोबत घेतल्या.
आणि याच दोन वह्यांमुळे पुढच्या काही महिन्यांत ती अनेकांचा जीव वाचवू शकली.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिच्या अर्जुनवाड गावात आणखी एक आपत्ती आलेली होती. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. आणि शुभांगीताईच्या वह्यांमध्ये गावातल्या कोविड रुग्णांची संपर्कासहित सगळी माहिती, घरच्या लोकांचे फोन क्रमांक, आधीची आजारपणं, बाकी माहिती असे सगळे तपशील नीट लिहिलेले होते.
“कोविडचे रिपोर्ट [गावात केलेल्या आरटी-पीसीआर तपासण्यांचे रिपोर्ट] सगळ्यात आधी माझ्याकडे यायचे,” ३३ वर्षीय शुभांगीताई सांगते. २००५ साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत दहा लाखांहून अधिक आशा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली होती. शुभांगीताई यातलीच एक. आपल्या वहीतल्या तपशिलांची मदत घेत शुभांगीताईने गावातल्या एका कोविड रुग्णाचा तपास घेतला. त्याला शिरोळ तालुक्यातल्या एका निवारा केंद्रात हलवण्यात आलं होतं. तिथे ५,००० लोक कोविड रुग्णाच्या आणि विषाणूच्या संपर्कात आले होते.
“पुरामुळे अनेकांचे फोन बंद होते किंवा नेटवर्क मिळत नव्हतं,” शुभांगीताई सांगते. ती स्वतः १५ किलोमीटरवरच्या तेरवाडला आपल्या माहेरी गेली होती. तिने लागलीच आपल्या वहीतल्या हाताने लिहिलेल्या नोंदी तपासल्या. त्यात तिला काही इतरांचे संपर्क क्रमांक मिळाले. “काही तरी करून मला त्या रुग्णाशी संपर्क साधता आला.”

२०१९ साली आलेल्या पुरात अर्जुनवाड गावातलं उद्ध्वस्त झालेलं एक घर


डावीकडेः २०२१ साली आलेल्या पुरात भेंडवड्याच्या उपकेंद्रामध्ये झालेलं नुकसान आशा कार्यकर्ती पाहत आहे. उजवीकडेः अतिवृष्टीमुळे पाण्यात गेलेली औषधं आणि इतर सामान
तिने जवळच्याच अगर गावात सुरू झालेल्या कोविड सेंटरमध्ये या रुग्णासाठी एका खाटेची सोय केली आणि लागलीच त्या रुग्णाला तिथे हलवण्यात आलं. “मी जर माझी वही घेतली नसती ना तर हजारो लोकांना संसर्ग झाला असता,” ती सांगते.
गावावर आलेलं असं एखादं संकट पलटवून लावण्याची किंवा स्वतःआधी आपल्या कामाला प्राधान्य देण्याची शुभांगीताईची ही काही पहिली वेळ नव्हती. २०१९ साली आलेल्या पुरानंतर (ऑगस्ट) आपलं पडझड झालेलं विटामातीचं घर दुरुस्त करण्याआधी ती कामावर रुजू झाली होती. “ग्राम पंचायतीच्या आदेशानुसार अख्ख्या गावात कसं आणि किती नुकसान झालंय त्याचा आढावा आम्ही घेत होतो,” ती सांगते.
त्यानंतर तीन महिने ती गावात घरभेटी देत होती, पुराचा फटका बसलेल्यांशी बोलत गावात झालेल्या नुकसानाचा आढावा घेत होती. जे काही डोळ्यासमोर घडत होतं त्याचा तिला प्रचंड त्रास होत होता. गावातल्या १,१०० घरांचं सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानीच्या नोंदी घेण्याच्या प्रक्रियेत शुभांगीताईला स्वतःला चिंता आणि तणावाची लक्षणं जाणवायला सुरुवात झाली.
“मी माझ्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करत होते,” ती म्हणते, “पण काही पर्यायच नव्हता.”
२०१९ साली आलेल्या पुरांनी झालेलं नुकसान आणि आघातातून सावरत नाही तोवरच २०२० साली कोविड-१९ चा फैलाव सुरू झाला आणि तिथेही आशाच आघाडीवर होत्या. महासाथीने थैमान घातलं असतानाच जुलै २०२१ मध्ये पुन्हा एकदा पूर आला आणि पुन्हा एकदा आशा कार्यकर्त्या पूरग्रस्तांना मदत करण्यात गुंतल्या. “पूर आणि कोविड-१९ एकाच वेळी थैमान घालत होते आणि त्यातून निर्माण झालेली आपत्ती किती मोठी होती याचा कुणी विचारही कधी केला नव्हता,” शुभांगीताई सांगते.
मानसिक अस्वास्थ्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं गेल्यामुळे त्याचे परिणाम विविध मार्गाने जाणवू लागले.
२०२२ साली एप्रिल महिन्यात शुभांगीताईला न्यूमोनिया आणि रक्तक्षय असल्याचं निदान झालं. “मला आठ दिवस अंगात कणकण होती, पण काम इतकं होतं की या सगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करायला वेळच नव्हता,” ती सांगते. तिच्या रक्तात हिमोग्लोबिन ७.९ इतकी कमी झाली होती (सामान्य पातळी डेसिलिटर रक्तामागे १२ ते १६ ग्रॅम) आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं.


डावीकडेः आशा कार्यकर्ती शुभांगी कांबळेंचा क्ष किरण अहवाल. २०२२ साली एप्रिलमध्ये तिला न्यूमोनिया आणि रक्तक्षयाचं निदान झालं होतं. उजवीकडेः आरोग्यसेवांसंबंधीच्या सर्वेक्षणासाठी अर्जुनवाडच्या दुर्गम भागात शुभांगीताईला चालत जावं लागतं. पाऊस, उष्णतेच्या लाटा आणि पुराचा मुकाबला करत असताना आशा कार्यकर्त्यांकडे कुठलीही साधनं नाहीत
दोन महिने उलटल्यानंतर, शुभांगीताईची तब्येत हळू हळू सुधारायला लागली होती. आणि पुन्हा एकदा तिच्या गावात प्रचंड पाऊस झाला. पाण्याची पातळी झपाट्याने वाढायला लागली आणि शुभांगीताईला परत एकदा ताण जाणवू लागला. “एक काळ असा होता जेव्हा आम्ही पावसाची आतुरतेने वाट पहायचो. आणि आता प्रत्येक पावसाच्या वेळी आम्हाला पूर येणार अशी भीती वाटायला लागते,” ती म्हणते. “या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाणी इतकं झपाट्याने वाढलं की पुढचे किती तरी दिवस मला झोपच लागली नाही.” [वाचाः कोल्हापुरात खेळाडूंच्या मनावर पुराचं मळभ ]
औषधोपचार सुरू असले तरी शुभांगीताईच्या रक्तातली हिमोग्लोबिनची पातळी अजूनही कमीच आहे. तिला गरगरतं आणि थकवा आहे. पण विश्रांती किंवा बरं होण्याची कसलाही शक्यता नजीकच्या काळात दिसत नाही. “आशा कार्यकर्त्यांनी सगळ्यांना आधार देणं अपेक्षित आहे पण आम्ही स्वतः मात्र पूर्णपणे कोलमडून गेलो आहोत,” ती म्हणते.
*****
छाया कांबळे, वय ३८ शिरोळच्या गणेशवाडीमध्ये आशा कार्यकर्ती आहेत. २०२१ च्या पुराचे अगदी सगळे तपशील तिला लक्षात आहेत. “आमची सुटका करण्यासाठी आलेली बोट आमच्या घराच्या वरून चालली होती,” त्या सांगतात.
शुभांगीताईसारखंच छायाताईसुद्धा पाणी ओसरल्या ओसरल्या कामावर रुजू झाल्या होत्या. घरची कामं थांबवावी लागणार होती. “आम्ही सगळ्या [गणेशवाडीच्या आशा कार्यकर्त्या] सर्वात आधी उपकेंद्रात पोचलो,” त्या सांगतात. पुरामुळे इमारतीचं खूपच नुकसान झालं होतं त्यामुळे त्यांना एका निवासी डॉक्टरच्या घरी तात्पुरतं उपकेंद्र सुरू करावं लागलं होतं.
“न्यूमोनिया, कॉलरा, टायफॉइड, त्वचेचे आजार, ताप आणि इतरही तक्रारी घेऊन दररोज लोकांची रीघ लागली होती.” पुढचा एक महिनाभर हे काम सुरूच होतं. एकाही दिवसाची सुटी मिळाली नव्हती.

छाया कांबळे (उजवीकडे) गणेशवाडी गावात सर्वे करताना


डावीकडेः छायाताई म्हणतात की वातावरणात होणारे बदल आणि सतत येणारे पूर यांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. उजवीकडेः सर्वेच्या नोंदी एकत्रित करण्याचं काम सुरू आहे
“सगळ्या लोकांच्या डोळ्याला पाणी होतं. ते पाहून त्याचा त्रास होतोच की,” छायाताई म्हणतात. “पण कसंय, आमच्या मानसिक आरोग्यासाठी कसलीही सुविधा नाहीये. मग आम्ही यातनं बरं तरी कसं व्हायचं?” आणि त्यांच्याबाबतीत तेच घडलं. त्या बऱ्या झाल्याच नाहीत.
त्यांच्या मनावरचा ताण वाढतच गेला आणि थोड्या दिवसांनी त्यांना श्वास पुरत नाही असं वाटू लागलं. “मी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं कारण मला वाटत होतं कामाचा भार आहे म्हणून असं होतंय.” काही दिवसातच छायाताईंना दम्याचं निदान झालं. “मनावर प्रचंड ताण असल्यामुळे हा त्रास सुरू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं,” ती सांगते. ताण आणि दमा या दोन्हींचा संबंध स्थापित करणारे पुरेसे अभ्यास आहेत.
औषधांनी तिच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी वातावरणात ज्या झपाट्याने बदल होतायत त्याचा घोर मात्र कमी होत नाही. मार्च-एप्रिल महिन्यात या भागात उष्णतेची तीव्र लाट आली होती. तेव्हासुद्धा त्यांना गरगरणं आणि श्वास कोंडल्यासारखं होणं असे त्रास सुरू झाले होते.
“तेव्हा काम करणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त कठीण झालं होतं. असं वाटायचं माझी त्वचा पेटलीये,” ती सांगते. संशोधनातून असं दिसून आलंय की जास्त तापमानाचा संवेदनांवर परिणाम होतो, अगदी आत्महत्यांचं प्रमाण , हिंसा आणि आक्रमक वर्तनात देखील वाढ होते.
छायाताईंसारखीच लक्षणं इतर आशा कार्यकर्त्यांनाही जाणवली आहेत. “यात विचित्र काहीच नाही. ही लक्षणं सीझनल अफेक्टिव्ह डिसॉर्डर [SAD] म्हणजेच मनस्थितीत ऋतुनिहाय होणाऱ्या बदलांच्या आजाराची आहेत,” कोल्हापुरातील मानसशास्त्रज्ञ शाल्मली रनमाळे-काकडे सांगतात.
ऋतूत होणाऱ्या बदलामुळे निर्माण होणारं हे एक प्रकारचं नैराश्य आहे. उत्तर गोलार्धातल्या, वरच्या काही देशांमध्ये हिवाळ्यामध्ये अशा नैराश्याचं प्रमाण वाढत असल्याचं सर्रास आढळतं. आता भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्येही लोकांना अशा आजाराचा त्रास होतो याबद्दल जागरुकता वाढू लागली आहे.

शुभांगीताई कांबळे कोल्हापूरच्या अर्जुनवाडमध्ये २२ दिवसांच्या तान्ह्या बाळाचं वजन करतीये


डावीकडेः पुरात अडकलेल्या गावकऱ्यांची सुटका सुरू आहे. उजवीकडेः जुलै २०२१ मध्ये शिरोळ तालुक्यात पुराचं पाणी भरलं होतं
“वातावरण बदलायला लागलं की मला टेन्शन यायला लागतं. गरगरतं. आता मला अजिबात सहन होईना झालंय,” शुभांगीताई सांगते. “बघा, पुराचा फटका बसलेली प्रत्येक आशा कार्यकर्ती कुठल्या ना कुठल्या ताणाखाली आहे. आणि त्याचंच रुपांतर आता अशा चिवट आजारात होतंय. आम्ही इतक्या लोकांचे जीव वाचवायलोय, पण शासन आमच्यासाठी काहीच करंना गेलंय.”
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्येची जाण नाही असं नाही. पण त्यांचा प्रतिसाद पुरेसा आहे का, खरं तर योग्य आहे का हा खरा सवाल आहे.
शेजारच्या हातकणंगले तालुक्यालाही पुराचा फटका बसला आहे. तिथले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार म्हणतात की पूर आणि कोविडपासून आरोग्य कर्मचाऱ्यांवर “कामाचा प्रचंड ताण आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी आम्ही दर वर्षी आशा कार्यकर्त्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतो,” ते सांगतात.
पण, कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात राहणाऱ्या आशा युनियनच्या नेत्या नेत्रदीपा पाटील यांच्या मते या कार्यक्रमांचा काहीही उपयोग होत नाहीये. “मी जेव्हा आमच्या अधिकाऱ्यांना मानसिक आरोग्यासंबंधीच्या समस्या सांगितल्या तेव्हा त्यांनी चक्क तो विषय उडवून लावला आणि मला सांगितलं की अशा प्रसंगांना कसं तोंड द्यायचं ते शिकायला पाहिजे,” त्या म्हणतात.
रनमाळे-काकडे म्हणतात की आशा कार्यकर्त्यांना थेरपी आणि समुपदेशनाची गरज आहे. सततच्या ताणाला तोंड देण्यासाठी ते गरजेचं आहे. “मदतीला धावून येणाऱ्यालाही कधी कधी मदतीची गरज लागते,” त्या म्हणतात. “पण आपल्या समाजात हे घडत नाही.” त्या पुढे सांगतात की आघाडीवर काम करणाऱ्या अनेक आरोग्य कार्यकर्त्या सतत मदतीलाच धावून जाण्याच्या मनस्थितीत असतात. पण ते करत असताना त्यांची स्वतःची दमणूक, त्रागा आणि भावनिक ताणाकडे मात्र दुर्लक्ष होतं.
ताण निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत असतात. जसं की या भागात वातावरणात झपाट्याने बदल होत चालले आहेत. आणि त्या संबंधी जास्त गांभीर्याने तसंच झपाट्याने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचंही त्या सांगतात.
*****
कोल्हापूरच्या आशा कार्यकर्त्यांचं मानसिक आरोग्य ढासळत चाललं आहे आणि त्यासाठी बदलतं हवामान जबाबदार आहे असण्याची अनेक कारणं आहेत.


डावीकडेः शिरोळच्या ग्रामीण रुग्णालयात एका बालकाला पोलिओचे थेंब देणाऱ्या आशा नेत्रदीपा पाटील. उजवीकडेः आत्महत्येच्या विचारांशी झगडत असणाऱ्या एका ताईला नेत्रदीपा मिठी मारून आधार देतायत


डावीकडेः २०२१ साली पुरात घराची पडझड झाल्यानंतरही राणी कोहली (डावीकडे) भेंडवड्यात कामावर रुजू झाली. उजवीकडेः कोविड-१९ ची महासाथ एकदम जोरात सुरू होती तेव्हा ताप मोजणारी एक आशा कार्यकर्ती
कामाचा प्रचंड ताण असूनही प्रत्येक आशा कार्यकर्ती गावातल्या १,००० लोकसंख्येसाठी आरोग्य सेवांची ७० प्रकारची कामं करत असते. यामध्ये सुरक्षित बाळंतपण आणि सार्वत्रिक लसीकरणाचाही समावेश होतो. असं असूनही या आरोग्य कर्मचाऱ्यांना पगारही तुटपुंजाच दिला जातो आणि त्यांचं एक प्रकारे शोषणच केलं जातं.
नेत्रदीपा म्हणतात की महाराष्ट्रामध्ये आशांना महिन्याला ३,५०० ते ५,००० रुपये मानधन दिलं जातं. त्यातसुद्धा अनेकदा तीन महिन्यांचा विलंब होतो. “अगदी आजसुद्धा आम्हाला सेवाभावी कार्यकर्तीच समजलं जातं. त्यामुळे आम्हाला किमान वेतन आणि इतर लाभ नाकारले जातात,” त्या स्पष्ट करतात. आशा कार्यकर्त्यांना शासनाच्या भाषेत ‘कामानुसार-भत्ता’ दिला जातो. म्हणजेच त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या लोकसंख्येसाठी विशिष्ट कामं पूर्ण केल्यानंतर त्यासाठी त्यांना भत्ता मिळतो. ठराविक पगाराची तरतूद नसून राज्याराज्यामध्ये मानधन वेगवेगळं आहे.
अनेक आशा कार्यकर्त्यांची अशी परिस्थिती आहे की केवळ गावात आरोग्य सेवा पुरवण्याच्या काम करून घरचं भागत नाही. शुभांगीताईचंच उदाहरण घेतलं तर ती शेतात मजुरीलाही जाते.
“२०१९ आणि २०२१ च्या पुरानंतर तीन महिने मला कसलंच काम मिळंना गेलतं कारण शेताचं लईच नुकसान झालं होतं,” ती सांगते. “वातावरण बदलत चाललंय त्यामुळे पावसाचा काही अंदाजच बांधता येईना गेलाय. अगदी थोडा वेळच पाऊस पडतो पण सगळी नासधूस करून जातो. रानात काम मिळेल या आमच्या आशेवरही पाणीच पडतं.” २०२१ साली जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली त्यात महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांमधल्या पिकाखालच्या एकूण ४.४३ लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं. यात कोल्हापूरचाही समावेश होता.
२०१९ पासून सतत पूर येतायत, वित्तहानी होतीये आणि शेतात मजुरी घटत चाललीये. त्यामुळे घरचा खर्च भागवण्यासाठी शुभांगीताईने वेगवेगळ्या सावकारांकडून छोटी पण जास्त व्याज असणारी कर्जं घेतली आहेत. त्यासाठी तिला आपलं सोनंनाणं गहाण ठेवावं लागलं. जुनं घर नव्याने बांधणं शक्य न झाल्याने ती आता एका १० बाय १५ च्या खोलीत राहतीये.
“२०१९ आणि २०२१ साली अगदी तीस तासांत घरात पाणी भरलं. आम्ही काहीही वाचवू शकलो नाही,” शुभांगीताईचे पती ३७ वर्षीय संजय सांगतात. आजकाल शेतात पुरेशी मजुरी मिळत नसल्याने ते आता गवंडीकाम करतायत.


पुराचं पाणी ओसरल्यानंतर शुभांगीताई कांबळेवर पाणी शुद्धीकरण (डावीकडे) आणि गावकऱ्यांचं किती नुकसान झालंय त्याची यादी (उजवीकडे) करण्याचं काम देण्यात आलं होतं
स्वतःचं मोठं नुकसान झालं, त्रास झाला तरीदेखील आशा कार्यकर्ती म्हणून आपल्यावर असलेली न संपणारी कामं करण्यातच आपला वेळ जात असल्याचं शुभांगीताईला जाणवत होतं.
पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करण्यासोबतच पाण्यातून पसरणाऱ्या रोगांना आळा घालण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे स्रोत शोधून त्यात जंतुनाशक टाकण्याचं कामही आशांना देण्यात आलं होतं. यातल्या किती तरी कामांचे त्यांना पैसेही देण्यात येत नाहीत, नेत्रदीपा सांगतात. “पूर येऊन गेल्यानंतरच्या या सगळ्या कामांचा आमच्यावर किती ताण आला. वर त्याचे आम्हाला काहीही पैसे मिळाले नाहीत. फुकटचे श्रम आहेत सगळे.”
“प्रत्येक घरी जायचं, कुणाला पाण्यावाटे होणाऱ्या किंवा कीटकजन्य आजारांची लक्षणं आहेत का याची नोंद ठेवावी लागत होती,” शुभांगीताई सांगते. “वेळेवर उपचार मिळेल याकडे लक्ष दिल्याने किती तरी जणांचे प्राण आम्ही आशांनी वाचवले आहेत.”
पण या वर्षी एप्रिल महिन्यात ती स्वतः जेव्हा आजारी पडली तेव्हा मात्र या यंत्रणेकडून तिला काहीही आधार मदत मिळाली नाही. “मी सार्वजनिक आरोग्य खात्याची कर्मचारी असून देखील मला खाजगी दवाखान्यात उपचार करून घ्यावे लागले आणि २२,००० रुपये खर्च आला. का तर सरकारी रुग्णालयात फक्त औषधगोळ्या दिल्या जात होत्या आणि मला तातडीने ॲडमिट व्हायची गरज होती,” ती सांगते. सरकारी उपकेंद्रातून तिला लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या मोफत मिळत असल्या तरी दर महिन्याला औषधांवर तिचे ५०० रुपये खर्च होतात.
छायाताईंना दर महिन्याला आशा कार्यकर्तीच्या कामासाठी ४,००० रुपये मानधन मिळतं. त्यातले ८०० रुपये औषधगोळ्यांवर खर्च होतात आणि त्यांच्यासाठी ही रक्कम छोटी नाही. “शेवटी कसंय, आम्हीसुद्धा आता मान्य केलंय की आम्ही सेवाभावी कार्यकर्त्या आहोत. आणि त्यामुळेच कदाचित आम्हाला इतक्या अपेष्टा सहन कराव्या लागतायत,” ती म्हणते.
२०२२ साली जागतिक आरोग्य संघटनेने आशा कार्यकर्त्यांचा ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड देऊन सन्मान केला. दुर्गम भागातील सामान्य लोकांना सरकारी आरोग्यसेवेशी जोडून आरोग्य सेवा त्यांच्यापर्यंत पोचवण्यात त्यांचं मोलाचं योगदान असल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. “आम्हा सगळ्यांना याचा फार अभिमान आहे,” छायाताई सांगते. “पण आमचं मानधन उशीरा येतं किंवा अगदीच तुटपुंजं असल्याबद्दल जेव्हा आम्ही आमच्या वरिष्ठांपाशी विषय काढतो तेव्हा त्यांचं उत्तर असतं की आम्ही सगळ्या मानवजातीच्या कल्याणासाठी फार मोलाचं काम करतोय म्हणून. सरळ म्हणतात, ‘पेमेंट चांगलं नाही मिळत, पण तुम्हाला पुण्य मिळतं’.”

‘गावातल्या प्रत्येकाच्या आरोग्यासंबंधी ७० बाबींची नोंद ठेवण्याच्या कामाचे आम्हाला महिन्याला फक्त १,५०० रुपये मिळतात,’ शुभांगीताई सांगते


दुर्गेचा अवतार धारण केलेली आशा कार्यकर्ती कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (डावीकडे). संपूर्ण भारतात आशा कार्यकर्त्या कामाच्या ठिकाणी चांगल्या सोयी, कर्मचारी असल्याचा दर्जा, मासिक आणि वेळेवर पगार यासह अनेक मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका धोरणविषयक टिपणात आघाडीच्या आरोग्य कार्यकर्त्यांच्या मानसिक आरोग्यावर वातावरणातील बदलांचा कसा परिणाम होतो याकडे लक्ष वेधलं आहेः “हवामानातल्या तीव्र चढउतारांचा, अचानक उद्भवणाऱ्या घटनांनंतर नैराश्य, चिंता आणि तणावासारखी स्थिती निर्माण होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.”
कामाच्या ठिकाणी कसल्याही सोयीसुविधा नाहीत, त्यांच्या परिस्थितीबद्दल असलेली अनास्था आणि वातावरणाचे चढउतार या सगळ्यांचा आशांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे, नेत्रदीपा सांगतात. “यंदाच्या वर्षी उष्णतेच्या लाटेदरम्यान घरोघरी सर्वे सुरू होता. तेव्हा आमच्यापैकी किती तरी जणींना त्वचेला खाज येणं, झोंबल्यासारखं वाटणं, तसंच थकव्याचा त्रास झाला,” त्या सांगतात. “आम्हाला संरक्षक साहित्यच दिलं नव्हतं.”
रॉक्सी कोल पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय वेधशाळा (आयआयटीएम) या संस्थेत वातावरण विषयातील शास्त्रज्ञ आहेत तसंच आयपीसीसी अहवालातही त्यांनी आपलं योगदान दिलं आहे. त्यांच्या मते, एक ‘वातावरणविषयी कृती आराखडा’ तयार करण्याची गरज असून अशा आराखड्यात कोणत्या काळात आणि कोणत्या दिवशी उष्णतेची लाट किंवा इतर हवामान अतिशय तीव्र असणार आहे हे स्पष्ट नमूद केलेलं असणं गरजेचं आहे. “आपल्याकडे पुढच्या अनेक वर्षांसाठी किंवा दशकांसाठी वातावरणाचे आडाखे तयार आहेत. त्याचा आधार घेऊन कोणत्या भागात, कोणत्या दिवशी कर्मचाऱ्यांनी उन्हात जाणं टाळलं पाहिजे ते आपण नक्कीच शोधून काढू शकतो,” ते म्हणतात. “हे काही फार मोठं काम नाहीये. सगळी विदा आपल्याकडे आहेच.”
या दिशेने पाऊल टाकेल असं कुठलंही अधिकृत धोरण किंवा प्रयत्न होत नसल्याने आशा कार्यकर्त्यांना स्वतःच अशा प्रसंगात काही ना काही मार्ग काढावे लागतात. शुभांगीताई सकाळी सकाळीच हवामानाचा अंदाज पाहतात. “काम तर मला चुकत नाही. पण रोजच्या वातावरणाचा मुकाबला करायची तयारी तर मी करू शकते की नाही,” ती म्हणते.
या वार्तांकनासाठी लेखकाला इंटरन्यूजच्या अर्थ जर्नलिझम नेटवर्कतर्फे स्वतंत्र पत्रकारिता निधी मिळाला आहे.